महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाविकांच्या गर्दीचे आव्हान

10:48 AM Jan 10, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर/ संग्राम काटकर : 

Advertisement

अंबाबाई मंदिर व परिसरातील भाविकांच्या गर्दीवर पोलीस, देवस्थान समितीच्या सुरक्षारक्षकांचा सतत वॉच आहे. दर्शनरांगेतून भाविकांना अंबाबाईच्या गाभाऱ्याच्या उंबरठ्यापर्यंत शिस्तबद्धपणेच सोडले जाते. त्यामुळे मंदिर व आवारात चेंगराचेंगरीसारखा प्रकार होऊ शकत नाही. बुधवारी तिरुपती बालाजी मंदिरात भाविकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीला समोर अंबाबाई मंदिर व परिसरात संकटकाळी भाविकांना सुरक्षित राहण्यासाठी असेंब्ली पॉईंट तयार करावा लागेल, हा मुद्दा समोर येत आहे. अंबाबाईच्या मुखदर्शनासाठी मंदिरातील गणपती चौकातील अरूंद जागेत होणाऱ्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणारी व्यवस्थाही उभारावी लागणार आहे. कारण मुखदर्शनासाठी येणारे बहुतांश  परगावचेचे व स्थानिक भाविक हे घाईगडबडीत असतात. गणपती चौकात सतत चेंगराचेंगरी होत असते. त्यामुळे याकडे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने गांभिर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.

Advertisement

काही दिवसांपूर्वी अंबाबाई मंदिराजवळील संत गाडगे महाराज पुतळ्यानजिकच्या डीपीला आग लागली होती. या आगीने परिसरात भीतीचे वातावरण होते. अशा घटना समोर ठेवून मंदिर आवारातील 40 वर्षांपूर्वीच्या विद्यूत व्यवस्था, वायरिंगकडेही गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.  जुनाट वायरिंग बदलण्यासाठीही पुढाकार घ्यावा लागणार आहे. मंदिर आवारातील अनेक वर्षे बंद कारंजाही हटवावा लागणार आहे.

दरम्यान, कोरोनानंतर परगावाहून रोज 30 ते 35 हजारांवर भाविक अंबाबाईच्या दर्शनाला येत असल्याचे निदर्शनास येत आहे. सणांच्या सुट्टींना जोडून येणाऱ्या शनिवार-रविवारच्या सुट्टींदिवशी तर भाविकांची संख्या एक लाखांवर जाते. 2024 मध्ये वर्षभरात तब्बल सव्वाकोटी स्थानिक व परगावचे भाविक दर्शनासाठी अंबाबाई मंदिरात आल्याची नोंद देवस्थान समितीच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाकडे झाली आहे. नवरात्रोत्सव काळात तर रोज लाखांवर भाविक मंदिरात ये-जा करत असतात. रात्री होणाऱ्या देवीच्या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होत असतात. मंदिरातील व्हरांड्यासह आवारातून भाविकांच्या मोठ्या गर्दीचा वेढा पडलेला असतो. अशा गर्दीचा आणि भविष्यातील संभाव्य गर्दीचा विचार करुन अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला प्राधान्य देणे जरुरीचे झाले आहे.

आराखड्याच्या अंमलबजावणीमुळे भाविकांसाठी बाथऊमच्या व्यवस्थेपासून अगदी दर्शन रांग, वाहनतळापर्यंतची सर्व व्यवस्था नीटनेटकेपणे करणे सोपे जाणार आहे. शिवाय मंदिर परिसरातील मोकळी होणारी मोठी जागा भाविकांना खुलेपणाने वावरण्यास मिळणार आहे. गतवर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी मंदिर परिसराभोवतीने असलेल्या बाजारपेठेतील दुकानदार, व्यापारी व रहिवाशांना एकत्र आणले होते. या सर्वांनी विकासाला प्राधान्य देत आपली जागा देण्यास जागा काही अटी घालून सकारात्मकताही दाखवली होती.

काही महिन्यापूर्वी मंदिर परिसर विकास आराखडाही तयार केला होता. परंतु त्यानंतर आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पुढील कार्यवाहीला अपेक्षित गती मिळाली नाही. त्यामुळे आराखडा सध्यातरी अंधातरीच राहिला आहे. अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याची अंमलबजावणी होईपर्यंत अंबाबाई मंदिर परिसरातील शेतकरी संघाच्या कार्यालयाचा तळमजला भाविकांच्या सोयीच्या देवस्थान समितीच्याच ताब्यात असावा लागेल, असेही देवस्थान समितीचे म्हणणे आहे.

अंबाबाई मंदिर आवारात असलेला कारंजा अनेक वर्ष बंद आहे. मंदिरातील मोठी जागा अडवून राहिलेला हा कारंजा हटवण्यासाठी देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी पुढाकार घेतला होता. परंतु काही कारणास्तव कारंजा हटवला गेला नाही. गेल्या महिन्यात देवस्थान समितीनेही कारंजा हटवण्यासाठी हेरिटेज कमिटीकडे मागणी केली आहे. त्यांच्याकडून सहमती मिळल्यास तातडीने कारंजा हटवला जाईल, असे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.

सणांच्या सुट्टींना जोडून येणाऱ्या शनिवार-रविवारच्या सुट्टींमध्ये रोज परगावाहून 70 हजारांपासून ते 1 लाखांवर भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. ज्यांना रांगेतून दर्शन घेणे शक्य होत नाही, ते मंदिरातील गणपती चौकातील अरुंद जागेतून अंबाबाईचे मुखदर्शन घेतात. परगावच्या भाविकांच्या गर्दीत स्थानिक भाविकही मिसळून जात असतात. त्यामुळे गणपती चौकातील अगदीच अरुंद जागेत मोठी गर्दी होत असते. हा मुद्दा देवस्थान समितीच्या निदर्शनास आणून दिला. यावर नाईकवाडे म्हणाले, अंबाबाईच्या मुखदर्शनासाठी गणपती चौकात होणाऱ्या गर्दीकडे गांभिर्याने पहावे लागेल. गर्दीत चेंगराचेंगरीचा प्रकार घडू नये, यासाठी गणपती चौकात भाविकांना सोडण्यासाठी आणि चौकातून भाविकांना बाहेर आणण्यासाठी देवस्थान समितीचे कर्मचारी तातडीने तैनात केले जातील

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article