तालुक्यात मंगलमय दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ
व्यावसायिक, कारखानदारांकडून लक्ष्मीपूजन मोठ्या जल्लोषात : विविध गावातील मंदिरांमध्ये दीपोत्सव कार्यक्रम
वार्ताहर/किणये
तालुक्यात मंगलमय दिवाळी सणाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. ग्रामीण भागात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्याची परंपरा आहे. वसुबारस पूजनापासून या दिवाळी सणाच्या पर्वाला प्रारंभ झाला आहे. गेल्या तीन दिवसापासून विविध कार्यक्रम सुरू आहेत. शुक्रवारी तालुक्याच्या विविध गावांमध्ये सामूहिक पद्धतीने आरती करण्यात आली.
तसेच छोटे-मोठे व्यावसायिक, कारखानदार यांनी शुक्रवारी लक्ष्मीपूजन मोठ्या जल्लोषात केले. यानिमित्त सर्व पै-पाहुणे व मित्रमंडळी एकत्र आले होते. ग्रामीण भागात वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळीचा सण साजरा करण्याची परंपरा आहे. घरात व दारात शेणाने बनवलेल्या गवळणी ठेवण्यात आल्या होत्या. त्यावर फुले घातली. बैलांना सजवून त्यांची पूजा करण्यात आली. तसेच शिवारात बळीराजाची पूजा केली. अशा या विविध पूजाविधींनी हा दिवाळीचा सण साजरा करण्यात येत आहे.
काजुळ्याचे झाड आणून त्याला नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. परंपरा आजही जपण्यात आली आहे. दिवाळीच्या सणानिमित्त गुऊवारी तालुक्याच्या विविध गावातील मंदिरांमध्ये दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. तसेच गावागावांमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोरही दीपोत्सव करण्यात आला. मंदिरांमध्ये या दीपोत्सव सोहळ्यानिमित्त भजन, प्रवचन व कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
काही गावांमध्ये गुऊवारी सायंकाळी तर बहुतांशी गावांमध्ये शुक्रवारी सकाळी सामूहिक आरती करण्यात आली. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सुख आणि दु:ख असे दोन्ही प्रसंग येतात. त्यामुळे या दिवाळीच्या सणातही गोड पदार्थाबरोबरच सामूहिक आरती करताना कारटे फोडून ते खाल्ले जाते. ही परंपरा जपण्यात आली आहे. कारण कडू कारटे खाल्ल्यामुळे आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ मिळते, अशी प्रथा आहे.
दिवाळीनिमित्त मनोरंजनाचे कार्यक्रम
दिवाळी सणानिमित्त नोकरी, व्यवसायनिमित्त बाहेरगावी गेलेला कामगार वर्गही आपल्या गावात आला होता. दिवाळीच्या या सणात गावागावातील सार्वजनिक मंडळांच्या वतीने विविध स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
खरेदीसाठी दुकानांमध्ये अद्याप गर्दी
दिवाळीच्या या सणानिमित्त शेतकरी आपल्या शिवारात जाऊन पूजा करताना दिसत होता. शिवारात बळीराजाची पूजा करून शेतातील भाताची लोंब घरी आणण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी सदर भारताचे लोंब हे आपल्या मंदिरामध्ये तसेच देव्हाऱ्यासमोर ठेवून पूजा करताना दिसत होते. बहुतांशी प्रमाणात दिवाळीत ही पूजा करूनच भातकापणीला सुऊवात करण्यात येते. अलीकडे मात्र हंगामानुसार भातकापणी करण्यात येत आहे. दिवाळी सणानिमित्त ग्रामीण भागातील पिरनवाडी, मच्छे, बेळगुंदी, हलगा आदी भागातील विविध दुकानांमध्ये बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती. तालुक्यातील नागरिक बेळगावला येऊन दुचाकी, चारचाकी, कपडे, इलेक्ट्रिकल वस्तू आदींची खरेदी करताना दिसत होते.
दिवाळीच्या सणानिमित्त सर्वजण आपापल्या मित्र, नातेवाईक यांना भेटून अथवा व्हाट्सअप, फेसबुक मेसेजद्वारे शुभेच्छा देताना दिसत होते.