अंडी वितरणाचा शिक्षकांवर वाढतोय बोजा
आठवड्यातून सहा दिवस अंडी वितरणास सुरुवात : केळी-चिक्कीचेही वाटप
बेळगाव : शालेय विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा यासाठी राज्य सरकारने आठवड्यातून सहा दिवस अंडी वाटपाची योजना सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ही योजना जरी उत्तम असली तरी याचा वाढीव बोजा शिक्षकांवर पडणार आहे. अंडी खरेदी करून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर येणार असल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण कार्यक्रमांतर्गत बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 5425 सरकारी व अनुदानित शाळांमध्ये मध्यान्ह आहार वितरीत केला जातो. बेळगाव शहरामध्ये स्वयंसेवी संस्था तर ग्रामीण भागात शाळेमध्येच पोषण आहार तयार केला जातो.
याबरोबरीने मागील दीड ते दोन वर्षांपासून राज्य सरकारकडून आठवड्यातून दोन दिवस अंडी, शेंगा चिक्की व केळी वितरीत केली जात आहेत. शालेय पोषण आहारापेक्षाही अंडी व चिक्कीला विद्यार्थ्यांची मागणी अधिक असल्याचे दिसून आल्याने अझीम प्रेमजी फौंडेशनच्या सहकार्यातून आठवड्यातून सहा दिवस अंडी दिली जाणार आहेत. अंड्यांची रक्कम जरी राज्य सरकारकडून येणार असली तरी त्यांची खरेदी मुख्याध्यापक व एसडीएमसी कमिटीलाच करावी लागणार आहे. बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 6 लाख 20 हजार मुले सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.
या मुलांची रोजची उपस्थिती लक्षात घेऊन अंडी खरेदी करावी लागणार आहेत. जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना शेंगा चिक्की व केळी दिली जात आहेत. अंड्यांचा दर नेहमी स्थिर नसतो. तो हवामानानुसार व कोंबड्यांच्या उपलब्धतेनुसार कमी-जास्त होत असतो. अंडी उकडण्यासाठी लागणारा गॅस सिलिंडर, तसेच वाहतूक खर्च हा सर्व एकत्रित करून अंडी खरेदीची रक्कम द्यावी लागते. बऱ्याचवेळा मंजूर झालेल्या रकमेपेक्षा हा खर्च अधिक असल्याने शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. अनेक विद्यार्थी सोमवारी अंडी खात नसल्याने चिक्की अथवा केळी उपलब्ध करून द्यावी लागतात.