For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दौडमध्ये धार्मिक-सामाजिक देखाव्यांचे आकर्षण

12:23 PM Sep 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
दौडमध्ये धार्मिक सामाजिक देखाव्यांचे आकर्षण
Advertisement

शहापूरमध्ये हजारो धारकऱ्यांची उपस्थिती : शिवाजी महाराजांच्या जीवनावरील देखावे लक्षवेधी

Advertisement

बेळगाव : हिंदवी स्वराज्याचा सुवर्णाक्षरांनी लिहिलेला इतिहास तरुणाईला समजावा, तसेच देव, देश आणि धर्म यांची माहिती व्हावी, यासाठी नवरात्रोत्सवात दुर्गामाता दौड काढली जाते. केवळ ध्वज घेऊन धावणे इतकेच याचे महत्त्व नसून या दौडमधून अनेक सामाजिक व धार्मिक संदेश देणारे देखावे सादर करून समाजामध्ये परिवर्तन घडविले जाते. रविवारी शहापूर परिसरात बलात्काऱ्यांना फाशी, गोहत्या बंदी, अफझलखानाचा वध यासह इतर देखावे सादर करून धार्मिक व सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न झाला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने रविवारी भव्य दुर्गामाता दौड काढण्यात आली. साप्ताहिक सुटी असल्याने सातव्या दिवशी शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. नाथ पै चौक येथील अंबाबाई मंदिरापासून दुर्गामाता दौडला प्रारंभ झाला. प्रारंभी ध्येयमंत्र म्हणून अंबाबाईची आरती करण्यात आली.

ध्वज पूजन व शस्त्र पूजन सोमवंशीय क्षत्रिय समाज पंच कमिटी शहापूर तसेच नगरसेवक रवि साळुंखे, आप्पा गोवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. खासबाग, शहापूर, गोवावेस परिसरात दुर्गामाता दौडचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भगवे ध्वज, पताका तसेच स्वागत फलक लावून दौडचे स्वागत झाले. नार्वेकर गल्ली शहापूर येथील मित्रमंडळाने बलात्काऱ्यांना शासन व्हावे, असा देखावा सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर बालचमुंनी ठिकठिकाणी सजीव देखावे उत्तमरित्या सादर केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील देखावे लक्षवेधी ठरले. रविवारची दौड ही सर्वात मोठ्या लांबीची ठरली. एकूण 16 किलोमीटर अंतराची ही दौड होती. तरीही पुरुषांसह महिलांचाही अमाप उत्साह पाहायला मिळाला. संत बसवेश्वरांची आरती करून दौडची सांगता झाली. सचिन केळवेकर व राजू कदम यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. हजारोंच्या उपस्थितीत ही दौड पार पडली.

Advertisement

मंगळवार दि. 30 रोजी दौडचा मार्ग

मंगळवार दि. 30 रोजी टिळकवाडीतील शिवाजी कॉलनी येथून दौडला सुरुवात होणार आहे. एम. जी. रोड, महर्षी रोड, नेहरू रोड, पहिले रेल्वेगेट, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, देशमुख रोड, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, गोवावेस, स्वीमिंग पूल, सोमवार पेठ, देशमुख रोड, आरपीडी क्रॉस, खानापूर रोड, अनगोळ क्रॉस, हरिमंदिर रोड, चिदंबरनगर, पानसे हॉटेल रोड, हाजुगिरी, विद्यानगर, एस. व्ही. रोड, कुरबर गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथ पेठ, भांदूर गल्ली, सुभाष गल्ली, हणमण्णावर गल्ली, मारुती गल्ली, लोहार गल्ली, नाथ पै नगर, बाबले गल्ली, रघुनाथ पेठ, कलमेश्वर गल्ली, लक्ष्मी गल्ली येथून महालक्ष्मी मंदिरात सांगता होईल.

Advertisement
Tags :

.