For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खुंटा बळकट तरी जिल्ह्यात भाजपशी टक्कर अटळ

01:57 PM Jun 11, 2025 IST | Radhika Patil
खुंटा बळकट तरी जिल्ह्यात भाजपशी टक्कर अटळ
Advertisement

सांगली जिल्हा / शिवराज काटकर : 

Advertisement

सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या पक्षासोबत तडजोडीची शक्यता नाकारतानाच जयंत पाटील यांना शरद पवारांनी पुन्हा निवडणुकीपर्यंत प्रदेशाध्यक्षपद सांभाळण्यास सांगितले. पूर्वी बेसावध जयंतराव समर्थकांनी यावेळी गर्दी करून त्यांच्या पद सोडण्याच्या घोषणेला विरोध केला ज्यामुळे पक्षात खुंटा हलवून बळकट झाला. पण, त्यामुळे आता राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरण्याची आणि जिल्हयात भाजपला आव्हान देण्याची, त्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका आणि नगरपालिकांना काँग्रेस, शिवसेना आणि सत्तेतील नाराजांसह महाविकास आघाडी करण्याची जबबादारी पुन्हा त्यांच्यावरच येऊन पडली आहे.

पक्षाच्या मेळाव्यात तुकाराम आणि नथुराम अशी मांडणी करून शरद पवार यांनी सात वर्षे प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली यापुढे नव्या व्यक्तीला वाव द्यावा असे जयंतराव म्हणाले आणि त्यांना पदावर राहण्याचा आग्रह करणारा एकच आवाज सभागृहात उमटला. यातील एक आवाज नाशिकचा होता हे जयंतरावांच्या भाषणातून पुढे आले तरी वाळव्यातूनही मंडळी उपस्थित होती ज्यांचा आवाज बुलंद होता हेही तितकेच सत्य. नथुराम आणि तुकाराम ही मंचावरील मांडणी असली तरी पक्षातील मंडळींना सत्तेचा श्वास हवा असतो त्यामुळे एनडीएशी तडजोड करा असाही निरोप जयंतरावांनी पवारांना पोहोचवल्याची चर्चा असते. त्यामुळेच त्यांच्या भाजपप्रवेश चर्चा उठतात. आता पवारांनी जयंतरावांनी प्रामाणिकपणे काम केल्याची शाबासकी देत पुन्हा मुदतवाढ दिली आहे. ज्यामुळे राष्ट्रवादीतील त्यांची वाटचाल अशीच सुरू राहील व परिणामी जिल्ह्यातील बरीच मंडळीही पक्षात कायम राहतील अशी चिन्हे आहेत.

Advertisement

महापालिकेसह बहुतांश ठिकाणी आ. जयंत पाटील, आ. विश्वजित कदम, खा. विशाल पाटील यांना एकत्र येऊन पॅनेल उभे करावे लागेल. काही तालुक्यांमध्ये सत्ताधारी आघाडीतील नाराजही त्यांच्याकडे येऊ शकतात. त्यामुळे भाजपमध्ये अद्यापही शांततेचे वातावरण आहे. तालुकावार विचार करता, खुद्द जयंतरावांची वाळवा तालुक्यात लढत असेल ती भाजपबरोबर, इथे त्यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची उमेदवारी घेऊन निशिकांत पाटील यांनी घाम फोडला होता. ते पालिकेला आव्हान देतीलच. मात्र भाजपनेही या तालुक्यात ताकद वाढविल्याने सम्राट महाडिक हे नवे आव्हान देणार आहे. त्यामुळे इथे थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. दोन्हीकडे मित्रपक्षांना तालुक्यात फारसा वाव नाही.

