महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कामगार सुरक्षेचे आव्हान

06:01 AM Dec 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय सैन्यदलासह विविध कामांसाठी स्फोटके आणि उपकरणे बनविणाऱ्या ‘सोलार इंडस्ट्रीज’ कंपनीत झालेल्या स्फोटात नऊ जणांचा बळी गेल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पिंपरीतील स्पार्कल कँन्डल कंपनीत झालेल्या स्फोटास काही दिवस उलटत नाही तोच नागपूरात त्याची पुनरावृत्ती घडल्याने ‘औद्योगिक सुरक्षा’ हा विषय आपल्या देशात आजही किती नाजूक अवस्थेत आहे, याची प्रचिती येण्यास हरकत नसावी. नागपूरजवळील चाकडोह परिसरात ‘सोलार इंडस्ट्रीज’ या कंपनीचा प्लांट आहे. या कंपनीत भारतीय लष्करासाठी लागणारा विविध दाऊगोळा, शस्त्रे तयार करण्यात येतात. यातून या कंपनीचे महत्त्व लक्षात यावे. याशिवाय ड्रोन्स, इंडस्ट्रीअल स्फोटके, इलेक्ट्रिकल डेटोनेटर्सही उत्पादित केली जातात. हे पाहता कंपनी व तिचा परिसर संवेदनशील या सदरात मोडतो. या पार्श्वभूमीवर कंपनीत नियमित सुरक्षाविषयक ऑडिटही करण्यात येते. असे असतानाही तेथे स्फोट कसा झाला, सुरक्षेच्या स्तरावर कोणत्या त्रुटी राहिल्या, असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. यथावकाश त्याची उत्तरे मिळतीलही. परंतु, त्यातून आपण काही बोध घेणार आहोत का, हाच महत्त्वाचा मुद्दा ठरतो. ज्या सोलार इंडस्ट्रीजमध्ये स्फोट झाला, तिथे सैन्य दलासाठी मल्टिमोडल ग्रेनेड्स तयार होतात. त्यामुळे संरक्षण दलानेही याची दखल घेतल्याचे सांगितले जाते. हा स्फोट अपघातामुळे झाला की यामागे कोणता घातपात आहे, याचा सखोल तपास करण्यात येणार असून, एटीएस किंवा फॉरेन्सिक तपास यंत्रणांकडून याचा तपास होणार असल्याचे सांगण्यात येते. या घटनेचे गांभीर्य पाहता कसून तपास होणे आवश्यकच म्हटले पाहिजे. कंपनीच्या युनिटमध्ये कोळसा खाणींसाठी लागणाऱ्या बूस्टर्सचे उत्पादन सुरू असताना हा प्रकार घडल्याची माहितीही आता पुढे येत आहे. कुठलीही स्फोटके तयार करत असता कच्च्या मालाची प्रारंभी चाळणी करण्यात येत असते. त्याचे सिव्हिंग करण्यात येत असतानाच हा स्फोट होतो व त्याने युनिटची इमारत पार जमीनदोस्त होऊन जाते, यातून स्फोट किती शक्तिशाली होता, याची कल्पना करता येऊ शकते. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश असून, बहुतांश महिला या तळागाळातील व सर्वसामान्य कुटुंबातील होत्या. कुटुंबाचा आधारवड म्हणूनही त्या आपली भूमिका बजावत होत्या. मात्र, या स्फोटाने त्यांचा बळी घेतलाच. शिवाय त्यांच्या कुटुंबीयांनाही पोरके केले. सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख ऊपयांची मदत जाहीर केली असली, तरी जीवाचे मोल त्यातून भरून निघणार नाही. पिंपरी-चिंचवडमधील मेणबत्ती कारखान्यातील स्फोटातही सहा महिलांना आपला जीव गमवावा लागला होता. आगीच्या भक्ष्यस्थानी पडून मृतदेह ओळखण्यापलीकडील झाल्याने अखेर या महिलांची डीएनए चाचणी करावी लागली होती. अवघ्या पाच ते सात हजार ऊपयांवर राबणाऱ्या या महिलांच्या श्रमाला जिवंतपणी योग्य किंमत वा मूल्य मिळाले नाही. मृत्यूची भरपाई मात्र लगोलग जाहीर झाली. आपली व्यवस्था काय आहे, याचेच या साऱ्यातून दर्शन घडते. नारायण सुर्वे यांच्यासारख्या कामगार कवीने ‘भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली,’ असे म्हटलेल्यालाही आता बराच काळ लोटला आहे. मात्र, ही स्थिती किंचितही बदललेली नाही. पूर्वी कामगार संघटना प्रबळ तरी असायच्या. कामगार लढ्याच्या माध्यमातून कामगारांचा आवाज बुलंद राहत असे. अन्यायाला वाचा तरी फोडली जात असते. आता कामगार चळवळ पुरती मोडीत निघाली आहे. असंघटित स्वऊपातील कामगारांना कुणीच वाली राहिलेला नाही. अशा स्वऊपाच्या घटना घडल्या, की तेवढ्यापुरती चर्चा होते. कामगारावर कसा अन्याय होतो, तो कसा भरडला जातो, व्यवस्थेचा बळी ठरतो, यावर मंथन होते. प्रत्यक्षात कामगाराच्या हक्कासाठी कुणीच एकत्र येत नाही. एकेकाळी तळपत्या तलवारीप्रमाणे चमकणाऱ्या कामगाराचे तेज आज कुठल्या कुठे हरवले आहे. नागपूरसारख्या शहरात संतप्त कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येत महामार्ग रोखण्याचा तरी प्रयत्न केला. मात्र, पिंपरीसारख्या आशिया खंडातील एक मोठी औद्योगिक वसाहत म्हणून प्रसिद्ध असलेल्या भागात मात्र कामगार एकवटताना फारसे दिसले नाहीत. कामगारांनी एकत्र यावे, रास्ता रोको वा आंदोलन करावे, असे कुणी म्हणणार नाही. मात्र, जीवाला काहीच मूल्य राहणार नसेल, तर कामगारांनी, कामगार संघटनांनी आवाज उठविला पाहिजे. मुख्य म्हणजे औद्योगिक सुरक्षेबाबत कामगार व कामगार संघटनांनी आग्रही रहायला हवे. सरकारने यापुढे तरी कामगारांच्या सुरक्षेबाबत कडक धोरण अवलंबावे. सुरक्षेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या कंपन्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी. जेणेकरून अशा दुर्घटना टळू शकतील. मागच्या काही वर्षांत शहरांचा प्रचंड विस्तार झाला आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत शेड्स उभारून लघुद्योग सुरू करण्यात आले आहेत. मात्र, त्यांची पायाभरणी करताना बव्हंशी सुरक्षेच्या नियमांची एwशीतैशीच झाल्याचे दिसून येते. याला कुठेतरी पायबंद बसणे आवश्यक आहे. नागपूर वा पिंपरी-चिंचवडमधील घटना हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे. यापूर्वी अनेक कारखान्यांमध्ये असे स्फोट झाले आहेत. अशा स्फोटांमध्ये कितीतरी निष्पाप जीवांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. याची भरपाई म्हणून त्यांना काही लाख ऊपये मिळाले असले, तरी आयुष्याची ठेव असणारी आपली मुले पाल्यांना गमवावी लागली. तर कुठे कर्त्याधर्त्यास गमवण्याची वेळ मुलाबाळांवर आली. हे नुकसान कधीही भरून येणारे नसते. म्हणूनच भविष्यात ‘झिरो अपघात’ हे लक्ष्य बाळगून पावले उचलावी लागतील. त्यासाठी कारखाने, कामगार यांच्यासह सर्वांनीच परस्परांना साथ दिली पाहिजे. सुरक्षेचे उपाय, दक्षता याचा अवलंब करतानाच सामूहिक प्रयत्न केले, तर ‘औद्योगिक सुरक्षे’चा विषय आपण नक्कीच तडीस नेऊ शकतो. त्यासाठी कटीबद्ध होऊयात.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article