कोकण रेल्वेला केंद्र थेट विद्युत पुरवठा करणार
कर्नाटक ऊर्जा महामंडळातर्फे उभारण्यात आलेल्या विद्युत ग्रीडचे उद्घाटन
कारवार : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेना कर्नाटक ऊर्जा महामंडळाकडून थेट विद्युत पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या विद्युत ग्रीडचे उद्घाटन कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्या हस्ते करण्यात आले. येथून 30 कि. मी. अंतरावर कद्रा येथे काळी नदीवरील जल ऊर्जा केंद्रातून 150 मेगावॅट इतकी विद्युत निर्मिती केली जाते. आता या जलऊर्जा केंद्रातून कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना थेट विद्युत पुरवठा केला जाणार आहे.
राज्यातील विद्युत पुरवठा कंपन्यांच्याकडून कोकण रेल्वे महामंडळाला विद्युत उपलब्ध करून दिली जाते. किनारपट्टीवरील जिल्ह्यातील मुलकी, ब ारकूर, सेनापूर, कुंदापूर, मुर्डेश्वर, कुमठा, कारवार आदी विद्युत ग्रीडकडून कोकण रेल्वेला विद्युत पुरवठा केला जातो. तथापि या ग्रीडमध्ये काही तांत्रिक बिघाड किंवा व्यत्यय निर्माण झाल्यास रेल्वे धावण्यासाठी शेजारच्या गोव्यातील बाळ्ळी येथील ग्रीडमधून वीजपुरवठा केला जातो. या समस्येवर मात करण्यासाठी कर्नाटक ऊर्जा महामंडळाकडून थेट वीज घेण्यासाठी ऊर्जा महामंडळाने ओपन अॅक्शन बिलीराची व्यवस्था केली आहे.
विद्युतपुरवठा खंडित झाला तरी रेल्वे धावण्यावर परिणाम नाही
कद्रा येथील जलऊर्जा उत्पादन केंद्रातून 110 मेगावॅट क्षमतेची विद्युत वाहिनी ओढून विद्युत संपर्क घेण्यात आला आहे. असे केल्याने एकाद्यावेळी मुर्डेश्वर, कुमठा येथून होणारा विद्युत पुरवठा खंडित झाला तरी गोव्यावर अवलंबून रहायची गरज नाही. नवीन ग्रीडमध्ये व्होल्टेज स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी आधुनिक व्यवस्था करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर निरंतर विद्युत पुरवठा करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. असे केल्याने एकाद्या विद्युत ग्रीडमधून होणारा विद्युतपुरवठा खंडित झाला तरी रेल्वे धावण्यावर परिणाम होणार नाही. या व्यवस्थेमुळे कोकण रेल्वे मार्गावर आणखीन गुड्स आणि प्रवाशी रेल्वे सुरू करण्यास मदत होणार आहे. यामुळे रेल्वेच्या महसुलातही वाढ होणार आहे असे कोकण रेल्वे महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.