सजावटीच्या साहित्याचे आकर्षण
गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर : आगमनाची उत्कंठा, खरेदीला वेग, भक्तांची धावपळ
बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने गणरायाच्या तयारीला वेग आला आहे. बाजारात विविध साहित्याबरोबर सजावटीच्या साहित्याची खरेदी वाढू लागली आहे. शिवाय वैविध्यपूर्ण सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ बहरली आहे. विशेषत: तयार फुले, मंडप आणि इतर नवीन साहित्याची क्रेझ निर्माण झाली आहे. बाजारपेठेत विविध प्रकारच्या लायटिंग, प्लास्टिक फुले, झिरमिळ्या माळा, डिझाईन पेपर, फुगे, गणेशाच्या मागे लावण्यासाठी चक्र, समोर लावण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे बॉल, चकाकते बॉल, सॅटिनचे प्लेन तसेच टिकली वर्क केलेले पडदे, गणेशाच्या गळ्यात घालण्यासाठी वेगवेगळ्या नमुन्यांच्या मोत्याच्या माळा अशा अनेक वस्तू सध्या उपलब्ध केले आहेत.
गणपती बाप्पा म्हणजे सगळ्यांचे लाडके आणि आराध्यदैवत. त्यांच्या आगमनाच्या सजावटीसाठी कोणतीही कसर राहू नये, यासाठी प्रत्येक जण धडपडतो आहे. त्यामुळे गणेशाच्या डोक्यावर बांधण्यासाठी खास रंगीबेरंगी फेटे दाखल झाले आहेत. चौरंग, तसेच वेगवेगळ्या चित्राकृतींनी सजलेले बस्कर, ