भारतीय संघासमोर सराव खेळपट्ट्यांचे आव्हान
वृत्तसंस्था/ मेलबर्न
टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज होत असताना उपलब्ध करण्यात आलेल्या सराव खेळपट्ट्यांमुळे त्यांना आणखी एका आव्हानाचा सामना करावा लागत आहे. रविवारच्या सराव सत्रादरम्यान वेगवान गोलंदाज आकाश दीपचा चेंडू खाली राहून कर्णधार रोहित शर्माच्या डाव्या गुडघ्यावर आदळला होता. रोहितच्या तंदुऊस्तीबद्दल कोणतीही चिंता नसल्याचे सांगताना आकाशने सदर सराव खेळपट्टी मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठीची आहे आणि त्यावर चेंडू खाली राहतो, असे स्पष्ट केले होते.
ऑस्ट्रेलियातील वृत्तांनुसार, भारत ‘बिग बॅश’साठी वापरल्या गेलेल्या आणि वापरून वापरून काहीशा जीर्ण झालेल्या खेळपट्ट्यांवर सराव करत आहे. एमसीजीवरील छायाचित्रांनीही भारतीय संघ सराव करत असलेल्या खेळपट्ट्या किंचित जीर्ण झाल्यागत वाटत असल्याचे दाखवून दिलेले आहे. त्यामानाने ऑस्ट्रेलियासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या खेळपट्ट्या या ताज्या वाटत आहेत.
तथापि, सोमवारी सकाळी एमसीजीचे मुख्य क्युरेटर मॅट पेज यांनी स्पष्ट केले की, ताज्या खेळपट्ट्या या सामना सुरू होण्याच्या केवळ तीन दिवस आधी दिल्या जातात. ‘आम्ही येथे तीन दिवस आधी कसोटी सामन्यांसाठीच्या खेळपट्ट्या तयार करतो. त्याआधी संघ येऊन सराव करू लागल्यास आमच्याकडे असलेल्या खेळपट्ट्या त्यांना मिळतात. त्यामुळे आज आम्ही नव्या खेळपट्टीवर आहोत. जर भारताने आज सकाळी सराव केला असता, तर त्यांना ताज्या खेळपट्ट्या मिळाल्या असत्या. आमच्यासाठी ही ठरलेली प्रक्रिया आहे’, असे ते म्हणाले.