सर्वात मोठी कार वाहनांचे जग मोठे
विस्मयकारक आहे. आपण कल्पनाही करु शकणार नाही, अशी वाहने आज जगाच्या पाठीवर धावत आहेत. विविध रंगांची, ढंगांची अन् आकारांची ही वाहने पाहताक्षणीच मनाला भुरळ घालतात. अशीच एक कार सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ही जगातील सर्वात मोठी कार असल्याचे तिच्या निर्मात्याचे म्हणणे आहे. तिच्या ‘मोठे’पणाची कल्पना तिच्या छायाचित्रावरुन लगेच येते. तिच्या चाकांखाली एक उंच मनुष्य उभा राहू शकतो, इतकी ती मोठी आहेत. यावरुन कार किती मोठी असेल हे त्वरित ओळखता येईल. अशा या कारची किंमत किती असेल, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आल्याखेरीज राहणार नाही. पण ती जाणून घेण्याआधी तिच्या टायरची किंमत जाणून घेणे आवश्यक आहे. तिचा एक टायर 21 लाख रुपयांचा आहे. या किमतीत आपल्याला तीन चांगल्या कार्स सहज विकत घेता येतील. जगातील सर्वात मोठी कार ‘हमर एच 1’ ही आहे, असे आजवर मानले जात होते. तथापि, ही कार तिच्या तिप्पट आहे.
ही कारही ‘हमर‘ मॉडेलचीच आहे. सर्वसामान्य कार्सची उंची या कारच्या चाकांच्या व्यासापेक्षाही कमी असते. या कारला एक नव्हे, तर चार इंजिने आहेत. ही कार कोण चालवते आणि ती कोठे चालविली जाते हा प्रश्न तिची माहिती करुन घेतल्यानंतर प्रत्येक जण विचारतो. खरोखरच ही कार चालविली जाते. मात्र, ती सर्वसामान्य मार्गांवरुन चालविली जाऊ शकत नाही. ती केवळ मोठ्या महामार्गांवरुनच चालविली जाते. या कारमध्ये चार टीव्ही स्क्रीन्स लावलेले आहेत. या कारच्या चालकाचा कक्षही अत्यंत वेगळा आहे. त्यात बसल्यानंतर आपण एखाद्या रेल्वे इंजिनात बसल्याचा भास होतो. कारच्या चालकाला चारी बाजूची दृष्ये स्पष्टपणे दिसावीत, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कारमध्ये प्रवासी बसण्याचे स्थानही असेच मोठे आहे. तो एक साठ चौरस मीटरचा हॉलच आहे. या हॉलमध्ये बसण्यासाठी चारी बाजूंना सोफे बसविलेले आहेत. या कारमध्ये किमान 100 प्रवासी बसू शकतात. याचा अर्थ असा की ती एका बसपेक्षाही मोठी आहे. या कारमध्ये चढण्यासाठी एक छोटा जिनाच उपयोगात आणावा लागतो.
ही कार चालविली जाते, हे एकवेळ समजू शकते. तथापि, ती पार्क कोठे आणि कशी केली जाते, हे मोठेच गूढ आहे. ती पार्क करण्यासाठी सर्वसामान्य पार्किंग स्थाने चालत नाहीत. ती एखाद्या छोट्या मैदानातच पार्क करावी लागते. या कारची महती तिच्याइतकीच थोर आहे. अमेरिकेसारख्या देशातच ती असू शकते.