For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विजयाचे आव्हान

06:43 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
विजयाचे आव्हान
Advertisement

अभिनेता विजय दलपती याने तमिळगा वेतरी कळघम अर्थात टीव्हीके या आपल्या नव्या पक्षाच्या ध्वजाचे व चिन्हाचे केलेले अनावरण हा तामिळनाडूच्या राजकारणातील महत्त्वाचा प्रसंग म्हटला पाहिजे. 2026 मध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर एक पाऊल पुढे टाकत विजय याने निवडणुकीचेच रणशिंग फुंकल्याचेच दिसून येते. आता अभिनेता ते नेता हा त्याचा प्रवास यशस्वी होणार का, याचे उत्तर मिळण्यासाठी काही काळ वाट पहावी लागेल. तामिळनाडूच्या राजकारणाचा आढावा घेतला, तर आजपर्यंत अनेक कलाकारांची राजकीय कारकीर्द यशस्वी ठरल्याचे पहायला मिळते. अण्णा दुराई, एमजीआर अर्थात एम जी. रामचंद्रन, एम. कऊणानिधी ही त्याची मूर्तिमंत उदाहरणे होत. अर्थात आद्यत्व जाते, ते अण्णा दुराई यांच्याकडे. पेरियार यांनी तळागाळातील वर्गाला हक्क मिळवून देण्यासाठी तामिळनाडूत जनआंदोलन सुरू केले. त्याच्याशी नाट्या व चित्रपट पटकथा लिहिणारे अण्णा दुराईही जोडले गेले नि बघता बघता तामिळनाडूच्या राजकारणाचा अविभाज्य भाग बनले. एमजीआर यांनीही अभिनेता म्हणून नवा मापदंड निर्माण केला व नेता म्हणूनही तामिळी जनतेच्या मनात अढळ स्थान मिळविले. अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे संस्थापक, तीनदा तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. दीर्घकाळ तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या व जनतेमध्ये अम्मा म्हणून परिचित असलेल्या जे. जयललिता याही पूर्वाश्रमीच्या अभिनेत्या. चित्रसृष्टी व राजकारण अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी मिळविलेले यशही उल्लेखनीय म्हणावे लागेल. विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे वडील एम. कऊणानिधी यांचाही आघाडीचे पटकथा लेखक म्हणून लौकिक होता. तमिळ सिनेमा गाजवणाऱ्या कऊणानिधींनी पुरोगामी चळवळीतही मोठे योगदान दिले. त्याचबरोबर अनेकदा तामिळनाडूचे नेतृत्व करीत तेथील राजकारणावर आपला तहहयात प्रभाव ठेवला. याखेरीज अभिनेता कमल हसन, विजयकांत यांचीही वाटचाल सिनेमा ते पॉलिटिक्स अशी राहिली असली, तरी त्यांना राजकारणात मर्यादितच यश मिळाले. हे बघता मेगास्टार विजय कुठवर मजल मारणार, याविषयीची उत्सुकता नक्कीच वाढते. विजयच्या पक्षाची स्थापना मागच्या फेब्रुवारीतील. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून त्याने दूर राहणेच पसंत केले. आता विधानसभेच्या दृष्टीकोनातून त्याने पावले टाकायला सुऊवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे पक्षाच्या ध्वजाचे अनावरण व टीव्हीकेच्या महासभेची तयारी. पक्षाचा ध्वज तयार करताना विजय याने कल्पकता दाखविलेली दिसते. पक्षाच्या झेंड्यात दोन्ही बाजूला गडद तपकिरी व मध्यभागी पिवळा रंग वापरण्यात आला आहे. या पिवळ्या रंगामध्येच वागई फूल व त्याच्या दोन्ही बाजूला झुंजणारे हत्ती शोभून दिसतात. तामिळनाडूत वागईचे फूल हे विजयाचे प्रतीक मानले जाते. हे बघता ध्वजाची निवड त्याने विचारपूर्वक