माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगारांचे आव्हान
2000 च्या सुरुवातीला अभियांत्रिकी, तंत्रज्ञान या विषयांच्याच जोडीला माहिती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र विषयातील पदवीधर उमेदवारांना चांगली मनाजोगी व आकर्षक पगाराची नोकरी सहजगत्या मिळत असते. त्यामुळे या क्षेत्रातील पदवी आणि पदवीधरांना करिअरपासून नोकरीपर्यंत प्राधान्य दिले जाई. मात्र गेल्या 5 वर्षात परिस्थितीत मोठे बदल झालेले आहेत. या बदलांसाठी सकृतदर्शनी जागतिक मंदी, कोरोनानंतरचे बदलते कामकाज आणि कार्यसंस्कृती, वाढत्या संगणीकरणासह वाढलेली स्पर्धा, बदलती अर्थव्यवस्था व व्यावसायिक गणित ही प्रमुख कारणे सांगितली जात असतानाच त्यात भर पडली ती ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’ची. अल्पावधीत पण मोठ्या प्रमाणात झालेल्या या बदलांचा अभ्यास धक्कादायक व अभ्यास करण्यासारखा ठरतो तो याचमुळे.
माहिती तंत्रज्ञान व संगणक क्षेत्र जेव्हा व्यवसाय-व्यवस्थापन क्षेत्रात विशेष प्रकाशझोतात होते तेव्हा त्याची व या क्षेत्रातील रोजगारांची सर्वदूर व प्रतिष्ठेसह चर्चा होत असे. अगदी शैक्षणिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापासून करिअर-रोजगार व वैयक्तिक आयुष्यात स्थिरता येण्याच्यादृष्टीने माहिती तंत्रज्ञान हे अव्वल क्षेत्र समजले जाई.
असे होण्यामागचे कारण परंपरा म्हणजे 90 च्या दशकासोबत संगणक क्षेत्राला आलेली व्यावसायिक बरकत. त्याचदरम्यान झालेले जागतिकीकरण व जागतिक पातळीवरील खुली आर्थिक व व्यापार व्यवस्था. या बदलत्या स्थितीचा मोठा फायदा भारतीय संगणक उद्योग व या क्षेत्रातील शिक्षित-प्रशिक्षित उमेदवारांना स्वाभाविकपणे झाला. भारतातील उपलब्ध कौशल्य व संगणकीय तज्ञ आणि उद्योगांची कर्तबगारी यामुळे अमेरिकेसह युरोप व प्रगतीशील देशांनी आपल्या वाढत्या संगणकीय गरजांच्या पूर्ततेसाठी भारताला प्राधान्य देण्यास सुरुवात केली व भारतीयांनी त्याचे चीज केले. याच्या परिणामी भारतातील संगणक क्षेत्रातील रोजगार संधी वाढत गेल्या.
नंतरच्या टप्यात व विशेषत: कोरोना काळात परिस्थितीने जागतिक स्तरावर वेगळे वळण घेतले. इतर उद्योग-व्यवसाय क्षेत्राप्रमाणेच संगणक क्षेत्रात कामकाज व व्यवसायापासून कर्माचाऱ्यांच्या संस्थेपर्यंत मोठीच उलथापालथ झाली. याचाच पहिला व महत्त्वाचा परिणाम म्हणजे संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा आर्थिक व व्यावसायिक प्रभाव कमी होऊ लागला. त्याचा थेट व प्रत्यक्ष परिणाम प्रचलित कर्मचाऱ्यांचा विकास आणि वेतनापासून नव्याने उत्तीर्ण होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळ जवळ नगण्य स्वरुपात होण्यामध्ये झाला. हा बदल पाहणे व पचविणे अर्थातच जड गेले. एवढेच नव्हे संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वच प्रस्थापित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात कपात करण्यास सुरुवात केली. परिणामी पूर्वी माहिती तंत्रज्ञान व संगणक क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या एका प्रस्थापित कंपनीने एकाच दिवसात 500 पर्यंत कर्मचाऱ्यांची कपात केली तर नव्या कर्मचाऱ्यांच्या निवडीला अर्थातच थांबवण्यात आले.
