सासपडे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवणार : रुपाली चाकणकर
सासपडे हत्याकांड प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात
सातारा : सासपडे येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिच्या कुटुंबाला न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी या प्रकरणी केस फास्ट्रॅक न्यायालयात चालवली जाणार आहे. राज्य महिला आयोगामार्फत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी शिफारस करणार असल्याचे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी सासपडे येथे जावून चव्हाण कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी उपस्थित होते.
चव्हाण कुटुंबीयांना कोणत्याही प्रकाराचा त्रास होऊ नये, यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, असे सांगून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, मनोधैर्य योजनेतून कुटुंबाला तातडीने मदत करावी. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतूनही कुटुंबाला मदत मिळवून देण्यात येईल. राज्य महिला आयोग आपल्या पाठीशी असून न्यायालयात जास्तीत जास्त पुरावे सादर करुन आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील.
सासपडे सारखी घटना सातारा जिल्ह्यात पुन्हा घडू नये, यासाठी पोक्सोमधील जे गुन्हेगार बाहेर आहेत ते सध्या काय करीत आहेत, याची तपासणी करुन काही गैरवर्तन करीत असल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश श्रीमती चाकणकर यांनी पोलीस विभागाला दिले.