For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यवर्ती बसस्थानक असुविधांच्या गर्तेत

01:16 PM Jun 02, 2025 IST | Radhika Patil
मध्यवर्ती बसस्थानक असुविधांच्या गर्तेत
Advertisement

कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :

Advertisement

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक स्वच्छ आणि सुंदर असायला हवे. मात्र बसस्थानकात फेरफटका मारला असता सर्वत्र अस्वच्छता जाणवली. सुट्यामुळे एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून आली. तर पावसामुळे संपूर्ण बसस्थानकाच्या आवारात दलदल आणि पाण्याची डबकी होती. या डबक्यातूनच प्रवासी उड्या मारत बसमागे धावत होते. येथील स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय आहे. एसटीची पाणपोई कधीच इतिहास जमा झाली आहे. याठिकाणी एका संस्थेकडून पाणपोई सुरु आहे. बसस्थानकाच्या आवारात काही ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवले आहेत. यामुळे ते निसरडे झाले असून पाय घसरुन प्रवासी घटना वाढत आहेत.जिल्ह्याचे मध्यवर्ती बसस्थानक असूनही याठिकाणी प्रवाशासाठी म्हणाव्या तितक्या सुविधा  नाहीत.

 सर्व फलाटावर बसच्या प्रतीक्षेत प्रवाशांची गर्दी दिसून आली. अजूनही बहुतांश प्रवाशांना कोणती बस कुठे जाते याची माहिती नसते, यामुळे अनेक ज्येष्ठ प्रवासी बसच्या चालक किंवा वाहकांना विचारताना दिसून आले. आपली बस लागली आहे का ते पाहण्यासाठी प्रवासी धावपळ करताना या फलाटावर दिसून आले. फलाट क्रमांक आठवर चंदगड, गडहिंग्लज, नेसरी, कोवाड, दोडामार्ग, पणजी, फलाट क्रमांक नऊवर सावंतवाडी, वेंगुर्ला, आंबोली, फलाट क्रमांक दहावर बेळगाव, सौंदत्ती, बेंगलोर, हुबळी, रामदुर्ग, धारवाड, शिमोगा फलाट क्रमांक अकरावर भटकल सिरशी, कुमठा, दांडेली, कारवार, बैलहोंगोल फलाट क्रमांक बारावर रत्नागिरी, गणपतीपुळे, चिपळूण, विशाळगड, देवरुख, लांजा, मलकापूर फलाट क्रमांक तेरावर पणजी, सावंतवाडी, बांदा, वेंगुर्ला, देवगड, मालवण फलाट क्रमांक 14 वर राधानगरी, गगनबावडा, राजापूरला जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून आली. बसस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी जागा अपुरी पडल्यामुळे अनेक प्रवासी आपले साहित्य घेऊन फलाटासमोर गर्दी करून उभे होते. वाहतूक नियंत्रण कक्षा समोरही चौकशीसाठी प्रवाशांची गर्दी दिसून आली.नियंत्रण कक्षातून प्रवाशांना आणि बसच्या चालकांना वारंवार सूचना करण्यात येत होत्या. तसेच गर्दीमुळे पर्स, दागिने सांभाळण्याच्या सूचना वाहतूक नियंत्रण कक्षातून करण्यात येत होत्या.

Advertisement

  • पुण्यासाठी अर्ध्या तासाला बस

पुणे-मुंबई फलाट स्वतंत्र आहे. या फलाटावरुन पुणे आणि मुंबईसाठी बसेस धावतात. मुंबईसाठी शक्यतो रात्रीच्या वेळी बसेस आहेत. मात्र पुण्यासाठी अर्ध्या तासाला बस आहे. शिवशाही, शिवाई, परिवर्तनसह साध्या बसेस पुण्यासाठी आहेत. या फलाटावरही प्रवाशांची चोवीस तास वर्दळ असते. मात्र अर्ध्या तासाला बसेस असल्यामुळे प्रवाशांची गर्दी दिसत नाही.

  • स्वच्छतागृह नव्हे दलदल

मध्यवर्ती बसस्थानकाच्या पूर्वेला पुरुष आणि महिला अशी दोन स्वच्छतागृहे आहेत. पण या दोन्ही स्वच्छता गृहांची प्रचंड दूरवस्था दिसून येते. स्वच्छतागृहाच्या दारातच म्हणजे आत प्रवेश करताना पाण्याच्या डबक्यातून जावे लागते. पुरुष स्वच्छतागृहामध्ये प्रचंड दलदल निर्माण झाली आहे. छताचे पत्रे फुटले आहेत, यामुळे पावसाचे पाणी टपकते. एसटी प्रशासनाचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे.

  • पेव्हिंग ब्लॉकमुळे निसरडे रस्ते

मध्यवर्ती बस स्थानकाच्या आवारात तांत्रिक कारणामुळे डांबरीकरण झालेले नाही. मात्र काही ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आले आहेत. हे ब्लॉक सर्वत्र न बसवता अर्धवट बसवले आहेत. यामुळे आवारात काही ठिकाणी दलदल दिसून येत आहे. तसेच पावसामुळे रस्ते निसरडे झाले असून प्रवासी पाय घसरुन पडत आहेत.

  • पाणपोईकडे जाण्यासाठी कसरत

बस स्थानकाच्या पूर्वेला एका संस्थेची पाणपोई आहे. या पाणपोयीच्या समोरच प्रचंड चिखल झाला आहे. यामुळे पाणी पिण्यासाठी पाणपोईत जायचे कसे असा प्रश्न प्रवाशांना पडतो.

  • बसस्थानक पडते अपुरे

मध्यवर्ती बसस्थानकात महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बसेस येतात. रोज दीड ते दोन हजार बसेस येतात आणि जातात. यामुळे चोवीस तास बसस्थानक गजबजलेले असते. दिवसातील अनेक वेळा बसेसची गर्दी होत असल्यामुळे स्थानकातील जागा अपुरी पडते. यामुळे मागे बसेसची रांग लागते. परिणामी बसस्थानकाच्या बाहेर मुख्य रस्त्यावर सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याचे दिसून आले.

  • वर्कशॉप दलदलीत

बस स्थानकाच्या दक्षिणेला म्हणजे पुणे -मुंबई फलाटाच्या मागे एसटीचे वर्कशॉप आहे. या वर्कशॉपमध्ये नादुरुस्त बसेसचे काम केले जात होते. पण वर्कशॉपच्या आवारात सुद्धा खड्डे आणि प्रचंड दलदल दिसून आली. यासाठी एसटीचे कोणतेही नियोजन नसल्याचे दिसून येते.

Advertisement
Tags :

.