For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मळेकरणीसाठी बळींच्या बकऱ्यांचे रक्त-टाकाऊ पदार्थ गावच्या वेशीपर्यंत

10:32 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
मळेकरणीसाठी बळींच्या बकऱ्यांचे रक्त टाकाऊ पदार्थ गावच्या वेशीपर्यंत
Advertisement

उचगाव ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर : तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Advertisement

वार्ताहर /उचगाव

येथील मळेकरणी देवस्थानमध्ये मंगळवार व शुक्रवार देवीसाठी बळी दिल्या जाणाऱ्या बकऱ्यांचे रक्त आणि टाकाऊ पदार्थ इतक्या प्रमाणात वाढले आहे की ते गटारीतून गावाच्या वेशीपर्यंत रक्ताचा लोंढा आणि टाकाऊ पदार्थ वाहत येत असल्याने गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर तातडीने उपाययोजना करावी. तसेच वाहतुकीची कोंडी या सर्व बाबींवर तातडीने निर्णय घेऊन उपाययोजना करावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन या संदर्भात जाब विचारला जाईल, असा इशारा उचगाव ग्रामस्थांनी दिला आहे. उचगाव मळेकरणी देवस्थानमध्ये मंगळवारी व शुक्रवारी भाविकांकडून देवीला बकऱ्याचा बळी देऊन नैवेद्य आणि भाविकांसाठी जेवणावळीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या जेवणावळीसाठी बेळगाव शहरापासून ते बेळगाव तालुका, खानापूर तालुका, चंदगड तालुक्यामधून हजारो भाविकांची आमराईकडे ये-जा सुरू असते. गेल्या दोन-तीन आठवड्यामध्ये उचगाव अॅप्रोच रोड तसेच बेळगाव वेंगुर्ला रोड या दोन्हीही रस्त्यावरती वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र अनेकवेळा आढळून आले. सगेसोयरे, मित्रमंडळीना जेवणावळी देऊन हा बाहेरच्या बाहेर कार्यक्रम आटोपण्याचा हेतू अनेकांचा होत आहे. दुसरीकडे मळेकरणीच्या चोहोबाजूला जी शेतकऱ्यांची शेती आहे. या शेतवडीत मद्यपान करणाऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मद्यपान केल्यानंतर ज्या बॉटल्स आहेत त्या अस्ताव्यस्त टाकणे, फोडणे अशाप्रकारच्या कृत्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मद्यपान करणाऱ्यांना कोणी सांगावयास गेल्यास ते त्यांचेवरच दादागिरी करून दारूच्या नशेत मारण्यासाठी धावत असल्याच्या अनेक घटना  घडल्या आहेत. यात्रा म्हणजे भक्तीभाव कमी आणि दारू, मटण, मौजमस्ती करण्याचा भाग बनला आहे. यासाठी शासनाने व ग्रामस्थांनी यावर विचार करण्याची वेळ निर्माण झाली आहे.

Advertisement

...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

एकीकडे या रक्ताची आणि टाकाऊ पदार्थाची सुटलेली प्रचंड दुर्गंधी आणि आरोग्याला होत असलेला धोका, तर दुसरीकडे सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी या सर्वांमुळे उचगाव ग्रामस्थांचे जगणे मुश्किल होत आहे. यासाठी तातडीने या यात्रेसंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य खात्याने योग्य ती कारवाई व निर्णय घ्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

Advertisement
Tags :

.