For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोलंदाजांनी दिवस गाजवला, दुसऱ्या दिवशी 17 बळी

06:58 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोलंदाजांनी दिवस गाजवला  दुसऱ्या दिवशी 17 बळी
Chennai: India’s Akash Deep celebrates with teammates after taking the wicket of Bangladesh's Zakir Hasan on the second day of a test cricket match between India and Bangladesh, at the MA Chidambaram Stadium, in Chennai, Friday, Sept. 20, 2024. (PTI Photo/R Senthilkumar) (PTI09_20_2024_000088B)
Advertisement

बांगलादेशला 149 धावांवर गुंडाळले : बुमराहचे 4, आकाशदीप, सिराजचे प्रत्येकी 2 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा ‘चौका’ आणि त्याला मोहम्मद सिराज, आकाशदीप व जडेजाने प्रत्येकी दोन बळी घेत दिलेली साथ या जोरावर टीम इंडियाने बांगलादेशला पहिल्या डावात 149 धावांवर गुंडाळले. यानंतर दुसऱ्या दिवसअखेर भारताने 3 बाद 81 धावा अशी मजल मारली आहे. भारतीय संघाने 308 धावांच्या एकूण आघाडीसह विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.  दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा शुभमन गिल 33 तर रिषभ पंत 12 धावांवर खेळत होते. टीम इंडियाने पहिल्या डावात 376 धावा केल्या. विशेष म्हणजे, सामन्याचा दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजवला. चेपॉकच्या खेळपट्टीवर तब्बल 17 विकेट्स पडल्या.

Advertisement

प्रारंभी, टीम इंडियाने 6 बाद 339 धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. पण, अवघ्या 37 धावांची भर घातल्यानंतर भारताचा पहिला डाव 376 धावांवर आटोपला. जडेजा पहिल्या दिवशी 86 धावांवर खेळत होता आणि त्याच धावसंख्येवर तो बाद झाला. त्यानंतर भारताच्या तळाच्या फलंदाजांना जास्त काळ तग धरता आला नाही. शतकवीर अश्विनला केवळ 11 धावांची भर घालता आली. तस्कीन अहमदने त्याला 113 धावांवर बाद केले. तळाचे फलंदाजही झटपट बाद झाल्याने भारताला चारशेचा आकडा गाठता आला नाही. बांगलादेशकडून हसन मेहमूदने 5 तर तस्कीन अहमदने 3 बळी घेतले.

बुमराह, आकाशदीप, सिराजसमोर बांगलादेशचे लोटांगण

चेपॉकच्या लाल मातीच्या खेळपट्टीवर बांगलादेशचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. बुमराहने पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर शादनाम इस्लामला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर नवव्या षटकांत आकाश दीपने बांगलादेशला दोन धक्के दिले. त्यामधून ते शेवटपर्यंत सावरू शकले नाहीत.  कर्णधार नजमुल शांतोने 20 धावा केल्या. सिराजने त्याला कोहलीकरवी झेलबाद केले. अनुभवी मुशफिकूर रहीमही बुमराहची शिकार ठरला. धावसंख्या 40 असताना बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत परतला होता.

या बिकट स्थितीत शकीब अल हसन व लिटन दास यांनी अर्धशतकी भागीदारी साकारत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी मैदानात सेट झाली असतानाच जडेजाने लिटन दासला 22 धावांवर बाद केले. यानंतर शकीबही त्याच्या जाळ्यात अडकला. शकीबने सर्वाधिक 32 धावांची खेळी साकारली. यानंतर ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्याने बांगलादेश संघ 149 धावांवर ऑलआऊट झाला. मेहंदी हसन मिराज 27 धावांवर नाबाद राहिला तर तळाचे फलंदाज फ्लॉप ठरले. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 गडी बाद केले. आकाशदीप, मोहम्मद सिराज व रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.

भारताकडे 308 धावांची आघाडी, रोहित, विराट पुन्हा फ्लॉप

बांगलादेशचा पहिला डाव 149 धावांत संपल्यानंतर भारताकडे पहिल्या डावात 227 धावांची आघाडी होती. परंतु भारताने फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल व कर्णधार रोहित शर्मा यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. पण, या डावातही रोहित अपयशी ठरला. 5 धावा काढून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. यशस्वी जैस्वालही अवघ्या 10 धावांवर बाद झाला. यानंतर विराट व शुभमन यांच्यात 39 धावांची भागीदारी झाली. ही जोडी मैदानात सेट झाली असताना विराट पंचाच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला. 17 धावांवर त्याला मेहंदी हसन मिराजने बाद केले. यानंतर शुभमन गिल व रिषभ पंत यांनी दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 23 षटकांत 3 बाद 81 धावा केल्या होत्या. भारताकडे आता 308 धावांची आघाडी असून दिवसअखेरीस गिल 33 तर पंत 12 धावांवर खेळत होते.

जसप्रीत बुमराह चारशे पार

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 बळींचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. चेन्नई कसोटीत त्याने 30 धावांत 4 बळी घेत ही ऐतिहासिक कामगिरी साकारली. याआधी कपिल देव, झहीर खान, जवागल श्रीनाथ, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा हे भारतीय गोलंदाज आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 किंवा त्याहून अधिक विकेट घेतले आहेत. आता या महान खेळाडूंच्या यादीत बुमराहही सामील झाला आहे. याशिवाय, बुमराहने हरभजन सिंगचाही विक्रम मोडित काढला. भारतासाठी सर्वात कमी डावात 400 बळी घेण्याच्या बाबतीत त्याने भज्जीला मागे सोडले आहे. बुमराहने 227 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. तर हरभजनने 237 डावात ही कामगिरी केली होती. या यादीत अश्विन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 216 डावात 400 बळी घेतले होते.

मायदेशात विराट कोहलीच्या 12 हजार धावा पूर्ण

चेन्नई कसोटी विराटसाठी काही खास राहिली नाही. या कसोटीत पहिल्या डावात तो केवळ 6 धावा करून बाद झाला तर दुसऱ्या डावात 17 धावा करत तो बाद झाला. या दुसऱ्या डावातील फलंदाजीदरम्यान 5 धावा करताच त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. घरच्या मैदानावर तीनही फॉरमॅटमध्ये 12 हजार धावा करणारा तो भारताचा दुसरा तर जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे. विराटपूर्वी सचिन तेंडुलकर (14,192), रिकी पाँटिंग (13,117), जॅक कॅलिस (12,305) आणि कुमार संगकारा (12,043) यांनी घरच्या मैदानावर 12 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव सर्वबाद 376 व दुसरा डाव 23 षटकांत 3 बाद 81 (जैस्वाल 10, रोहित शर्मा 5, विराट कोहली 17, शुभमन गिल खेळत आहे 33, रिषभ पंत खेळत आहे 12, तस्कीन अहमद, निहाद राणा व मेहंदी हसन प्रत्येकी एक बळी). बांगलादेश पहिला डाव 47.1 षटकात सर्वबाद 149 (नजमुल हुसेन शांतो 20, शकिब अल हसन 32, लिटन दास 22, मेहदी हसन मिराज नाबाद 27, बुमराह 40 धावांत 4 बळी, आकाशदीप व सिराज प्रत्येकी दोन बळी).

Advertisement
Tags :

.