लक्ष्य सेन, आकर्षी, बनसोड यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ वान्ता, फिनलँड
राष्ट्रकुल चॅम्पियन लक्ष्य सेनला येथे सुरू असलेल्या आक्&िटक ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीतच पराभूत व्हावे लागले. याशिवाय भारताचा अन्य खेळाडूंनाही पराभवाला सामोरे जावे लागले.
जागतिक क्रमवारीत 19 व्या स्थानावर असणाऱ्या लक्ष्य सेनला दहाव्या मानांकित चौ तिएन चेनकडून संघर्षपूर्ण लढतीनंतर 19-21, 21-18, 21-15 असा पराभव पत्करावा लागला. एक तास दहा मिनिटे ही लढत रंगली होती. पॅरिस ऑलिम्पिकनंतर बीडब्ल्यूएफच्या स्पर्धेत लक्ष्यने प्रथमच भाग घेतला होता. त्याने चौ तिएन चेनविरुद्ध तोडीस तोड खेळ केला. लक्ष्यने 13-7 अशी आघाडी घेतली तरी चेनने त्याला 15-15 वर गाठले. मात्र लक्ष्यने शेवटचे चार गुण घेत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्येही लक्ष्यने 9-5 अशी आघाडी घेतली, पण त्याच्याकडून चुका झाल्यानंतर चेनने त्याला 13-13 वर गाठले. यानंतर लक्ष्यचा जोम कमी झाल्यावर चेनने पकड मिळवित गेम जिंकून बरोबरी साधली. निर्णायक गेममध्येही चेनचेच वर्चस्व राहिले.
पात्रता फेरीतून मुख्य ड्रॉमध्ये आलेल्या भारताच्या किरण जॉर्जलाही दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या आशियाई चॅम्पियन जोनातन ख्रिस्तीने 21-17, 21-8 असे हरविले. पहिल्या फेरीत किरणने वांग त्झू वेइला पराभवाचा धक्का दिला होता. महिला एकेरीत भारताच्या 17 वर्षीय उन्नती हुडाला कॅनडाच्या मिचेली लीकडून 21-10, 21-19 असे पराभूत व्हावे लागले. मिशेलीने दुसऱ्या फेरीत पीव्ही सिंधूला हरविले होते. आकर्षी कश्यपला दुसऱ्या मानांकित चीनच्या हा युइकडून 21-9, 21-8 तर मालविका बनसोडला थायलंडच्या रॅत्चानोक इंटेनॉनकडून 21-15, 21-8 असा पराभव स्वीकारावा लागला.
मिश्र दुहेरीत सतीश कुमार करुणाकरन व आद्या वरियथ यांना चौथ्या मानांकित चेंग झिंग-झँग ची यांच्याकडून 21-12, 21-15 असा पराभव पत्करावा लागला. महिलांच्या दुहेरीत रुतुपर्णा पांडा व स्वेतपर्णा पांडा यांनाही अग्रमानांकित लियु शेंग शु व टॅन निंग यांनी 21-8, 21-10 असे हरविले.