कोलवा समुद्रात होडी उलटली
13 मच्छीमारांना वाचविण्यात यश : होडीची मोटर अचानक बिघडल्याने दुर्घटना
मडगाव : कोलवा समुद्रात सोमवारी सकाळी सोलर कोळंबी पकडण्यासाठी गेलेली होडी उलटण्याची घटना घडली. या होडीवर एका मदतनीसांसह 13 मच्व्छीमार होते. त्यांना खवळलेल्या समुद्रातून वाचविण्यात यश आले. या मच्छीमारांना मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा ऊग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मासेमारीवर बंदी असतानाही कोलवा समुद्रकिनाऱ्यावरून सोलर कोळंबी पकडण्यासाठी समुद्रात गेलेली होडी उलटली. समुद्रात गेलेल्या होडीला एक मोटर बसविण्यात आली होती. ती अचानक बंद पडल्याने होडी उलटली असल्याची माहिती प्राप्त झाली. बुडणाऱ्या मच्छीमारांच्या मदतीसाठी स्थानिक मच्छीमार धावून गेले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सर्व 13 जखमींवर दक्षिण गोवा जिल्हा ऊग्णालयात उपचार सुरू आहेत. कोलवा समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित असलेल्या एका मच्छीमाराने सांगितले की, समुद्र खवळलेला आहे. काही मच्छीमार सोलर कोळंबी पकडण्यासाठी समुद्रात गेले होते. सोलर कोळंबी ही हंगामाच्या सुरुवातीला मिळत असताना नंतर ती मिळत नाही. त्यामुळे धोका पत्करून मच्छीमार समुद्रात जातात. त्यात होडीची मोटर नादुरूस्त झाली व होडी उलटली. पण, सुदैवाने सर्वांना वाचविण्यात यश आले. मात्र, यात होडीचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षीही अशाच प्रकारे होड्या उलटण्याचे प्रकार घडले होते. त्यावेळीही मच्छीमारांना वाचविण्यात यश आले होते. मासेमारीवरील बंदी 1 ऑगस्ट रोजी उठविली जाणार असून त्यानंतर अधिकृत मासेमारी हंगाम सुरू होणार आहे. त्यापूर्वीच पारंपरिक मच्छीमार मोठ्या होडीला मोटर बसवून खोल समुद्रात सोलर कोळंबी पकडण्यासाठी जात असतात.