For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलिसांचे आव्हानात्मक कार्य कौतुकास्पद

12:03 PM Oct 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
पोलिसांचे आव्हानात्मक कार्य कौतुकास्पद
Advertisement

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे प्रतिपादन : पोलीस हुतात्मा दिन गांभीर्याने : पोलीस आयुक्तालय-पोलीस मुख्यालयाच्यावतीने आयोजन 

Advertisement

बेळगाव : प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला त्यांच्या सेवेदरम्यान अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. त्या आव्हानांवरच त्यांच्या आयुष्यातील कामगिरी अवलंबून असते. सणासुदीच्या काळात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रात्रंदिवस सेवा बजावतात. त्यामुळे पोलिसांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले. पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयाच्यावतीने पोलीस परेड मैदानावर मंगळवार दि. 21 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पोलीस हुतात्मा दिन कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन उपस्थित होते. जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर व्यासपीठावर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते हुतात्मा दिन कार्यक्रमाला चालना देण्यात आली.

त्यानंतर हुतात्मा स्तंभावर पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी कर्तव्य बजावत असताना बलिदान दिलेल्या पोलिसांचे शौर्य व सेवेचे स्मरण करण्यासाठी हवेत गोळ्या झाडून सलामी देण्यात आली. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी हुतात्मा झालेल्या पोलिसांच्या नावांचा उल्लेख करून त्यांच्या सेवेचे स्मरण करत श्रद्धांजली वाहिली. 24 ऑक्टोबर 1959 मध्ये चीनशी झालेल्या युद्धात सीआरपीएफचे जवान हुतात्मा झाले. प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला त्यांच्या सेवेवेळी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. त्यावरच त्यांच्या आयुष्यातील कामगिरी अवलंबून असते. सर्वजण सण साजरे करतात. मात्र पोलीस अधिकारी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र काम करतात. हुतात्मा पोलीस अधिकाऱ्यांची नावे आपल्या हृदयात कायमची कोरली जातात. चला त्यांचे स्वप्न साकार करूया, पोलीस आणि जनतेमध्ये शांतता आणि सौहार्दाचा पाया रचूया, या देशाच्या मातीचे आपण नेहमीच रक्षण करूया, असा संदेश जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आपल्या कवितेतून दिला. यावेळी शहर व जिल्ह्यातील डीसीपी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख, पोलीस उपअधीक्षक, साहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.