For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बॅरिकेड्समुळे गणेशभक्तांची सोयीपेक्षा गैरसोयच अधिक

10:34 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
बॅरिकेड्समुळे गणेशभक्तांची सोयीपेक्षा गैरसोयच अधिक
Advertisement

मिरवणूक पाहण्यासाठी करावी लागली कसरत : रुग्णांनाही बसला फटका, नवे प्रयोग ठरले तापदायक

Advertisement

बेळगाव : गणेशोत्सव मंडळांना विश्वासात न घेता प्रशासनाने राबविलेले नवे प्रयोग तापदायक ठरले. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. पोलीस दलाने जुन्या अनुभवांवरून बोध घेतला नाही तर दरवर्षी बंदोबस्तासाठी अतिरिक्त बळ मागविण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. गेल्या दोन दिवसांतील परिस्थिती लक्षात घेता सोयीपेक्षा गैरसोयीच अधिक ठरल्या. गणेशोत्सव व श्री विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस दलाने व्यापक तयारी केली होती. बंदोबस्तासाठी साडेतीन हजारहून अधिक बळ मागविण्यात आले होते. विशेष प्रशिक्षित कमांडोंसह केंद्रीय औद्योगिक सुरक्षा विभागाची तुकडीही मागविण्यात आली होती. अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. स्वत: पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, उपायुक्त रोहन जगदीश या अधिकाऱ्यांनी बंदोबस्तावर लक्ष ठेवले होते. 7 आयपीएस अधिकाऱ्यांना जुंपण्यात आले होते. प्रथमच बेळगाव शहरात येणारे सर्व मार्ग बॅरिकेड्स उभे करून बंद करण्यात आले होते. वेगवेगळ्या गल्लीबोळातून मुख्य रस्त्यांना जोडणारे मार्गही बंद करण्यात आले होते. याआधी केवळ मिरवणूक मार्गाला जोडणारे रस्ते बंद केले जात होते. आता प्रत्येक गल्लीबोळात  बॅरिकेड्स उभे करून गणेशभक्तांना पायी चालतही मिरवणुकीकडे येता येऊ नये, अशीच व्यवस्था करण्यात आली होती.

कित्तूर चन्नम्मा चौक परिसरात तर तीन पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी तळ ठोकून होते. सायंकाळी 5 वाजताच चन्नम्मा सर्कलपासून काकतीवेसकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. केवळ हा रस्ता नागरिकांसाठी बंद झाला नाही तर उपनगरातून येणाऱ्या श्रीमूर्तींना मुख्य मिरवणुकीत सहभागी होण्यासाठीही बंद करण्यात आला होता. या निर्णयामुळे पोलीस व मंडळांचे पदाधिकारी यांच्यात वादावादी, खटके उडण्याचे प्रसंग घडले. उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची श्रीमूर्ती चन्नम्मा सर्कलमार्गे काकतीवेसवरून गणपत गल्लीत प्रवेश करीत होती. नंतर सर्व मंडळांना कॉलेज रोड मार्गे वळविण्यात आले. यासाठी केवळ बॅरिकेड्स नव्हे तर पोलीस बस उभी करून चन्नम्मा सर्कलजवळ रस्ता अडविण्यात आला होता. केळकर बाग, कडोलकर गल्ली, काकतीवेस रोड परिसरात बॅरिकेड्स उभे करून जोडरस्ते बंद केले होते. या मार्गावरून पायी चालत जाणेही कठीण होते. मात्र, सर्व अडथळे पार करून मोठ्या संख्येने गणेशभक्तांनी गर्दी केली होती.

Advertisement

या बॅरिकेड्समुळे केवळ गणेशभक्तांनाच त्रास झाला नाही तर उपचारासाठी जाणारे रुग्ण, शाळकरी मुलांनाही त्रास सहन करावा लागला. बुधवारी सकाळीही ही व्यवस्था तशीच ठेवण्यात आली होती. त्यामुळे सकाळी उठून आपापल्या कामावर जाताना गल्लीतून बाहेर पडणे  बॅरिकेड्समुळे कठीण झाले होते. गणेश मंडळांना विश्वासात न घेता केलेल्या या बदलामुळे मंडळांनी  कॉलेज रोडवरून मिरवणूक पुढे नेली तरी अनेक ठिकाणी वादावादीच्या घटना घडल्या. पोलीस आयुक्त व उपायुक्त आपल्या अवतीभवती विशेष जवानांचा गराडा ठेवून बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते. संवेदनशील भागातील मिरवणुकीवर अधिकारी लक्ष ठेवून होते. मंड्या जिल्ह्यातील नागमंगलसह राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी गणेशोत्सवाच्या काळात दंगली घडल्या. बेळगाव शांत ठेवण्यात पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरली असली तरी अचानक झालेला मार्ग बदल व बॅरिकेड्सच्या प्रयोगामुळे मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला. अनेक ठिकाणी तर डीजेमुळे पोलीस अधिकारी व गणेश मंडळांचे कार्यकर्ते यांच्यात सातत्याने खटके उडत होते.

बॅरिकेड्सच्या अडथळ्यांमुळे रुग्णांचेही हाल

बॅरिकेड्सच्या अडथळ्यांमुळे नागरिकांची गैरसोय झालीच. परंतु रुग्णांचेही हाल झाले. कोंडसकोप येथून आपल्या बाळाला दवाखान्यात दाखविण्यासाठी आलेल्या दाम्पत्याला किल्ल्यापासून किर्लोस्कर रोडवरील दवाखाना गाठेपर्यंत पुरेपुरे झाले. त्यांच्या हातातील बाळाला पाहूनही पोलिसांनी ना त्यांची विचारपूस केली, ना त्यांना लवकर पोहोचण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले, ना बॅरिकेड्सचा अडथळा दूर करून त्यांना वाट करून दिली. बॅरिकेड्स लावण्याबाबत प्रशासनाने पूर्वकल्पना दिली नव्हती. त्यामुळे कोणालाच माहिती नव्हती. प्रत्येकजण वेगवेगळ्या मार्गाने शहरात प्रवेश करत होता.परंतु बॅरिकेड्समुळे लांबचा फेरा घालत त्यांना जावे लागले.

Advertisement
Tags :

.