भारतीय संघापुढे आज मालिका पराभव टाळण्याचे आव्हान
वृत्तसंस्था / कोलंबो
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना आज बुधवारी येथे होणार असून मागील 27 वर्षांतील श्रीलंकेविरुद्धचा पहिला मालिका पराभव टाळण्याचे आव्हान भारतासमोर आहे. हे आव्हान पेलण्याची आणि कर्णधार रोहित शर्माने दाखवून दिलेल्या मार्गाचा अवलंब करत फिरकी माऱ्याचा कुशलतेने सामना करण्याची जबाबदारी भारतीय फलंदाजांवर, विशेषत: विराट कोहलीवर असेल.
संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिल्या वनडे मालिकेत गौतम गंभीरला ही सुऊवात नक्कीच अपेक्षित नसेल. भारताचा श्रीलंकेविरुद्धचा मागील एकदिवसीय मालिका पराभव 1997 मध्ये झाला होता. त्यावेळी अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखालील लंकेने सचिन तेंडुलकर आणि त्याच्या संघाचा 0-3 असा पराभव केला होता. तेव्हापासून भारत आणि श्रीलंका यांच्यात 11 द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळल्या गेल्या आहेत आणि त्या सर्वांचा निकाल ‘मेन इन ब्ल्यू’च्या बाजूने लागलेला आहे.
दुसया एकदिवसीय सामन्यात यजमानांनी 32 धावांनी पराभूत केल्याने आणि पहिला सामना टाय झालेला असल्याने भारत ही तीन सामन्यांची मालिका जिंकू शकणार नाही. ही परिस्थिती फलंदाजांनी संघावर आणली आहे, जे फिरकीस मदत करणाऱ्या खेळपट्टीवर खेळताना त्रस्त दिसलेले आहेत. स्टार फलंदाज कोहलीने दोन सामन्यांमध्ये केवळ 38 धावा केल्या आहेत. परंतु धावांच्या संख्येपेक्षा त्याच्या बाद होण्याच्या पद्धतीमुळे अधिक चिंता निर्माण झाली आहे. रोहितने करून दिलेल्या धडाकेबाज सुऊवातीनंतरही कोहली दबावाखाली दिसला.
शिवम दुबेच्या रूपाने भारताकडे फटकेबाज असला, तरी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो चमक दाखवू शकला नाही. श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल यांनीही भूतकाळात फिरकीवर प्रभुत्व दाखविलेले आहे, परंतु येथे लंकेच्या संथ गोलंदाजांविऊद्ध त्यांना त्याची पुनरावृत्त्ती घडविता आलेली नाही. सध्याच्या परिस्थितीत फिरकी टाकू शकणारा रियान पराग मध्यमगती गोलंदाजी टाकणाऱ्या दुबेपेक्षा अधिक सुलभ उपयुक्त दिसतो. शिवाय तो तितकाच चांगला हार्ड-हिटर आहे.
संघ : भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, के. एल. राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
श्रीलंका : चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, निशान मदुष्का, दुनिथ वेललागे, चमिका कऊणारत्ने, अकिला धनंजया, मोहम्मद शिराझ, महीश थीक्षाना, असिथा फर्नांडो, इशान मलिंगा, जेफ्री वँडरसे.
सामन्याची वेळ : दुपारी 2.30 वा.