कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गणेशोत्सव मंगलमय पर्वाला प्रारंभ

04:11 PM Aug 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सर्वत्र चैतन्यदायी वातावरण : घरोघरी बाप्पांच्या आगमनाची उत्सुकता 

Advertisement

बेळगाव : मांगल्याचे, बुद्धीचे प्रतीक असणाऱ्या श्री गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वाला आजपासून प्रारंभ होणार आहे. गणांचा अधिपती, 64 कलांचा प्रणेता, विघ्नहर्ता म्हणून ज्यांची पूजा केली जाते, त्या गणपतीचे आगमन बुधवारी होत आहे. अर्थातच संपूर्ण शहर त्यांच्या आगमनासाठी आतूर झाले आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सिद्ध झाली आहेत. तर घरोघरी श्री गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी लगबग सुरू असून श्रीं’च्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साही, मंगलमय वातावरण आहे. आजपासून घराघरातून गणेश आरत्या व बाप्पांचा जयघोष दुमदुमणार आहे. गेल्या आठवडाभरापासूनच बाप्पांच्या स्वागतासाठी बाजारपेठेत गर्दी होत असून रस्ते गर्दीने फुलत आहेत. मंगळवार हा खरा म्हणजे मध्यवर्ती बाजारपेठेच्या दुकानदारांचा सुट्टीचा दिवस. परंतु यावर्षी मात्र मंगळवारी बाजारपेठेतील दुकाने खुली राहिली. तेथे येणाऱ्या ग्राहकांच्या आणि रस्तोरस्ती बसलेल्या बैठ्या विक्रेत्यांच्या गर्दीने मंगळवारी उच्चांक गाठला.

Advertisement

ग्रामीण भागातील विक्रेत्यांनी गणपत गल्ली फुलली

शहरातील मुख्य मानली जाणारी बाजारपेठ म्हणजे गणपत गल्ली होय. याठिकाणी एरवी रस्त्याच्या दुतर्फा विक्रेते बसतात. परंतु गणेशोत्सव काळातमध्ये सुद्धा विक्रेत्यांची एक वेगळी रांग विक्रीसाठी साहित्य घेऊन बसते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपत गल्लीचे एक वेगळेच स्वरुप पहायला मिळते. गणेशोत्सवात सर्वांना सामावून घेणारा उत्सव. राबत्या हातांना काम देणारा हा उत्सव. अर्थातच प्रत्येकजण या निमित्ताने व्यापार व्हावा आणि चार पैसे खुळखुळावेत या हेतूनेच विक्रीसाठी सज्ज झालेला असतात. मंगळवारी पहाटेपासूनच फुले, पत्री, हार, दुर्वा, तुळस, केवडा, आघाडा, शमी पत्री, केळीचे मोने, वाती, फुलवाती, गजवस्त्र, धूप, उदबत्ती, उद, अत्तर अशी सुवासिक द्रव्ये, आंब्यांची पाने, माटोळी घेऊन आसपासच्या ग्रामीण भागातील विक्रेते बाजारपेठेत दाखल झाले. स्थानिक आणि ग्रामीण भागातील विक्रेत्यांनी गणपत गल्ली फुलून गेली. विशेषत: बाप्पांच्या ‘माटोळी’साठी लागणारे आकर्षक रानसाहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. निसर्गपूजक उत्सवाची प्रचिती या निमित्ताने ठिकठिकाणी येत होती. याचबरोबर श्रीफळ, नारळ, नागपुडी, चौरंग, सजावटीचे साहित्य, किरीट, मुकूट, कृत्रिम फुले, माळा, मणीहार, विद्युत माळा, झुंबर, बस्कर अशा अनेक साहित्यांनी बाजारपेठेला उधाण आले. याशिवाय पाच फळांचा संच सर्वत्र विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. लाडक्या गणपती बाप्पांच्या बैठकीची जागा अधिक कशी सजवता येईल, त्या अनुषंगाने आरास सजावट साहित्याच्या दुकानांमधून तऊणाईची लगबग मोठ्या प्रमाणात होती.

भाजी मंडई हिरवीगार

गणेश चतुर्थी दिवशी 16 प्रकारच्या भाज्या वापरून खतखते हा चविष्ट पदार्थ तयार केला जातो. त्यामुळे वाळूक, बिनीस, भोपळा, वांगी, मका, बटाटे, गाजर, तोंडली, पडवळ, टोमॅटो, सोले, पावटे, दुर्मिळ असणारी फागलं, भाजीचे बांबू, ओल्या शेंगा, ढबू  फ्लॉवर, कोबी यासह अनेक प्रकारच्या भाज्यांनी भाजी मंडई हिरवीगार झाली आहे.

गणेशोत्सव

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article