मांजराला स्थानबद्धतेची शिक्षा
मांजरे, कुत्री आदी प्राणी पाळण्याचा छंद अनेकांना आहे. हे प्राणी नेहमी घरात राहू शकत नाहीत. विशेषत: मांजरांना तर बाहेर फिरण्याची हौसच असते. ही मांजरे मग दुसऱ्याच्या घरातील खाद्यपदार्थ फस्त करतात. मग अशा घराचे मालक आणि मांजरांचे मालक यांच्यात भांडणे होतात. हे सर्व प्रकार आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलेले तरी असतात किंवा ऐकलेले असतात. अशाच एका प्रकरणात एका न्यायालयाने मांजराला स्थानबद्धतेत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
ही घटना फ्रान्स देशाच्या एग्डे नामक शहरातली आहे. या शहरात राहणाऱ्या एका महिलेने मांजरी पाळली होती. ही मांजरी नेहमी शेजारच्या घराच्या बागेत जाऊन तेथे नासधूस करीत असे. त्यामुळे शेजारच्या घरातील महिलेने ही मांजरी आणि तिच्या मालकिणीच्या विरोधात पोलीसांमध्ये तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर अखेर प्रकरण न्यायालयात पोहचले. न्यायालयात रीतसर मांजरी आणि तिची मालकीण यांच्या विरोधात अभियोग चालविण्यात आला. अखेर न्यायालयाने मांजरीच्या मालकीणीला आदेश दिला की, या मांजरीला कायमचे घरात स्थानबद्ध करुन ठेवण्यात यावे. इतकेच नव्हे, तर मांजरीने शेजारच्या घराच्या बागेची जी हानी केली आहे, तिच्यासंबंधात 1 लाख 15 हजार रुपयांची भरपाईही देण्यात यावी. मांजरीच्या मालकिणीने जर पुन्हा मांजरी बाहेर सोडली आणि ती शेजारच्या घराच्या बागेत गेली, तर अशा प्रत्येक प्रसंगात 2,700 रुपयांची दंड मांजरीच्या मालकिणीला भरावा लागणार आहे.
आपल्याकडेही शेजाऱ्यांची मांजरे अशा प्रकारची हानी काहीवेळा करतात. पण आपण यासंबंधी पोलिसांमध्ये किंवा न्यायालयांमध्ये तक्रार करणे टाळतो. पण युरोपियन देशांमध्ये लोक आपल्या अधिकारांसंबंधी अधिक संवेदनशील असतात. काहीवेळा अतिसंवेदनशील असतात. त्यामुळे तेथे अशा प्रकारच्या तक्रारी पोलीसांमध्ये किंवा न्यायालयांमध्ये सादर केल्या जातात. त्यातलीच ही एक घटना आहे. आपल्यासाठीही ती उद्बोधक आहे. आपला छंद म्हणून पाळलेल्या प्राण्यांनी इतरांना त्रास देऊ नये, हे पाहण्याचे उत्तरदायित्व तर केवळ आपलेच असते, याचे भान ठेवण्यात आले पाहिजे, हा संदेश या घटनेतून सर्वांना मिळतो.