For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोकणला मिळाले हक्काचे पालकमंत्री!

06:56 AM Jan 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
कोकणला मिळाले हक्काचे पालकमंत्री
Advertisement

रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची पुन्हा एकदा नियुक्ती झाली आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नीतेश राणे यांची प्रथमच  नियुक्ती झाली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यानंतर दहा वर्षांनी पुन्हा एकदा राणे कुटुंबाकडे पालकमंत्रीपद आले आहे. विशेष म्हणजे मागील पाच वर्षांनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच निवडून आलेला आमदार नीतेश राणेंच्या रुपाने हक्काचा पालकमंत्री मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्याबरोबरच कोकणवासीयांच्या विकासाबाबत त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. 

Advertisement

राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर सुरुवातीला मंत्री पदाची प्र्रतीक्षा होती. त्यावेळी नीतेश राणे आणि उदय सामंत या दोघांनाही कोकणातून कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. त्यानंतर पालकमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार, याची प्रतीक्षा होती. अखेर ती प्रतीक्षा संपली आणि सिंधुदुर्गच्या पालकमंत्रीपदी भाजपचे नीतेश राणे यांची आणि रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदी शिंदे शिवसेनेचे उदय सामंत यांची नियुक्ती झाली. दोघेही कॅबिनेट मंत्री असल्याने आणि पालकमंत्रीही झाल्याने कोकणच्या विकासासाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे कुठल्याही पक्षात असोत, ते ज्या पक्षात असतील आणि त्या पक्षाची सत्ता असेल, तर त्यांच्याकडे पालकमंत्रीपद असणार हे ठरलेलेच होते. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असताना बराच काळ त्यांच्याकडे पालकमंत्रीपद होतं. प्रशासनावरील पकड, विकासकामांचा धडाका, विकास निधी आणण्याची हातोटी, निर्णय क्षमता या कारणांमुळे त्यांचे पालकमंत्रीपद नेहमीच स्मरणात राहते. काँग्रेसमध्ये असताना ते 2014 मध्ये मालवण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच पराभूत झाले आणि त्यावेळी काँग्रेसची सत्ताही गेली. त्यामुळे बऱ्याच काळानंतर राणेंकडील पालकमंत्रीपद गेले. 2014 मध्ये सेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर सावंतवाडी मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर मंत्री होऊन पालकमंत्रीही झाले आणि त्यानंतर पाच वर्षे ते पालकमंत्री होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला. चांदा ते बांदा ही महत्वाकांक्षी योजना आणली. परंतु ते प्रशासनावर वचक ठेवू शकले नाहीत किंवा त्यावेळी झटपट निर्णय होत नव्हते. त्यामुळे विकासकामे संथगतीने सुरू होती.

Advertisement

2014 मध्ये नारायण राणे पराभूत झाले. तरी कणकवली मतदारसंघातून काँग्रेसकडून नीतेश राणे पहिल्यांदाच निवडून आले. परंतु, युतीचे सरकार आल्याने त्यांना विरोधी पक्षातच रहावे लागले. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश करून नीतेश राणे दुसऱ्यांदा निवडून आले. त्यावेळी राज्यात सेना-भाजपला बहुमत मिळूनही युती तुटली आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्याने पुन्हा एकदा त्यांना विरोधी पक्षातच बसावे लागले. त्यानंतर अडीच वर्षांनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि महायुती सरकार आले. परंतु त्यावेळी नीतेश राणे यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. त्यावेळी मूळचे सिंधुदुर्गातील असले, तरी डोंबिवलीमधून निवडून येणारे रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाले.

तत्पूर्वी, महाविकास आघाडी सरकार असतानाही मूळचे सिंधुदुर्गचे असले, तरी रत्नागिरीतून निवडून येणारे उदय सामंत सिंधुदुर्गचे पालकमंत्री होते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत सिंधुदुर्गातून निवडून आलेला हक्काचा पालकमंत्री नव्हता. त्यामुळे जिल्ह्याचे सुपुत्र असले तरी जिल्ह्याबाहेर त्यांचे कार्य असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री होऊनही जिल्हावासियांशी हवा तसा समन्वय साधला जात नव्हता. त्यांचे जिल्ह्यात येण्याचे प्रमाण कमी राहिल्याने त्यांचा प्रशासनावरही वचक नव्हता व त्याचा विकासकामांवरही परिणाम दिसून येत होता. त्यामुळे जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री मिळणार का, याची प्रतीक्षा होती.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची सत्ता आली. त्यात मात्र, दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नीतेश राणेंचे मंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण झाले. मागील अडीच वर्षांत त्यांच्याकडे मंत्रीपद नसले, तरी सत्तेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला. हिंदुत्ववादी नेता म्हणूनही ओळख निर्माण केली. त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झालेले तसेच कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळख निर्माण केलेले नीतेश राणे यांची थेट कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. त्यात सुदैव असे की, कोकणशी संबंधित असलेले मत्स्य व बंदर विकास खाते त्यांना मिळाले. बऱ्याचवेळा हे खाते कोकणशी काही संबंध नसलेल्या मंत्र्यांकडे दिले गेले. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील लोकांचे प्रश्न आणि मत्स्य व बंदर विकासाबाबत म्हणावा तसा त्या-त्या मंत्र्यांकडून रस दाखविला जात नव्हता. मात्र, आता मत्स्य व बंदर विकास खाते नीतेश राणे यांना म्हणजेच कोकणच्याच आमदाराला मिळाल्याने मत्स्य व बंदर विकासाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यांनी खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडाकाही सुरू केला आहे.

