भारतीय अॅमेझॉनची धुरा समीर कुमारांच्या हाती
1 ऑक्टोबर 2024 पासून पदभार स्वीकारणार : मनीष तिवारींच्या जागी होणार नियुक्ती
नवी दिल्ली : ई-कॉमर्स दिग्गज अॅमेझॉन कंपनीचे समीर कुमार 1 ऑक्टोबर 2024 पासून भारतातील ग्राहक व्यवसाय प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. समीर कुमार यांच्या आधी मनीष तिवारी हे पद सांभाळत होते. मनीष तिवारी 8 वर्षे अॅमेझॉनचे नेतृत्व करत होते. समीर कुमार यांना 25 वर्षांचा कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वी, समीर कुमार हे वॉशिंग्टन येथील अॅमेझॉनच्या आंतरराष्ट्रीय ग्राहक व्यवसायाचे अध्यक्ष होते.
कोण आहेत समीर कुमार?
समीर कुमार 1999 पासून ई-कॉमर्स अॅमेझॉनशी जोडले गेले आहेत. अॅमेझॉन कंपनीच्या विकासात समीर कुमार यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2013 मध्ये अॅमेझॉन इंडिया लाँच करण्यात समीर कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. समीर कुमार आता पश्चिम आशिया, दक्षिण आफ्रिका आणि तुर्कीसह अनेक क्षेत्रांमध्ये अॅमेझॉनच्या ग्राहक ऑपरेशन्सचे नेतृत्व करतात. आपल्या नवीन भूमिकेत, ते भारतातील व्यवसाय व्यवस्थापित करण्याबरोबरच या क्षेत्रांवर देखरेख ठेवतील.
अॅमेझॉनचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणाले, ‘समीरच्या उदयोन्मुख बाजारपेठांमधील व्यापक अनुभवामुळे, मी भविष्याबद्दल आणि भारतातील ग्राहक आणि व्यवसाय या दोहोंसाठीच्या आमच्या योजनांबद्दल अधिक आशावादी आहे.’
तिवारींनी 8 वर्षे केले नेतृत्व
मनीष तिवारी यांनी 8 वर्षे अॅमेझॉन इंडियाचे नेतृत्व केले आहे. मनीष तिवारी यांचे पद आता समीर कुमार यांच्याकडे आहे. मनीष तिवारी यांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, मात्र मनीष तिवारी 1 ऑक्टोबरपर्यंत आपल्या पदावर राहणार आहेत.