पहिल्या महिला ‘हॉकी इंडिया लीग’चा लिलाव आज
250 हून अधिक देशी खेळाडू व 70 हून अधिक परदेशी खेळाडू शर्यतीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मंगळवारी येथे होणाऱ्या महिला हॉकी इंडिया लीगच्या (एचआयएल) शुभारंभी लिलावात जगभरातील 350 हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. सात वर्षांच्या अंतरानंतर बहुप्रतीक्षित ‘एचआयएल’ विस्तारित स्वरूपासह भव्य पुनरागमन करत असून पुऊष गटाबरोबर प्रथमच विशेष महिला लीगही होणार आहे.
या ऐतिहासिक लिलावात 250 हून अधिक देशांतर्गत खेळाडू आणि 70 हून अधिक परदेशी खेळाडू उद्घाटनाच्या हंगामात स्थान मिळविण्यासाठी इच्छुक असतील. अनुभवी गोलरक्षक सविता, राष्ट्रीय संघाची कर्णधार सलीमा टेटे, उगवती ड्रॅग फ्लिकर दीपिका, सर्वाधिक सामने खेळलेली महिला खेळाडू वंदना कटारिया आणि फॉरवर्ड लालरेमसियामी यासह भारताच्या अव्वल महिला खेळाडू या शर्यतीत असतील. याव्यतिरिक्त योगिता बाली, लिलिमा मिन्झ आणि नमिता टोप्पो या माजी भारतीय दिग्गजांनीही नोंदणी केली आहे. यामुळे लिलाव आणखी रोचक होणार आहे.
आंतरराष्ट्रीय आघाडीवर डेल्फिना मेरिनो (अर्जेंटिना), शार्लोट स्टेपनहॉर्स्ट (जर्मनी), मारिया ग्रॅनॅटो (अर्जेंटिना), रॅचेल लिंच (ऑस्ट्रेलिया) आणि नायके लॉरेन्झ (जर्मनी) यासारख्या नामवंत खेळाडू शर्यतीत असतील. उल्लेखनीय म्हणजे महिलांच्या ‘एचआयएल’च्या पहिल्या हंगामात एकूण चार संघांचा सहभाग असेल, तर स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात आणखी दोन संघ जोडले जातील. या हंगामात सहभागी संघांमध्ये सूरमा हॉकी क्लब, श्राची राहर बंगाल टायगर्स, दिल्ली एसजी पायपर्स आणि ओडिशा वॉरियर्स यांचा समावेश आहे. दुसऱ्या हंगामात हैदराबाद तुफान्स आणि बीसी जिंदाल ग्रुपच्या मालकीचा संघ यांची भर पडून सहा संघांपर्यंत विस्तार केला जाईल.
प्रत्येक संघात 24 खेळाडूंचा समावेश असेल, ज्यात 16 भारतीय खेळाडू (चार कनिष्ठ खेळाडूंच्या अनिवार्य समावेशासह) आणि आठ परदेशी खेळाडू असतील. स्थानिक आणि जागतिक अशा दोन्ही प्रतिभांना प्रोत्साहन देण्याचा दृष्टिकोन या लीगच्या बाबतीत पत्करण्यात आला आहे. संघांना खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी 2 कोटी रु. खर्च करता येतील आणि 10 लाख, 5 लाख आणि 2 लाख ऊपये असे आधारभूत किमतीचे तीन स्तर असतील.