नीतेश राणेंना

कॅबिनेटमंत्री पद आणि कोकणशी संबंधित मत्स्य व बंदरे विकास खाते मिळाले, तरी जिल्हा विकासाला चालना मिळण्यासाठी पालकमंत्रीपदही मिळणे फार महत्वाचे होते. त्याचीच प्रतीक्षा सर्वांना होती. ती आता संपली आहे. त्यामुळे पालकमंत्री म्हणून त्यांना निश्चितपणे जिल्हा विकासाबाबत महत्त्वाची पावले उचलावी लागणार आहेत. जिल्हा विकासाचा आराखडा बनवून पुढील काळात विकासाचा चढता आलेख ठेवावा लागणार आहे. 2014 नंतर राणे कुटुंबामध्ये पुन्हा एकदा पालकमंत्रीपद आले आहे. नारायण राणे यांच्याप्रमाणेच काम करण्याची त्यांची पद्धत असल्याने व प्रशासनावर वचक ठेवून निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असल्याने जिल्हा विकासाच्यादृष्टीने हक्काचा पालकमंत्री मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे.

जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळण्याच्या दृष्टीने विकासाचे व्हिजन असलेले, निर्णय घेण्याची क्षमता असलेले नेतृत्व मंत्रिपदाच्या रुपाने मिळावे, अशी सिंधुदुर्गवासियांची अपेक्षा होती. अर्थात विकासाचे व्हिजन व निर्णय क्षमता अखंडपणे नीतेश राणे यांच्याकडे असून त्यांच्या माध्यमातून विकासाचा बॅकलॉग भरून निघेल, अशी जिल्हावासीयांची अपेक्षा आहे. राज्यभरात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्हींमध्ये आमदार नीतेश राणे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या साऱ्याचा फायदा जिल्हा विकासासाठी होणार आहे. पर्यटन जिल्हा म्हणून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुहुर्तमेढ रोवलेल्या सिंधुदुर्गचा विकास करण्याची जबाबदारी आता पालकमंत्री नीतेश राणे यांच्यावर असणार आहे. आज केंद्रात भाजपचे सरकार असून राज्यातही भाजप महायुतीचेच सरकार आहे. अशा स्थितीत विकासकामांबाबत कोणतीही अडसर न राहता, जिल्ह्याचा अपेक्षित विकास निश्चितपणे मार्गी लागण्यास हरकत

नाही.

सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार म्हणून नारायण राणे, तर त्यांचे सुपुत्र असलेले कणकवलीचे आमदार नीतेश राणे आहेत. नीतेश यांचेच बंधू नीलेश राणे हे कुडाळ-मालवणचे आमदार आहेत तसेच सावंतवाडीचेही आमदार शिंदे शिवसेनेचे दीपक केसरकर हे महायुतीचेच आहेत. त्यामुळे पुढील काळात जिल्ह्याचा सर्वांगिण विकास होत असतानाच सी-वर्ल्डसारखा प्रकल्प मार्गी लावावा. एमआयडीसी, बेरोजगारीचा प्रश्न, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग, आरोग्यविषयक समस्या मार्गी लावून सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्यादृष्टीने अग्रेसर रहावा हीच अपेक्षा आहे. खासदार नारायण राणे नेहमीच सिंधुदुर्ग जिल्हा दरडोई उत्पन्नात पहिल्या पाच क्रमांकात यावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत असतात. ही अपेक्षा पूर्णत्वास नेण्याची संधी आता पुढील पाच वर्षांत नीतेश राणेंना पालकमंत्री म्हणून उपलब्ध झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उदय सामंत यांना पुन्हा एकदा मिळाले आहे. त्यामुळे जिल्हा विकासाच्यादृष्टीने ते फार महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांच्याकडे उद्योग खाते असल्याने जिल्ह्यात वेगवेगळे छोटे-मोठे उद्योग आणताना पालकमंत्र्यांची भूमिका फार महत्त्वाची असते आणि पालकमंत्रीपदही त्यांच्याकडेच असल्याने उद्योग आणण्यातील अडसर दूर होणार आहेत. केवळ रत्नागिरीच नव्हे तर संपूर्ण कोकणात एमआयडीसी स्थापन करून उद्योग पर्व सुरू करण्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी एकच आमदार विरोधी पक्षाचा असून उर्वरित चारही आमदार महायुती सरकारचे आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यामध्ये विरोधाला विरोध न होता काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दोन्ही पालकमंत्र्यांसाठी केंद्रात व राज्यात सत्ता असल्याने कुठलेही कारण न सांगता, कोकणात सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत व कोकणवासीयांच्या अपेक्षांची पूर्तता करावी लागणार आहे.

संदीप गावडे

Advertisement
Tags :

.