महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ट्रम्प युगाची नांदी

06:58 AM Jan 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमेरिकेचे 47 वे अध्यक्ष या नात्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्याने आता पुन्हा एकदा ट्रम्प युगाला सुऊवात झाली आहे. ट्रम्प यांची पहिली टर्म जितकी बहुचर्चित तितकीच वादग्रस्तही ठरली होती. चार वर्षांच्या विश्रांतीनंतर पुनश्च सत्तेवर आल्यानंतर आपली चालू कारकीर्द कशी असेल, याचीच झलक ट्रम्प यांच्या शपथविधीच्या भाषणावरून दिसते. अमेरिका फर्स्ट हा ट्रम्प यांचा नारा नवीन नाही. मागील निवडणुकीतही त्यांनी प्रथम राष्ट्र या घोषणेचा पुकारा केला होता. हे पाहता हे धोरण समोर ठेवूनच नवे अध्यक्ष काम करतील, हे वेगळे सांगायला नको. तसा अमेरिका हा स्थलांतरितांचा देश म्हणून ओळखला जातो. तथापि, त्यातून तयार झालेल्या अंतर्विरोधातून असंतोष कसा वाढेल, यावरच ट्रम्प यांचा आजवर भर राहिला आहे. हे बघता अमेरिकी जनतेला विश्वास, संपत्ती, लोकशाही आणि स्वातंत्र्य परत मिळवून देण्याचे तसेच अमेरिकेचे अध:पतन थांबवण्याचे त्यांनी दिलेले आश्वासन अपेक्षितच म्हणायला हवे. याच भूमिकेतून बेकायदा स्थलांतर आणि त्याला अटकाव करणे, हा ट्रम्प यांच्या अजेंड्यावरील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा होय. बेकायदेशीर स्थलांतर वा घुसखोरी ही आजघडीला अमेरिकेतील सर्वांत मोठी समस्या असल्याचे ट्रम्प यांनी वेळोवेळी म्हटले आहे. हा आकडा 20 लाखांच्या आसपास असून, मागच्या चार वर्षांत त्यात मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात येते. ट्रम्प यांनी 2016 ते 2020 या पहिल्या अध्यक्षीय कारकिर्दीतही हा प्रश्न लावून धरला होता. काही सीमावर्ती भागांमध्ये भीती उभारण्याच्या दृष्टीनेही त्यांनी त्या वेळी पावले उचलली होती. आता पुन्हा ट्रम्प सीमेवर मजबूत तटबंदी निर्माण करण्याचा निर्णय घेण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसतात. मेक्सिकाची सीमा ही कायमच वादाचा विषय राहिली आहे. याच सीमेवरून घुसखोरी होते, असा दावा केला जातो. हे बघता देशातील सर्व अवैध प्रवेश थांबविण्यात येतील, हा त्यांनी दिलेला इशारा पुरेसा बोलका म्हटला पाहिजे. लवकरच दक्षिण सीमेवर आणीबाणीचा आदेश जारी करण्यात येईल आणि तेथे लष्कर तैनात करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. या मुद्द्यावर महासत्तेच्या ताकदवान अध्यक्षांनी घेतलेली आक्रमक पवित्रा बघता स्थलांतरितांबाबत पुढच्या टप्प्यात अमेरिकेकडून कठोर भूमिका अपेक्षित असेल. दुसऱ्या बाजूला अमेरिकेमध्ये सात ते आठ लाख भारतीय अनधिकृतरीत्या राहत असल्याकडेही तज्ञ मंडळींकडून लक्ष वेधण्यात येते. हा नेमका आकडा सांगणे कठीण असले, तरी अमेरिकेच्या या नव्या धोरणाचा त्यांच्यावर परिणाम  होण्याची शक्यता संभवते. एच 1 बी व्हिसा हादेखील भारतीयांकरिता महत्त्वाचा विषय. त्यावरील मर्यादा काढली, तर अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांकरिता ती अत्यंत दिलासादायक बाब ठरेल. अमेरिकेमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेत असतात. या सर्वांना ग्रीन कार्डबद्दल निश्चितच कुतूहल असते. स्वाभाविकच पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना ग्रीन कार्ड देण्याचा ट्रम्प यांनी दिलेला शब्द कधी प्रत्यक्षात येणार, याबाबतही औत्सुक्य असेल. मुळात ट्रम्प यांचे व्यक्तिमत्त्व हे बेधडक म्हणून ओळखले जाते. भूमिका मांडताना आणि घेताना ते कधीही कोणतीही भीडभाड ठेवत नाहीत. पनामा कालव्यासंदर्भातील त्यांचे धोरण हा त्याचाच परिपाक होय. पनामा कालव्यातून जाण्यासाठी अमेरिकी जहाजांकडून अधिकचे शुल्क वसूल करण्यात येत आहे. हा कराराचा भंग आहे. त्यामुळे पनामा कालव्याचे नियंत्रण अमेरिकेकडे घेणार असल्याचेही त्यांनी सुनावले आहे. आपल्या पहिल्यावहिल्याच भाषणात अध्यक्षांनी यावर जाहीर मतप्रदर्शन केल्याने पनामा कालव्याचा विषय चिघळू शकतो. त्याचबरोबर त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, असे म्हणायला जागा आहे. अमेरिकेच्या भरभराटीसाठी इतर देशांवर कर लावण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणाही तितकीच महत्त्वाची होय. पॅनडा, मेक्सिको आणि चीन या देशांकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर तब्बल 25 टक्के आयातशुल्क आकारण्याची त्यांची घोषणा हा नवा धक्काच म्हटला पाहिजे. खरे तर नव्या व्यापारयुद्धाची ही नांदीच म्हणायला हवी. चीन आणि पॅनडाने या वाढीव आयातशुल्काला त्याच पद्धतीने उत्तर देण्याचे सूतोवाच केले आहे. तसे झाले, तर अमेरिका आणि या तीन देशांमध्ये व्यापारयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. भारतीय मालावर अशा कोणत्याही वाढीव शुल्काची घोषणा ट्रम्प यांनी केलेली नाही. हे आपल्यासाठी दिलासादायकच ठरावे. किंबहुना, ट्रम्प यांचा मूडी स्वभाव बघता भारताला सर्व शक्याशक्यता गृहीत धराव्या लागतील. खरे तर असा कोणताही निर्णय घेताना अध्यक्षांना काँग्रेसची परवानगी आवश्यक असेल. त्यामुळे हा निर्णय अंतिम असेल, असेही मानण्याचे कारण नाही. वास्तविक ट्रम्प यांचे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मित्रत्वाचे संबंध आहेत. प्रशासनामध्ये अनेक भारतीयांची नियुक्ती करून त्यांनी आपला मैत्रभाव अधोरेखित केला आहे. हे पाहता आगामी काळात भारत आणि अमेरिका यांच्यातील परस्परसंबंध दृढ करण्याकरिता ट्रम्प सरकार जोरकस पावले उचलेल, अशी आशा करायला हरकत नाही. अमेरिकेतील प्रत्येक निर्णयाचा, छोट्या मोठ्या धोरणाचाही सबंध जगावर परिणाम होत असतो. त्या अर्थी अमेरिकेतील सरकार, त्यांची भूमिका, अध्यक्षांचा दृष्टिकोन या बाबी जगातील प्रत्येक देशाकरिता महत्त्वाच्या असतील. हे बघता पुढच्या चार वर्षांत ट्रम्प कसा कारभार करतात, हे सबंध जगाकरिता महत्त्वाचे असेल.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article