‘गॅरंटीं’च्या लाभार्थ्यांचा भाजपकडून सातत्याने अपमान
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आरोप : चिक्कमंगळूर येथे गॅरंटी योजनांचा मेळावा
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील गॅरंटी योजनांच्या साडेचार कोटी लाभार्थ्यांचा भाजप सातत्याने अपमान करत आहे, तर दुसरीकडे खोटे बोलत आहे, असा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. रविवारी चिक्कमंगळूर येथे सरकारच्या पाच गॅरंटी योजनांचा मेळावा आणि विविध विकासकामांचे उद्घाटन करून ते बोलत होते.
गॅरंटी योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये भाजप समर्थक आहेत की नाहीत या प्रश्नाचे उत्तर भाजपने उघडपणे द्यावे, असे आव्हान देत मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले, गॅरंटी योजनावर राज्यातील जनतेचा हक्क आहे. त्यामुळे भाजपने तात्काळ लाभार्थ्यांचा करत असलेला अपमान थांबवावा. पाचपैकी पाच विधानसभा मतदारसंघ जिंकवून देणाऱ्या चिक्कमंगळूर जिल्ह्यातील जनतेचे सिद्धरामय्यांनी कौतुक केले. तसेच भाजप सरकारमुळे तुम्हाला अच्छे दिन आलेत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, उपस्थित नागरिकांनी नाही-नाही, असे उत्तर दिले.
भाजपकडे विकास शून्य असून खोटेपणा निर्माण करत आहे. खोट्याच्या आधारे देशावर राज्य करण्याची सर्कस सुरू आहे. भाजप नेहमीच काँग्रेसमुक्त भारत म्हणतो. पण, काँग्रेस भूकमुक्त भारत घडवण्यासाठी सातत्याने काम करत आहे. जर तुम्ही स्वतंत्र भारताचा इतिहास पाहिला तर तुम्हाला काँग्रेसने भूकमुक्त भारतासाठी राबविलेल्या सर्व कार्यक्रमांची यादी मिळेल. सर्वांच्या विकासासाठी काँग्रेस झटत आहे. गॅरंटी योजना राबवून साडेचार कोटी लोकांचे दरवाजे यशस्वीपणे ठोठावण्यात आल्याचे त्यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले.