मृतदेह पाच तासांनंतर सचेतन, पण...
डॉक्टरांनीही ज्याला मृत घोषित केले आहे, अशी व्यक्ती नंतर हालचाल करु लागली अशा घटना घडतात हे आपल्याला माहिती आहे. तथापि, सर्वसाधारणत: माणूस निश्चेष्ट झाल्यानंतर काही कालावधीमध्ये त्याच्या शरीराची हालचाल दिसू लागली नाही, तर तो मृतावस्थेत जाण्याची शक्यता जास्त असते, असे तज्ञ म्हणतात. एकदा मृतावस्था प्राप्त झाली की मग अशी व्यक्ती जिवंत होणे दुरापास्त असते. तथापि, या निसर्गनियमाला एक अपवाद ग्वाटेमाला या देशात घडला आहे. या देशातील सॅन जुआन डी डाओस या रुग्णालयात एका महिलेला मृतवत अवस्थेत आणण्यात आले. ती जिवंत नसल्याचे घोषित करण्यात आले. तिचा मृतदेश बॉडीबॅगमध्ये ठेवण्यातही आला होता. रुग्णालयाकडून मृतदेह नातेवाईकांच्या आधीन करण्याची प्रक्रिया केली जात होती. या प्रक्रियेला काही तास लागणार होते. तो पर्यंत महिलेचा मृतदेह बेडवर ठेवण्यात आला होता. पाच तासांच्या नंतर मृतदेहात अचानक हालचाल होऊ लागली. मृतदेहाचे हातपाय हालू लागले. आसपासचे कर्मचारी प्रचंड घाबरुन गेले. त्यांनी तेथून पळ काढला आणि डॉक्टरांना या घटनेची कल्पना दिली. प्रारंभी डॉक्टरांचा विश्वास बसला नाही. कारण सर्व चाचण्या करुनच महिलेला मृत घोषित करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी येऊन पाहिले असता, हालचाल दिसल्यानंतर तिच्यावर पुन्हा उपचार करण्यात आले. तिच्या अवयवांची हालचाल होत असली तरी तिच्या मेंदूमध्ये चेतना दिसत नव्हती. अखेर 30 मिनिटांच्या प्रयत्नांनंतरही मेंदूमध्ये काही सुधारणा झाली नाही. त्यामुळे पुन्हा तिला मृत घोषित करण्यात आले. हा तिच्या नातेवाईकांना दुसरा धक्का होता. तिचे हातपाय हलू लागल्यानंतर ती जिवंत होईल, अशी आशा त्यांना लागून राहिली होती. पण अखेर जे व्हायचे तेच झाले.