ऑडीटरच्या ताशेऱ्यांचेच झाले ऑडीट
कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
विद्यार्थी आणि महाविद्यालयांचे पैसे इतर कामासाठी वापरल्याने विद्यापीठ प्रशासनाच्या ताळेबंद अहवालावर ऑडीटरने ताशेरे ओढले आहेत. हाच धागा पकडून अधिसभा सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. अहवालावरील ताशेऱ्यांचे सभागृहात वाचन करून ऑडीटरच्या ऑडीटचेच ऑडीट केले. विद्यार्थी हिताच्या मुद्यावर विद्यापीठ विकास आघाडी अन् सुटा संघटनेत एकी दिसली. सर्वच सदस्यांनी वार्षिक ताळेबंद अहवालातील त्रुटींची चिरफाड केली. यावर सूचनांची पुर्तता करण्याचे आश्वासनप्रशासनाने दिल्यानंतरच सूचनांच्या पुर्ततेसह ताळेबंद लेखा परीक्षण अहवाल मंजूर केला.
शिवाजी विद्यापीठातील ताळेबंद लेखा परीक्षण अहवालातील त्रुटींवर प्रशासनाला धारेवर धरायचे, हे बहुतांश अधिसभा सदस्यांनी अगोदरच ठरवले होते. महाविद्यालयाचा कारभार चोख झाला पाहिजे, असा विद्यापीठाचा आग्रह असतो. त्यामुळे विद्यापीठाचा कारभारही चोख झाला पाहिजे, यासाठी सदस्यांनी प्रशासनाला सुनावले. सुटाच्या एका सदस्याने अधिसभा अध्यक्षांनी सभेत केलेल्या वक्तव्य एकाधिकारशाहीचे असून हे चालणार नाही, असे खडे बोल सुनावले.
ऑडीटरचा रिपोर्ट बदलता येत नाही, परंतु ऑडीटरने केलेल्या सूचनांची पुर्तता करणे प्रशासनाच्या हातात आहे. त्यामुळे प्रशासन अधिसभा सदस्य व ऑडीटरने केलेल्या सूचनांची पुर्तता करेल. या त्रुटी ऑडीट कालावधीत बहुतांश कर्मचारी, प्राध्यापक, अधिकारी निवडणुकीच्या कामासाठी गेले होते. त्यामुळे काही गोष्टी अहवालात नमूद करण्यास अडचणी आल्या. नियमानुसार ऑडीटरच्या वेळेत अहवाल सादर करावा लागला. परिणामी अनेक त्रुटी दिसतात. परंतु समिती नेमून एक आठवड्यात सूचनांच्या पुर्ततेचे काम सुरू होईल. पुढच्या बजेटमध्ये सूचनांची पुर्तता करून योग्य तो अहवाल मांडला जाईल, असे आश्वासन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिले. त्यामुळे सदस्यांनी पुढील ठराव सभागृहासमोर मांडण्यास प्रारंभ केला.
सभेत जवळपास 70 ते 80 ठरावांमध्ये 4-5 ठराव मंजूर होत होते. परंतु यंदा 17 ठराव मंजूर करून वेगळा इतिहास अधिसभा सदस्यांना घडवला. दोन्ही गटांच्या एकीमुळेच हे घडल्याची चर्चा सदस्यांमध्ये होती. प्रश्नोत्तराचा तास मात्र पाचच प्रश्नांवर संपला. उपप्रश्न विचारून सदस्यांनी प्रशासनाला भंडावून सोडले. दोन सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर तब्बल तासभर चर्चा झाली. प्रश्नोत्तराच्या तासाची परंपरा मात्र सभागृहाने कायम ठेवली. रात्री उशीर होऊ नये म्हणून दीड तास अगोदर घेतलेली अधिसभा तब्बल साडेबारा तास चालली.
ठरावादरम्यान क्रीडा विभागावर जास्त चर्चा झाली. यामध्ये खेळाडूंचा दैनंदिन भत्ता वाढवण्याचा चांगला निर्णय घेऊन खेळाडूंना न्याय दिला. अन्यही विद्यार्थी हिताचे 17 ठराव मंजूर केले. विद्यार्थ्यांपर्यंत विद्यापीठ योजना पोहोचवण्याचा ठराव मंजूर केला. यंदा विद्यार्थी हिताचेच जास्त निर्णय घेऊन सभागृहाने आदर्श निर्माण केला आहे. हे विद्यापीठ विकास आघाडी आणि सुटा संघटनेच्या एकमतामुळेच शक्य झाले.
विकास आघाडी आणि सुटाचे सदस्य एकमेकांचे प्रश्न आणि ठराव उचलून धरण्याचा निर्णय सभागृहाबाहेर घेत होते. त्यानंतर तो मुद्दा सभागृहासमोर मांडत होते. आपआपसात चर्चा करून कशाला मान्यता द्यायची, यासंदर्भात निर्णय घेत होते. यंदा विद्यापीठ प्रशासनाला दोन्ही गटांनी टार्गेट करून घाम फोडला.
फसवणूक करणाऱ्या महाविद्यालयावर कारवाई करा
खोट्या पावत्या जोडून कोट्यावधीची फसवणूक एका महाविद्यालयाने केली आहे. अशी फसवणूक आणखी किती महाविद्यालयांनी केली आहे? असा प्रश्न करत खोट्या पावत्या दाखवून फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी सदस्यांनी केली.