चिरतारुण्याचे वरदान
आपण जास्तीत जास्त काळ तरुण रहावे, निदान तरुण दिसावे यासाठी बहुतेकांची धडपड असते, ही वस्तुस्थिती आहे. म्हातारपण नको, असे प्रत्येकालाच वाटते. ते टाळण्यासाठी प्रत्येकजण त्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करत असतो. अनेक सौंदर्यप्रसाधने तर वृद्धत्वापासून दूर ठेवण्याच्या आश्वासनावरच खपतात. तथापि, काही व्यक्तींना नैसर्गिकरित्याच प्रदीर्घ काळ तारुण्याचे वरदान लाभलेले असते. अशा व्यक्तींची वये वाढली, तरी तारुण्य किंवा जोष कमी होत नाही.
ऑस्ट्रेलियातील एक महिला एंडी ल्यू या सध्या या संदर्भात चर्चेत आहेत. त्यांचे वय सध्या 55 वर्षांचे आहे. तथापि, त्यांचे रुप पंचविशीतील वाटावे, असे आहे. तारुण्य टिकविण्यासाठी किंवा ते टिकले आहे, असे भासविण्यासाठी त्यांनी कोणतीही शस्त्रक्रिया किंवा अन्य कृत्रिम उपाय करुन घेतलेला नाही, हे विशेष मानले जात आहे. त्यांना प्रदीर्घ तारुण्याचे नैसर्गिक वरदान लाभले आहे, हे खरे असले तरी त्यांनी प्रयत्नपूर्वक ते सांभाळले आहे, ही वस्तुस्थितीही तितकीच खरी आहे. खाण्यापिण्यावर उत्तम नियंत्रण, प्रतिदिन नियमित व्यायाम आणि सातत्याने कार्यरत राहणे, ही आपल्या तारुण्याची रहस्ये आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
संतुलित जीवनशैली हेच प्रदीर्घ तारुण्याचे कारण आहे. अशी जीवनशैली प्रत्येकाने स्वीकारली, तर जवळपास प्रत्येक व्यक्ती आपल्या तारुण्याचे रक्षण जास्तीत जास्त काळ करु शकेल. आपण क्षणभराच्या आनंदासाठी हे संतुलन बिघडवतो. त्याचा परिणाम आपल्या शरीरप्रकृतीवर होतो. अनियंत्रित आणि असंयमित वर्तणुकीमुळे वृद्धत्व लवकर येते. ते अधिक काळ दूर ठेवायचे असेल, तर सर्वात प्रथम आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आहार चवदार आहे की नाही, यापेक्षा तो पोषक आहे की नाही, हे महत्वाचे असते, असे त्यांचे प्रतिपादन आहे. आपल्या तारुण्याची सहा रहस्ये त्यांनी विशद केली आहेत. भारतोलन (वेट लाफ्टिंग), कायरोप्रॅक्टरसा सल्ला घेणे, पोषक द्रव्यांच्या ‘सप्लिमेंटस्’ कमीत कमी घेणे, सकाळी उठल्यानंतर आपल्या खोलीच्या तापमानाइतक्या तापमानाचे लिंबू पाणी पिणे, त्यानंतर काही वेळाने हलकी न्याहारी घेणे आणि रात्री झोपण्यापूर्वी एक तास फोन, वायफाय किंवा इंटरनेटपासून दूर राहणे असे सहा मार्ग त्यांनी स्पष्ट केले आहेत. त्यांच्या आहारात नारळाचे दही, फळे, ताज्या भाज्या अशा नैसर्गिक पदार्थांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो, असे त्यांचे म्हणणे आहे.