केली, असे म्हणता येईल. ध्वजाबरोबरच पक्षाच्या गीताचे सादरीकरण, पक्ष कार्यकर्त्यांची शपथ, यांसारख्या गोष्टींतून विजय आपली पुढची वाटचाल ही शिस्तबद्ध व काटेकोर असल्याचेच ध्वनित करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी व तमिळ अस्मितेसाठी लढलेल्या असंख्य सैनिकांचा आम्ही आदर करतो. जात, धर्म, लिंग, स्थान या आधारावर असलेले मतभेद आम्ही दूर करू, सर्वांना समान हक्क, समान संधी देऊ. सर्व प्राणिमात्रांसाठी समानता आणण्याकरिता कटिबद्ध राहू, अशी या नव्या पक्षाची प्रतिज्ञाही लक्षवेधक ठरते. अर्थात हे हस्तलिखित प्रत्यक्षात उतरण्यासाठी पक्ष किती तळमळीने राजकारणात उतरणार, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात उत्तर तामिळनाडूच्या विक्रवंडी येथे टीव्हीकेची सभा होणार आहे. ही सभा सर्वार्थाने ऐतिहासिक असेल. या सभेला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे तामिळनाडूचेच नव्हे, तर संबंध देशाचे लक्ष असेल. द्रमुक किंवा अण्णा द्रमुक असाच अनेक वर्षे तामिळनाडूच्या राजकारणाचा ट्रेंड होता. मात्र, जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्षाची घडी विस्कटली. त्यात पक्षांतर्गत वादामुळे या पक्षाला घसरण लागली. ती अद्यापही सुरूच असल्याचे दिसते. दुसरीकडे द्रमुक नेते व मुख्यमंत्री स्टॅलिन हेच आज तामिळनाडूचा प्रमुख चेहरा बनले आहेत. अण्णा द्रमुक व भाजप एकत्रितरीत्या त्यांच्याशी लढण्याचा प्रयत्न करीत असले, तरी स्टॅलिन यांच्यापुढे त्यांना आव्हान निर्माण करता आलेले नाही. ही पोकळी भरून काढण्याची संधी विजयच्या पक्षाला असेल. द्रमुक व त्यांचा सहकारी काँग्रेस यांना टीव्हीके आव्हान देऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. ते चुकीचे ठरू नये. विधानसभा निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा अवधी आहे. स्टॅलिन यांच्यापुढे आव्हान निर्माण करायचे असेल, तर या काळात विजय यांना स्वस्थ बसून चालणार नाही. केवळ भाषणबाजी वा हिरोगिरी न करता त्यांना पक्षातील कार्यकर्त्यांकरिता कार्यक्रम द्यावा लागेल. तरच ते आपला प्रभाव खऱ्या अर्थाने निर्माण करू शकतात. दुसऱ्या बाजूला विजय यांची एन्ट्री हे द्रमुक व भाजपसाठीही आव्हान असेल. मागच्या काही दिवसांपासून द्रमुकला पर्याय देण्याचे प्रयत्न अण्णा द्रमुकचे नेते व भाजपाच्या धुरिणांकडून होत आहेत. परंतु, सगळा प्रकाशझोत विजय यांच्या टीव्हीकेकडे एकवटला, तर या दोन्ही पक्षांचे मनसुबे उधळले जाऊ शकतात. खरे तर दक्षिणेतील राजकारणाचा बाज हा अत्यंत वेगळा आहे. चित्रपट आणि राजकारण या दोहोंबाबत येथील जनता कमालीची संवेदनशील आहे. त्याचबरोबर तेथील राजकारण अधिकतम भावनेवर चालणारे आहे. हे बघता विजय यांना तामिळनाडूत शिरकाव करण्याची नक्कीच सुवर्णसंधी असू शकते. अॅन्टी इन्कबन्सी नावाचा पॅक्टर सुप्तपणे आपले काम करत असतो. त्याला केवळ हवा देण्याची गरज असते. तशी हवा देता आली, तर टीव्हीके पक्ष आज ना उद्या विजयपथावर पोहोचू शकेल. त्यामुळे मुरब्बी स्टॅलिन यांनाही नव्या प्रतिस्पर्ध्याशी लढण्यासाठी रणनीती तयार ठेवावी लागेल.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.