सुनीता विलियम्सना परत आणण्याची मोहीम सुरू
मस्क यांच्या कंपनीने प्रक्षेपित केले अंतराळयान
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
मागील 3 महिन्यांपासून अंतराळात अडकून पडलेल्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आण्यासाठी नासाने मिशन लाँच केले आहे. स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगन अंतराळयानाला दोन अंतराळवीरांसोबत प्रक्षेपित करण्यात आले आहे. अंतराळयानात दोन आसने रिकत असून त्या माध्यमातून सुनीता विलियम्स आणि विल्मोर यांना अंतराळातून परत आणले जाणार आहे. फ्लोरिडाच्या कॅप कॅनावेरल येथून अंतराळयान प्रक्षेपित करण्यात आले आहे.
सुनीता विलियम्स आणि विल्मोर हे आता फेब्रुवारी महिन्यात पृथ्वीवर परतू शकतात. दोघेही बोइंग स्टारलायनर या अंतराळयानाद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले होते. दोन्ही अंतराळवीर 8 दिवसांसाठी अंतराळ स्थानकावर राहणार होते. परंतु बोइंग स्टारलायनरमध्ये बिघाड झाल्याने त्यांना पृथ्वीवर परतता आलेले नाही.
बोइंग स्टारलायनर हे अंतराळयान दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापर्यंत अंतराळात राहिल्यावर पृथ्वीवर रिकामी परतले आहे. त्याचे लँडिंग सुरक्षित राहिले. स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगनद्वारे नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झेंडर गोर्बुनोव यांनी अंतराळासाठी झेप घेतली आहे.
क्रू ड्रॅगनचे प्रक्षेपण गुरुवारी होणार होते, परंतु चक्रीवादळामुळे यात विलंब झाला. फ्लोरिडा, जॉर्जिया आणि टेनेसी तसेच कॅरोलिना येथे या चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. अब्जाधीश एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने क्रू ड्रॅगन या अंतराळयानाची निर्मिती केली आहे. दर 6 महिन्यांनी हे अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर अंतराळवीरांना नेते आणि त्यांना पृथ्वीवर परत आणत असते. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी पहाटे 3 वाजता हे अंतराळयान अंतराळस्थानकाशी जोडले जाणार आहे.