सुनीता विल्यम्सच्या परतीच्या प्रवासाचा प्रारंभ
बुधवारी पहाटेपर्यंत पृथ्वीवर, अवकाश यान अंतराळ स्थानकापासून विलग, पृथ्वीच्या दिशेने
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
गेले 9 महिने नासाच्या अंतराळ स्थानकात असणाऱ्या अंतराळ वीरांगना सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीच्या दिशेने परतीच्या प्रवासाचा प्रारंभ झाला आहे. त्यांच्यासमवेत बुच विल्मोर हे अंतराळ वीरही आहेत. त्यांना घेऊन येणारे अंतराळ यान आता त्यांच्यासह या अंतराळ स्थानकापासून विलग झाले. ते पृथ्वीकडे येत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे त्याचे पृथ्वीवर आगमन होणार आहे.
त्यांना परत घेऊन येणारे अंतराळ यान जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या कंपनीचे असून ते ‘स्पेसएक्स ड्रॅगन’ या नावाने ओळखले जात आहे. हे यान भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी रात्री नासाच्या अंतराळ स्थानकाशी सलग्न झाले. त्यानंतर, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर अंतराळ स्थानकातून या यानात प्रवेशले. सर्व चाचण्या झाल्यानंतर हे यान भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी या दोन अंतराळ वीरांसह अंतराळ स्थानकापासून विलग झाले आणि ते पृथ्वीकडे येण्यास निघाले. या परतीच्या प्रवासास 17 तास लागणार आहेत. त्यामुळे बुधवारी पहाटे 3 ते 4 वाजता हे यान अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतानजीक समुद्रात उतरणार आहे.
सुखरुप प्रवासासाठी यज्ञ
सुनीता विल्यम्स या मूळच्या भारतीय वंशाच्या आहेत. त्यांचे चुलतबंधू दिनेश रावळ हे गुजरातमध्ये आहेत. विल्यम्स यांच्या सुखरुप प्रवासासाठी त्यांनी मंगळवारी यज्ञ आणि देवपूजेचे आयोजन केले होते. 9 महिन्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे, यामुळे आपण अत्यंत आनंदात आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या परतीच्या सुखरुप प्रवासासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. गेले काही दिवस आम्ही विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी जात आहोत. आम्ही यज्ञाचेही आयोजन केले. तसेच विविध अनुष्ठाने आणि पूजाअर्चा करीत आहोत. सुनीता विल्यम्स यांच्या आई आणि जवळचे आप्तेष्टही त्यांच्या आगमनाची आतुरतेने प्रतीक्षा करत असून देवाची प्रार्थना करत आहोत, असे रावळ यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी यांचे पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्स यांना एक पत्र पाठविले असून त्यात त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 140 कोटी भारतीय लोकांना तुमच्या कामगिरीचा अभिमान वाटतो. हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मार्चलाच त्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविले आहे. मी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माजी अध्यक्ष जोसेफ बायडेन यांना भेटलो, तेव्हा तुमचे क्षेमकुशल विचारले. आपला निर्धार आमच्यासाठी कौतुकास्पद आहे. आपण आमच्यापासून हजारो किलोमीटर दूर असलात तरी आमच्यापाशीच आहात, असे नेहमी आम्हाला वाटते. संपूर्ण भारत आपल्या आगमनच्या प्रतीक्षेत आहे, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 1 मार्चच्या पत्रात व्यक्त केली आहे.
पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश होताना...
कोणत्याही अवकाश यानाच्या परतीच्या प्रवासातील सर्वात मोठे आव्हान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना निर्माण होते. निर्वात पोकळीतून हे यान जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते तेव्हा घर्षणामुळे त्याचे तापमान 7 हजार डिग्री फॅरनहाईट इतके पोहचते. या तापमानातही सुरक्षित राहील अशी या यानाची रचना केलेली असते. इतक्या मोठ्या तापमानाचा यानातील अंतराळवीरांना कोणताही त्रास होणार नाही, अशी यानाची अंतर्गत रचना असते. यानाच्या बंद खिडकीतून जेव्हा अंतराळवीर हे दृष्य पहात असतात, तेव्हा त्यांना आपण आगीच्या गोलकातून प्रवास करत आहोत, असा अनुभव येतो, असे अनुभवी अंतराळवीरांनी स्पष्ट केले.
सुनीता विल्यम्सची साऱ्यांनाच प्रतीक्षा
ड सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या प्रवासासाठी साऱ्या भारतीयांच्या शुभेच्छा
ड विल्यम्स यांच्या भारतातील नातेवाईकांकडून यज्ञ आणि देवपूजेचे आयोजन
ड बुधवारी पहाटे साधारणत: पावणेचारपर्यंत यान अमेरिकेजवळच्या समुद्रात
ड नासाचे अवकाश स्थानक ते पृथ्वी हा प्रवास आहे, साधारणत: 17 तासांचा