भाकरी फिरली पण...
जाणते नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गेली काही दशके सत्ताकारण जमवणारे नेते शरदचंद्र पवार यांनी आपल्या पक्षाचा महाराष्ट्र अध्यक्ष व सरचिटणीस बदलून आपली ‘भाकरी फिरवायची’ मनिषा पूर्ण केली आहे. गेली सात वर्षे या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील पायउतार झाले आहेत आणि ती जागा सातारा जिह्यातील माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे यांना देण्यात आली आहे. सरचिटणीस पदी रोहित पवार यांची वर्णी लागली आहे. जयंत पाटील यांनी कविता म्हणत आणि आपल्या सात वर्षांच्या कामाचा आढावा घेत हे पद सोडले आणि पद सोडले तरी पक्ष सोडलेला नाही असे सांगत त्यांनी भाजपवर बोचरी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले तेव्हा अजितदादा पवार यांनी पक्ष, चिन्ह, आमदार, खासदार यांना आपलेसे केले. जयंत पाटलांना पक्ष एकत्र राखण्यात यश आले नव्हते. विधानसभेला जेमतेम दहा जागा आल्या. शरद पवार यांची महाराष्ट्रात 50 ते 60 जागा जिंकण्याची शक्ती आहे, हे अनेकवेळा दिसून आले आहे. मराठा राजकारण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे हे पॉकेट पवारांचे मानले जाते पण विधानसभा निवडणुकीत पक्ष बालेकिल्ल्यात अडचणीत आला. कोल्हापूर जिह्यात खातेही खोलता आले नाही. पाटील यांचे स्वत:चे मताधिक्यही प्रचंड घटले. त्यामुळे भाकरी फिरणार हे निश्चित होते पण भाकरी फिरली तरी लगेचच मोठा फरक पडेल असे चित्र नाही. समोर जिल्हा परिषद व तालुका पंचायत समितीसाठी आणि मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या अस्तित्वाची लढाई आहे. पश्चिम महाराष्ट्रात ताकद व एकजूट करुन या निवडणुकीत तुतारी फुंकली तर पश्चिम महाराष्ट्रात थोडं फार यश अपेक्षित आहे. पण शरद पवार यांच्या मनात काय आहे याचा अंदाज अन्य कुणाला सोडा त्यांनाही नसावा. भाजपाने विशेष करुन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची गोची करुन ठेवली आहे. जी अवस्था राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची तीच अवस्था शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आहे पण उद्धव ठाकरे गटाने राज ठाकरे यांना टाळी मागितली आहे. ते काय होते हे बघावे लागेल. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांची अस्तित्वाची लढाई सुरू आहे. राज्यात पवार ब्रँड आणि ठाकरे ब्रँड यांची स्वतंत्र ओळख आहे. तरीही सत्ताकारणात हे दोन्ही ब्रँड सध्या अडचणीत आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्थानिक पातळीवर लढवल्या जातात पण मुंबईवर, मुंबई महापालिकेवर सत्ता कुणाची याला देशपातळीवर महत्त्व आहे. त्यामुळे तेथील सत्तासंघर्ष निकराचा, अस्तित्वाचा आणि जीवघेणा होईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शरद पवारांनी भाकरी फिरवली, तरुण चेहऱ्यांना संधी दिली हे खरे असले तरी हा पक्ष आता पूर्वीप्रमाणे राहीलेला नाही. आणि राज्यातील महाविकास आघाडीही कागदोपत्रीच दिसते आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर भाकरी कशीही फिरली आणि पदांचे फेटे कुणीही मिरवले तरी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार अशीच स्थिती आहे. भाजपाने देशातील घराणेशाही मोडून काढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न चालवले आहेत. त्या प्रयत्नांचा भाग म्हणूनच महाराष्ट्रात राष्ट्रवादी व शिवसेनेत तुकडे पाडले गेले व दोन्ही घराणी शक्तीहिन करण्याचे प्रयत्न झाले. आता समोर निवडणूका असताना हा प्रयत्न अधिक टोकदार केला जाण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात भाकरी फिरवणे वगैरे काही नाही पण शरदचंद्र पवार पक्षात भाकरी फिरवण्यावर जोर असतो. दिवंगत नेते राजारामबापू पाटील हे 1978 साली मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते पण या पदाने त्यांना हुलकावणी दिली होती. बापूचे हे स्वप्न साकारण्यासाठी जयंत पाटील यांनी सावधपणे वाटचाल केली. दीर्घ राजकारण करताना त्यांना स्वत:चा गट किंवा पाठीराखे पाच पन्नास आमदार राखता आलेले नाहीत. त्यांची शरद पवार यांचेवरच भिस्त होती पण पवारांना पक्षातून आणि कुटुंबीयाकडून भाकरी फिरवा असा आग्रह होता. पवार हे सतत सत्ताकारण करत आले आहेत. आता केंद्रात, राज्यात सत्ता नाही अशावेळी ते कशी पावलं टाकतात हे बघावे लागेल. जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहून पक्षाला चेहरा दिला होता. आता शशिकांत शिंदे व रोहित पवार काय करतात, हे बघावे लागेल. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात अंतर्गत फारसे चांगले नाही, असाही एक मेसेज या फिरवा फिरवीतून आणि या निमित्ताने झालेल्या राजकारणातून जनतेत गेला आहे. सत्ता तिकडे कार्यकर्ते हे समीकरण आहे. जयंतराव पाटील यांचे पद जाताच त्यांचे निकट कार्यकर्ते भाजप संपर्कात येताना दिसत आहेत. भाजपचे दहा आमदार निवडून आलेत. त्यापैकी पाच जण अजितदादांच्या संपर्कात आहेत आणि स्वत: अजितदादा पवार शरद पवार यांच्या वारंवार गाठी भेटी घेताना दिसत आहेत. अशावेळी भाकऱ्या कशा फिरतात, जातीय राजकारण कसे वळणे घेते आणि पदाधिकारी कितपत मेहनत घेतात यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि राज्यातील या दोन ब्रँडचे अस्तित्व अवलंबून आहे. शरद पवारांना खरे तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका होऊपर्यंत भाकरी फिरवायची नव्हती. तसे त्यांनी बोलून दाखवले होते पण पक्षातील आणि कुटुंबातील दबाव बघून त्यांनी भाकरी फिरवली. आता या निवडणूका होऊपर्यंत वाट बघावी लागेल. शशिकांत शिंदे यांची प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्याच्या आधी काही तास मी राजीनामा दिलेला नाही. मी भाजपात जाणार नाही. मीडिया चुकीच्या बातम्या देतो. मीडियाचे सुत्र म्हणजे कोण असा हेटाळणी राग त्यांनी आळवला होता. अर्थात काही तासात मीडिया व सूत्र बरोबर होते, हे अधोरेखित झाले. आता शरद पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे व रोहित पवार पुढची खेळी कशी खेळतात हे बघायचे. सात वर्षे तव्यावर तापलेली भाकरी शांत बसेल असे नाही. करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी ते माहीर आहेत. कुणाचा कार्यक्रम होतो, हे दिसेलच. तूर्त भाकरी फिरली आहे.