बेपत्ता जवानाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत
काश्मीरमधील घटना : अपहरणानंतर दहशतवाद्यांकडून घात
वृत्तसंस्था/ अनंतनाग
जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये बुधवारी सुरक्षा दलांना प्रादेशिक लष्कराच्या जवानाचा मृतदेह सापडला. त्याच्या शरीरावर गोळ्यांच्या खुणा आहेत. लष्कराने अद्याप कोणत्याही दहशतवादी हल्ल्याबाबत काहीही सांगितलेले नाही. हिलाल अहमद भट असे मृतदेह सापडलेल्या सैनिकाचे नाव आहे. दहशतवाद्यांनी अनंतनागमध्ये प्रादेशिक लष्कराच्या दोन सैनिकांचे अपहरण केले होते. त्यापैकी एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. यानंतर दुसऱ्या सैनिकाचा शोध घेण्यासाठी लष्कराने मोहीम सुरू केल्यानंतर दुसऱ्या जवानाचा मृतदेह सापडला.
हिलाल भट हा अनंतनागमधील मुखधमपोरा नौगामचा रहिवासी असून तो 8 ऑक्टोबर रोजी कोकरनागच्या काजवान जंगल परिसरात लष्करी कारवाईत सहभागी झाला हाता. यादरम्यान तो बेपत्ता झाला होता. त्याला शोधण्यासाठी सुरक्षा दलांनी रात्रभर शोधमोहीम राबवली. त्यानंतर बुधवारी त्याचा मृतदेह अनंतनागमधील सांगलानच्या जंगलात सापडला. हिलाल अहमद भट 4 वर्षांपूर्वी टेरिटोरियल आर्मीमध्ये सामील झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले व आई-वडील असा परिवार आहे.
चार दिवसांपूर्वी 2 दहशतवादी ठार
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे कारनामे सुरूच आहेत. कुपवाड्यातील केरन सेक्टरमध्ये घुसखोरीची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी 4 ऑक्टोबरला शोधमोहीम सुरू केली होती. यानंतर 5 ऑक्टोबर रोजी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार करत त्यांच्याकडून दारूगोळा जप्त करण्यात आला. सीमेवर दहशतवाद्यांची घुसखोरी पाहता सुरक्षा दल सातत्याने शोधमोहीम राबवत आहे.