माजी आ. मानसिंगराव नाईक यांच्यावर जिल्हा बँकेच्या चौकशीचा दबाव आणून अजितदादांच्या पक्षात जाण्याची स्थिती निर्माण केली जात असली तरी वाळवा तालुक्यातील ४८ गावांवर आपले अस्तित्व असल्याची जाणीव असलेले मानसिंगराव जयंतरावांच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचे महाडिक आणि आ. सत्यजित देशमुख यांचे पटत नसल्याने इथे मानसिंगराव, शिवाजीराव नाईकांची भाजप विरोधात आघाडीच ऐनवेळी होऊ शकते. शिराळा पालिका निवडणुकीत मानसिंगरावांना घरच्या मंडळींशीच लढावे लागेल, कोणाशी जुळवून घेतात ते पहायचे. पलूस, कडेगाव तालुक्यात लाड परिवार ठरवेल ती राष्ट्रवादीची दिशा आहे. क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आ. अरूणअण्णांना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागत असल्याने त्यांची भूमिका 'आस्तेकदम' आहे. आ. विश्वजित कदम यांना या दोन्ही तालुक्यात वर्चस्व निर्माण करायचे असून दोन्ही देशमुख बंधूंत निर्माण झालेल्या कटुतेचा फायदा उचलायचा आहे, जयंतराव या तालुक्यात आता आ. कदम यांच्याशीच जुळवून घेतील अशी स्थिती आहे.

तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात आ. रोहीत पाटील यांची भूमिका आर. आर. पाटील यांच्या जिथे शरद पवार तिथे आपण अशी आहे.संजयकाका पाटील आणि अजितराव घोरपडे या युवकाच्या धडाक्याने विधानसभेला अडचणीत आले त्यामुळे दोन्ही तालुक्यात रोहीत पाटील यांना चांगला वाव निर्माण झाला आहे. खानापूर, आटपाडीत वर्चस्व निर्माण केलेले आ. सुहास व अमोल बाबर विसापूर सर्कल भाजपकडे सोपवून नामानिराळे होण्याचा प्रयत्न करतील. तिथे या अनोख्या युतीला आव्हान कोण देणार हा नेहमीप्रमाणे औत्सुक्याचाच विषय असेल. आटपाडी तालुक्यातील अमरसिंह देशमुख आणि तानाजी पाटील यांच्यात एकीसाठी प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा उठल्याने वातावरण बदलणार आहे. एकूणच चित्र फारसे बदलले नसले तरी अस्पष्ट दिसणारे थोडे अधिक स्पष्ट झाले आहे इतकेच.

  • जयश्रीताईंचा निर्णय आणि मनपातील समीकरणे

जयश्रीताई पाटील यांनी आपल्या पक्षात यावे यासाठी अजितदादा आणि भाजप प्रयत्न करत आहे. ताईंना अजितदादांचा पक्ष जवळचा वाटतो आहे. अशावेळी विशाल पाटील यांनी आता त्यांची साथ सोडायचे ठरवलेले दिसते. पूर्वी मदन पाटील, प्रकाशबापू गट होतेच. तशीच निवडणूक लढविताना विश्वजित कदम, विशाल पाटील आणि जयंतराव यांची आघाडी इथे होण्याची चिन्हे आहेत कारण कोणाकडेच पुरेसे उमेदवार नाहीत. मिरजेत दोन्ही राष्ट्रवादीकडे तुल्यबळ नेते (जयंतरावांकडे मैनुद्दीन बागवान, हारगे तर दादांकडे आ. इद्रिस नायकवडी, जमील बागवान राधिका हारगे) असल्याने काही प्रभागात या गटांमध्येच लढत होईल अशी चिन्हे आहेत. अजितदादांच्या गटाला भाजपला इथे जुळवून घ्यायचे आहे शिवाय आपलेही वर्चस्व राहील, अशी रणनीती आखायची आहे. पण, ती आखणार कोण? पालकमंत्री की आमदार? शेखर इनामदार यांच्यासह इतर घटकांचा आग्रह काय असेल हे सगळे जयंतराव आणि काँग्रेसनेते रणनीती कशी आखतात त्यावर अवलंबून असेल.

Advertisement
Tags :

.