फुलेवाडीच्या पोरांनी घेतली अभिजीतची जबाबदारी
कोल्हापूर / धीरज बरगे :
फुलेवाडीतील पोरांनी अभिजीत श्रीकांत चव्हाण या 33 वर्षीय तरुणाच्या उपचाराची जबाबदारी घेतली आहे. गेली दीड वर्ष पित्ताशयाच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या अभिजीत याच्या लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रीयेसाठी आठ लाख रुपयांचा खर्च आहे. हि रक्कम उभा करण्यासाठी येथील पोरं कामाला लागली आहेत. परिसरातील 35 तालीम मंडळे दहा हजार रुपये अथवा त्याहून अधिक अशी आपआपल्या परिने मदत करणार आहेत. तसेच समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थां यांना देखिल मदत करण्याचे आवाहन केले आहे. जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर असलेल्या मित्राला जिवनदान देण्यासाठी फुलेवाडीमधील तरुणांनी उचललेले पाऊल शहरातील तालीम, मंडळांसाठी आदर्शवत असे आहे.
फुलेवाडी पाचवा बस स्टॉप येथे अभिजीत चिले हे त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. सर्वसामान्य कुटुंबातील अभिजती यांचे वडील रिक्षा व्यवसायिक आहेत. तर अभिजीत एका मोबाईल कंपनीचा प्रमोटर म्हणून काम करत होते. कोणतेही व्यसन नसतानाही साधारणत: दीड वर्षांपुर्वी अभिजीत पित्ताशयाच्या आजाराने त्रस्त असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर गेली दीड वर्ष औषधोपचार सुरु आहेत. मात्र त्यांचा त्रास कमी न झाल्याने डॉक्टरांनी त्यांना लिव्हर तातडीने बदलणे आवश्यक असल्याचे सांगितले. लिव्हर प्रत्यारोपणासाठी सुमारे 20 लाख रुपयांचा खर्च आहे. तर शस्त्रक्रीये व्यतिरिक्त आणखी आठ लाख रुपये असा एकूण 28 लाख रुपये खर्च येणार आहे.
अभिजीत यांनी नोकरी करत जमवलेले पैसे गेली दीड वर्ष सुरु असलेल्या औषधोपचारांवरच संपले आहेत. आजारपणामुळे त्यांना नोकरीही सोडावी लागली. त्यामुळे आता इतकी मोठी रक्कम जमविण्याचे संकट सर्वसामन्य चिले परिवारासमोर उभे आहे. लिव्हर प्रत्यारोपणसाठी येणार 20 लाख रुपयांचा खर्च शासकीय योजनेतून होणार आहे. तरी देखिल सद्यस्थितीत आठ लाख रुपयांची रक्कम उभा करण्याचे आव्हान चिले कुटुंबासमोर आहे. चिले कुटुंबावरील या संकटाची माहिती अभिजीत यांचे मित्र शिव आरोग्य सेनेचे जिल्हा समन्वयक विकी मोहिते यांना समजली. त्यांनी आपला मित्र चिले यांच्यासाठी उपचाराची रक्कम उभी करण्यासाठी पाऊले उचलली. फुलेवाडीमधील प्रमुख 35 मंडळांशी संपर्क साधत या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार सर्व मंडळांनी आपआपल्या परीने मदत करण्याची तयारी दर्शवली. प्रत्येकी दहा हजार अथवा त्याहून अधिक अशी रक्कम येथील मंडळे चिले कुटुंबियांना देणार आहेत.
मंडळांनी मदतीचा हात पुढे केला आहेच, त्याचबरोबर फुलेवाडीमधील प्रतिष्ठीत, दानशूर व्यक्तींची भेट घेवून त्यांनाही चिले यांच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन येथील तरुण करणार आहेत. तसेच सोशल मीडियावरुन मदतीचे आवाहन करणारा संदेश व्हायरल करत उपचारासाठीची रक्कम उभा करण्याची मोहित येथील तरुणांनी हाती घेतली आहे. अभिजीत यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला आहे. त्यामुळे आपल्या मित्राचा संसार पुन्हा फुलविण्याठी फुलेवाडीमधील तरुण उपचाराची रक्कम उभा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत.