कुवैतमधील मृत्युमुखींची पार्थिव भारतात आणणार
काही मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण : विदेश राज्यमंत्र्यांची माहिती
- कुवैतमधील आगीत 42 भारतीयांचा मृत्यू
- एअरफोर्स वनद्वारे मृतदेह भारतात पाठवणार
- विदेश राज्यमंत्री कुवैत प्रशासनाच्या संपर्कात
वृत्तसंस्था /मंगाफ-कुवैत
कुवैतमधील आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांचे मृतदेह मोदी सरकार परत आणणार आहेत. याची जबाबदारी भारतीय हवाई दलाकडे सोपवण्यात आली आहे. सध्या कुवैती अधिकारी मंगाफ भागातील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या 42 भारतीयांच्या मृतदेहांची डीएनए चाचणी करत आहेत. मृतदेह परत आणण्यासाठी भारतीय हवाई दलाचे विमान सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी गुऊवारी दिली. सद्यस्थितीत प्राप्त झालेल्या माहितीनुसार मृतांपैकी 12 जण केरळमधील आणि 5 जण तामिळनाडूमधील आहेत.
आगीच्या दुर्घटनेनंतर मदतीची पाहणी करण्यासाठी आणि मृतांची पार्थिव परत आणण्यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग तातडीने कुवैतला पोहोचले असून त्यांची तेथील मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत एकूण 49 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 42 जण भारतीय असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कुवैतला पोहोचल्यानंतर काही तासांनी कीर्तिवर्धन सिंग यांनी कुवैतचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या यांची भेट घेतली. अल-याह्या यांनी वैद्यकीय सेवा, मृतदेह त्वरित परत आणणे आणि घटनेच्या तपासासह संपूर्ण मदतीचे आश्वासन दिल्याचे कुवैतमधील भारतीय दुतावासाने सांगितले. दरम्यान, मृतांमध्ये केरळमधील जास्त लोक असल्याने केरळ सरकारनेही योग्य पावले उचलली आहेत. केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज कुवैतला रवाना झाल्या आहेत. तसेच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी कुवैतचे परराष्ट्रमंत्री अली अल-याह्या यांच्याशी फोनवर चर्चा केली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींना शिक्षा केली जाईल, असे आश्वासन कुवैतने दिले आहे. जयशंकर यांनी मृतदेह लवकरात लवकर भारतात पाठवण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.
आगीच्या घटनेचा तपास सुरू
भारतीय विदेश राज्यमंत्र्यांनी सर्व संबंधित कुवैती अधिकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याचे कौतुक केले. तसेच या घटनेचा तपास सुरू असून तेथील मंत्र्यांनी गुऊवारी परदेशी कामगारांच्या निवासस्थानातील अपार्टमेंटमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे प्रभावित भारतीयांना संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिल्याचेही कीर्तिवर्धन सिंग यांनी स्पष्ट केले. या दुर्घटनेची त्वरित चौकशी करण्याचे आश्वासन दिले. सिंग यांनी मुबारक अल कबीर हॉस्पिटललाही भेट देत जखमींची विचारपूस केली. सध्या या इस्पितळात सात भारतीय नागरिक उपचार घेत आहेत.
ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी
इमारतीला लागलेल्या आगीमुळे काही मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटू शकली नसल्याचे सिंग यांनी सांगितले. ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मृतदेहांची ओळख पटताच त्यांच्या कुटुंबीयांना कळवले जाईल. त्यानंतर मृतदेह भारतात परत आणले जातील. तसेच मृतदेह रवाना करण्यासाठी एअर फोर्स वन विमान सज्ज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.