माहिती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र क्षेत्रातील व्यवस्थापन-उद्योजक व कर्मचाऱ्यांनी हे संकट जेमतेम थोपवले. मात्र व्यावसायिक परिस्थिती यथावत होत असतानाच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व अंमलबजावणी सुरु झाली. याने विकसित संगणक तंत्रज्ञानापुढे मोठे आव्हान उभे केले. यामुळे अद्ययावत तंत्रज्ञान व संगणकीय सेवा क्षेत्रातील अनेक प्रकारच्या कामांना बेकाम तर ही कामे करणाऱ्यांना बेकार केले. हे परिणाम कंपन्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच स्तरावर झाले.
या परिणामांचे संख्यात्मक स्वरुप सांगायचे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात 2018 ते 2021 या केवळ तीन वर्षात नव्या कर्मचाऱ्यांची भरती 95000 ने कमी झाली. त्यानंतरही या संख्येत वाढ होत गेली व 2023 मध्ये हा आकडा 2,50,000 वर गेला. यालाच जोड मिळाली ती संगणक क्षेत्रातील कर्मचारी कपातीची.
परिणामी आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती तंत्रज्ञान उद्योगात आलेल्या व्यावसायिक व आर्थिक संकटांमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेषत: नवागत कर्मचाऱ्यांचे पगार व वेतनमान वाढणे तर दूर पण ते जवळ जवळ जैसे थे राहिले आहेत. ही बाब कर्मचारी व नव्या उमेदवारांसाठी निश्चितच काळजीची ठरली.
कर्मचारी व्यवस्थापन क्षेत्रातील प्रस्थापित कंपनी असणाऱ्या ‘टीमलीज’ ने माहिती तंत्रज्ञान व संगणक क्षेत्रातील मानव व्यवस्थापन क्षेत्रात प्रामुख्याने काम करणाऱ्या व्यवस्थापन कंपनीने त्या दरम्यान केलेल्या कर्मचारी सर्वेक्षणात सर्वेक्षणानुसार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या उमेदवार-कर्मचाऱ्याचे 2015 मध्ये असणारे 3 लाख 50 हजार रुपये इतके वार्षिक सरासरी वेतन 2024 मध्ये सुमारे 3 लाख 80 हजार रुपये होते, असे म्हटलेले आहे. ही बाब संबंधीत कंपन्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांसाठीच मोठा काळजीचा विषय ठरला.
तसे पाहता गेल्या सुमारे 2 वर्षात कृत्रिम बुद्धिमत्ता या नवीन आयामाची चर्चा सुरु झाली. या नवीन तंत्राचा वापर आणि त्याचे माहिती तंत्रज्ञानासह विविध व्यावसायिक क्षेत्रांवर होणारे परिणाम याची व्यापक चर्चा अद्यापही सुरु आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता व त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर झालेल्या परिणामांमुळे संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यमान कर्मचाऱ्यांवर नोकरी-रोजगार गमावण्याचे व या क्षेत्रातील नवागतांपुढे नोकरी-रोजगार न मिळण्याचे संकट निर्माण झाल्याचे या निमित्ताने प्रचलित होत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा व्यावसायिक वापर व त्याचे प्रचलित कर्मचाऱ्यांचे रोजगार व नव्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराच्या संधी हे आव्हानात्मक मुद्दे महत्त्वाचे असले तरी त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र व तेथील कर्मचारी यांनी निराशेतून आपण सर्वस्व गमावले वा गमवावे लागणार अशी नकारात्मक भावना घेण्याचे मुळीच कारण नाही. याचे महत्त्वाचे व प्रमुख कारण म्हणजे संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान या व्यवसाय क्षेsत्राला संपूर्ण व समर्थपणे पर्याय बनण्याची क्षमता कृत्रिम बुद्धिमत्ता विषयात उपलब्ध झाली नाही व तसे शंभर टक्के होण्याची क्षमता पण नाही. माहिती तंत्रज्ञानातील व्यवस्थापनापासून विशेष तांत्रिक स्वरुपाचे काम, तांत्रिक मुद्यांची सोडवणूक यासारखी मोठी व महत्त्वाची कामे संगणकशास्त्र विषयाशी संबंधित राहणार आहेत.
एवढेच नव्हे तर माहिती तंत्रज्ञान विषयातील काम करणाऱ्यांनी आपले संगणकीय ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव याचा परिणामकारक व यशस्वी वापर केल्यास एक नवे कार्यक्षेत्र त्यांच्यासाठी उपलब्ध होण्याची आशादायी शक्यता आहे.
-दत्तात्रय आंबुलकर