लग्न मोडण्याचा व्यावसाय जोरात
इतरांची लग्ने लावून देण्याचे काम करणारे अनेकजण असतात हे आपल्याला माहित आहे. गेल्या चार पाच दशकांमध्ये तर लग्ने जुळविणे हा व्यवसायच झाला आहे. अनेक वधूवर सूचक मंडळे असतात. मेट्रिमोनियल वेबसाईटस् तर इंटरनेटवर भाराभर सापडतात. आपल्याकडे आजही लग्न हे पवित्र कर्तव्य मानले जातो. सोळा संस्कारांपैकी तो एक महत्वाचा संस्कार मानला जातो. समजा, काही कारणामुळे ठरलेले लग्न मोडले, तर आपल्या समाजात आजही ते योग्य मानले जात नाही.
तथापि, स्पेनमध्ये एक व्यक्ती अशी आहे, की जिचा व्यवसायच ठरलेली लग्ने मोडणे हा आहे. कोणालाही आपले ठरलेले लग्न मोडायचे असेल तर ते या व्यक्तीशी संपर्क करतात. लग्न मोडण्याची त्याची ‘फी’ साधारण 500 युरो किंवा साधरण 47 हजार रुपये इतकी आहे. या रकमेत लग्न रोखण्याची हमी ही व्यक्ती देते. ‘आपण आपल्या ठरलेल्या लग्नाविषयी साशंक आहात पण लग्न मोडण्याचे धाडस आपल्या करता येत नाही अशी स्थिती असेल, तर माझ्याशी संपर्क करा’, अशी त्याच्या व्यवसायाची जाहिरात ही व्यक्ती करत असते.
के वारेया असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने केवळ एक गंमत म्हणून काही वर्षांपूर्वी हा ठरलेली लग्ने मोडण्याचा व्यवसाय करण्यास प्रारंभ केला. आज त्याला इतकी मागणी आहे, की पुढच्या तीन महिन्यांच्या त्याचे बुकिंग झालेले आहे. अनेकदा तरुण-तरुणी लग्न करण्यास तयार नसतात. पण घरच्या लोकांकडून त्यांच्यावर तशी सक्ती केली जाते. अशावेळी त्यांच्यापैकी ज्याला हे लग्न करण्याची इच्छा नसते, तो तरुण किंवा तरुणी वारेया याला गाठतात आणि लग्न रोखण्याचे ‘कंत्राट’ त्याला देतात. तो विविध नाट्यामय मार्गांचा अवलंब करुन लग्न मोडतो. अनेकदा त्याने लग्नघरात वरात आलेली असतानाही, अर्थात अगदी शेवटच्या क्षणी लग्ने मोडली आहेत. वारेया याच्या या कौशल्यामुळे तो नेहमी चर्चेत असतो.