लोकसंख्येचे बदलते स्वरुप ‘टाइम बॉम्ब’च
तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवि यांचे वक्तव्य : आसाम, बंगाल, पूर्वांचलचा उल्लेख
वृत्तसंस्था/ वडोदरा
तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवि यांनी आसाम आणि पश्चिम बंगाल समवेत देशाच्या काही हिस्स्यांमध्ये लोकसंख्येच्या स्वरुपात वेगाने होत असलेल्या बदलावरून चिंता व्यक्त केली आहे. आसाम, पश्चिम बंगाल समवेत काही हिस्स्यांमध्ये लोकसंख्येच्या स्वरुपात होत असलेला बदल टाइम बॉम्बप्रमाणे आहे. यावर उपाय शोधावा लागेल असे रवि यांनी म्हटले आहे.
तर महाराष्ट्र आणि तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्ये भाषेवरून होत असलेल्या वादादरम्यान आर.एन. रवि यांनी भाषेच्या नावाखाली लढाईची भारताची संस्कृती नसल्याचे उद्गार काढले आहेत. कुणावरही कुठलीही भाषा लादली जाऊ नये. या देशाने नेहमीच बाहेरील हल्ले झेलले आहेत, परंतु अंतर्गत स्थितीबद्दल बोलताना इतिहासात काय घडले हे पाहिले जावे असे त्यांनी म्हटले आहे.
इतिहासापासून शिका
1947 मध्ये देशाची फाळणी झाली, ती अंतर्गत अशांततुमळे झाली होती. एका विचारसरणीला मानणाऱ्या लोकांनी आम्ही इतर लोकांसोबत राहू शकत नसल्याचे म्हटले होते. अशाप्रकारच्या विचारसरणीच्या वादामुळे देशाची फाळणी झाली. जेव्हा बाहेरून धोका निर्माण होतो, तेव्हा आम्ही एकजूट होतो, परंतु जेव्हा अंतर्गत स्वरुपात समस्या निर्माण होते तेव्हा आम्ही विखुरले जातो. मागील 30-40 वर्षांमध्ये आसाम, पश्चिम बंगाल आणि पूर्वांचलमध्ये (उत्तरप्रदेश आणि बिहारचे काही हिस्से) लोकसंख्येत झालेल्या बदलाची चिंता कुणाला आहे का? आगामी 50 वर्षांमध्ये या भागांमध्ये देशाच्या विभाजनासाठी कारवाया होणार नाहीत का असे प्रश्नार्थक विधान आर.एन. रवि यांनी गुजरातच्या गांधीनगर येथील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना केले आहे.
समस्येवर उपाय शोधावा लागणार
आम्ही काही भागांमध्ये वाढती संवेदनशील लोकसंख्या आणि त्याच्या भविष्यावर एक अध्ययन करायला हवे. ही समस्या एका टाइम बॉम्बप्रमाणे आहे. भविष्यात आम्ही या समस्येला कसे सामोरे जाऊ याचा विचार आम्हाला करावा लागेल. आतापासूनच यावर उपाय शोधणे सुरू करायल हवे. कुठल्याही देशाची सैन्यशक्ती अंतर्गत अशांततेला दूर करण्यासाठी पुरेशी नसते. जर सोव्हियत महासंघाची सैन्यशक्ती अंतर्गत समस्यांना हाताळण्यासाठी पुरेशी असती तर 1991 मध्ये त्याचे विघटन झाले नसते असे उद्गार माजी आयपीएस अधिकाऱ्याने काढले आहेत.
सर्व भाषा समान
भाषेच्या नावावर कटूता बाळगणे भारताची परंपरा नाही. स्वातंत्र्यानंतर आम्ही परस्परांमध्ये लढू लागलो, याचे एक कारण भाषा होते. सर्व भारतीय भाषा समान आहेत आणि समान सन्मानास पात्र असल्याचे केंद्रीय नेतृत्वाने वारंवार स्पष्ट केले आहे. गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वीच भारताच्या सर्व भाषा आमच्या राष्ट्रीय भाषा असल्याचे स्पष्ट केले असल्याचे रवि यांनी निदर्शनास आणून दिले.
विविधता हीच आमची शकती
स्वातंत्र्यानंतर आम्ही कुठे न कुठे देशभक्तीची भावना आणि एकतेचा विचार मागे सोडून दिला आहे. पूर्वी जी विविधता (वेगवेगळ्या जाती, धर्म, भाषा, राहणीमान) आमची सर्वात मोठी शक्ती होती, त्यालाच आता तडा देण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत असल्याचा दावा रवि यांनी केला आहे.