राज्यात तेजोमय मंगलपर्वाचा प्रारंभ
गोमंतकीय जनतेकडून दिवाळीचे उत्स्फूर्त स्वागत, नरकासुर प्रतिमांचे दहन
पणजी/ विशेष प्रतिनिधी
दिव्यांचा उत्सव अर्थात दीपोत्सवाला गोव्यात आज रविवारी पहाटे मोठ्या उत्साहात व थाटात प्रारंभ झाला. पहाटे नरकासुर वध आणि प्रज्वलनानंतर महिलावर्गाने दारात रांगोळी काढली आणि पणत्या प्रज्वलित करून दिवाळी उत्सवाला प्रारंभ झाला व त्यानंतर अभ्यंग स्नानाला प्रारंभ झाला.
तमसो मा ज्योतिर्गमय ! अंधारातून प्रकाशाकडे वाट दाखविणारे आपले भारतीय तत्त्वज्ञान, एक पणती शेकडो पणत्या प्रज्वलित करते आणि सर्वत्र पसरलेला अंधार नष्ट करते. त्याचबरोबर संपूर्ण गोवा दिवाळीच्या या पहाटे प्रकाशमान झाला .तमाम गोमंतकीय जनतेने दिवाळीचे उत्स्फूर्त असे स्वागत केले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत नरकासुर प्रतिमांसाठी विविध ठिकाणी स्पर्धा घेण्यात आल्या तर प्रत्येक गावागावांमध्ये नरकासुराच्या प्रतिमा देखील उभ्या करण्यात आल्या होत्या त्या पाहण्यासाठी रात्र उशिरापर्यंत युवावर्ग मिळेल त्या वाहनाने सर्वत्र फिरत होते त्यामुळे वाहतुकीची पणजीसह अनेक शहरात प्रचंड कोंडी झाली. पहाटे या प्रतिमांचे सार्वजनिकरित्या दहन करण्यात आले. नरकासुराच्या भव्यदिव्य प्रतिमा हे यंदाच्या दिवाळीचे आणखी एक खास आकर्षण बनले होते.
आज पहाटे नरकासुर प्रतिमांचे दहन करण्यात आल्यानंतर विविध ठिकाणी मंदिरांमध्ये काकड आरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी घराची ओवाळणी तसेच पोह्यांच्या विविध प्रकाराचे पदार्थ अर्थात दिवाळीचा फराळ घरोघरी सुरू होईल. दिवाळीच्या निमित्ताने घरादारांवर विद्युत तसेच पारंपरिक पणत्यांच्या दिव्यांची आरास करण्यात आली होती. पहाटे प्रत्येकाच्या घरावर आकाशकंदील प्रज्वलित करण्यात आला. या दीपोत्सवाने संपूर्ण गोवा शनिवारी सायंकाळी उशिरा प्रकाशमान झाला होता. जनतेमध्ये कमालीचा उत्साह हा गेले दोन दिवस दिसून येत आहे
आज लक्ष्मीपूजन कार्यक्रम
आज सायंकाळी लक्ष्मीपूजन उत्सव आहे. प्रत्येकाच्या घरी तसेच व्यापारी आस्थापनामध्ये आज महालक्ष्मीची रितसर पूजा करण्यात येईल. लाखो गोमंतकीयांनी एकमेकांना, आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना शुभेच्छा संदेशाद्वारे आणि प्रत्यक्ष भेटीतून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.