भूकंपाचे अचूक पूर्वानुमान करण्याचे आव्हान
रशियात अलीकडेच दि. 29 जुलै रोजी मोठा भूकंप झाला. रशियातील कामचटका द्विपात 8.8 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने समुद्राने रौद्ररूप धारण केल्याने तीव्र स्वरूपाच्या लाटांनी ‘त्सुनामी’चे रूप धारण केल्याने सिव्हेरो आणि कुरीतसाल्क शहरात प्रचंड नुकसान झाले. या भूकंपाने संपूर्ण प्रशांत महासागर परिसरात खळबळ माजवली. ‘रशियन अकॅडेमी ऑफ सायन्सेस’ च्या भूभौतिक सर्वेक्षणाने प्रसिद्ध केलेल्या ड्रोन फुटेज वरून त्सुनामींच्या लाटांनी हाहाकार माजवल्याचे दृश्य समोर आले आहे. 1952 नंतरचा हा सर्वात शक्तीशाली भूकंप मानला जातो आहे. त्यामुळे तब्बल 4 मीटर उंचीच्या लाटांनी या भागात कहर केला. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. महत्त्वाचे म्हणजे या भूकंपानंतर जपानमध्येसुद्धा त्सुनामी आली.
पंधरा वर्षांपूर्वी जपानमध्ये आलेल्या महाभयंकर त्सुनामीची आठवण यावेळी अनेकांना आली. त्यावेळच्या भूकंपाची तीव्रता आजच्या भूकंपापेक्षा जास्त म्हणजे 9रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती. या भयंकर भूकंप आणि त्यानंतरच्या त्सुनामी संकटामुळे जपानला तातडीने किनारी भाग रिकामा करावा लागला होता. समुद्रात भूकंपामुळे आलेल्या त्सुनामीमुळे जपानच्या फुकुशिमा अणुकेंद्रात मोठा स्फोट झाला होता. त्यामुळे रेडिओऍक्टिव्ह किरणोत्सर्गाचा धोका खूपच वाढला होता. यावेळी जपानला जीवित हानीबरोबर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागले होते.
यानिमित्ताने भूकंपाचे पूर्वानुमान शक्य आहे का? यावर पुन्हा चर्चांना तोंड फुटले आहे. मोठ्या भूकंपाच्या धक्यांनी खूपच नुकसान होऊ लागल्यावर आता भूकंपाचे पूर्वानुमान करण्याच्या वेगवेगळ्या नव्या संशोधन पद्धतीविषयी शात्रज्ञांत नवनव्या प्रोजेक्टविषयी चर्चा झडू लागल्या आहेत. भूकंपाचे अचूक पूर्वानुमान शक्य नाही असेच आजवरच्या संशोधनाचे फलित आहे. आताच्या भूकंपाचे सविस्तर विश्लेषण करण्यात येत आहे. 20 जुलै ते 30 जुलै या दहा दिवसांत एकूण 125 भूकंपाचे धक्के बसले. मुख्य मोठा भूकंप जुलै 29 रोजी झाला. त्याआधी भूकंपाचे 50 सौम्य धक्के आठ दिवसांत जाणवले आणि 29 तारखेनंतर 74 सौम्य स्वरूपाचे धक्के बसले आहेत. काही धक्के तर 7.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे होते. त्यामुळे 50 छोटे भूकंपाचे जे छोटे धक्के सलग आठ दिवस जाणवले त्याचा अभ्यास करून भविष्यातील येऊ घातलेल्या मोठ्या भूकंपाच्या मोठ्या धक्याचे पूर्वानुमान करता येऊ शकेल का याची शास्त्राrय मांडणी आता शात्रज्ञ नव्या रूपात करू लागले आहेत. प्रत्येक भूकंपाचा धक्का कांहीतरी सांगतो आहे. भूकंपाचे शास्त्राrय तसेच अभियांत्रिकीय विश्लेषण करून नव्या गणितीय प्रारूपामधून संशोधनाची मांडणी केली जाते आहे. याआधी झालेले मोठे भूकंप याचे सविस्तर शास्त्राrय विश्लेषण हेच सांगते आहे की एक मोठा भूकंपाचा धक्का संपूर्ण राष्ट्राला मोठी किंमत मोजायला लावू शकतो.
अतिसंहारक भूकंपाचा अभ्यास केल्यावर असे दिसून येते आहे की 1961 मध्ये पॅसिफिक महासागरात 1960 साली 9.5 रिश्टर स्केल या तीव्रतेचा धक्का बसला होता. चिली या देशाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली होती. त्यानंतर 2011 मध्ये जपानला 9.1 रिश्टर स्केल या तीव्रतेचा धक्का बसला होता. भूगर्भात ज्या हालचाली होत आहेत त्याचाच परिणाम म्हणजेच हे मोठे भूकंप हेच आहे. नॉर्थ अमेरिका प्लेट ही दरवर्षी 9 सेंटीमीटरने सरकत आहे. इंडियन प्लेट ही दरवर्षी 5 सेंटीमीटरने सरकत आहे. पॅसिफिक महासागराला ‘रिंग ऑफ फायर’ असे संबोधले जाते कारण 90 टक्के भूकंप हे याच क्षेत्रांत होत आहेत. पृथ्वीच्या गर्भातील होणाऱ्या या ‘प्लेट’च्या एकमेकांशी होणाऱ्या घर्षणाने तीव्र स्वरूपात ऊर्जा भूकंपाच्या धक्यांनी बाहेर पडते आणि पृथ्वीतलावर या उर्जेच्या बाहेर पडण्याने मोठा विनाश घडून येतो. अशा भूकंपाचे पूर्वानुमान अद्याप शास्त्राrयदृष्ट्या अचूकपणे देणे जमलेले नाही. 1975 मध्ये चीन ‘हैचेंग’ शहरात मोठा भूकंप आला होता. त्याचे पूर्वानुमान एकदम अचूक आले होते. पण त्याच शास्त्राrय कसोटींवर इतर भूकंपाचे पूर्वानुमान अपयशी ठरले. त्यामुळे ती पूर्वानुमानची शास्त्राrय पद्धत स्वीकारार्ह ठरली नाही. या घटनेच्या पन्नास वर्षांनंतरही भूकंपाचे पूर्वानुमान करणे हे शात्रज्ञांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरले आहे.
भारताला भूकंपाने चांगलाच तडाखा दिला आहे. उत्तर भारत, अंदमान निकोबार बेटे शेजारील नेपाळ, पाकिस्तान येथे वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतातच. 1993 साली महाराष्ट्रातील किल्लारी आणि लातूर ही गावे मोठ्या भूकंपाने पूर्णपणे कोलमडून गेली होती. गुजरातमधील भूज येथे 2001 साली मोठ्या भूकंपाने खूप मोठी हानी झाली होती. भूकंपाने खूप मोठा भाग विस्कळीत होऊन जातो. जीवित हानी होते. हे टाळण्यासाठी भूकंपाचे अचूक पूर्वानुमान वर्तवण्यासाठी संशोधन वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वच राष्ट्रांनी एकत्र येऊन संशोधन निधी उभारून नव्याने संशोधन सुरु केल्यास मोठ्या भूकंपाने होणाऱ्या अपरिमीत नुकसानीवर दिलासादायक मार्ग नक्कीच निघू शकेल.
प्रा.डॉ.गिरीश नाईक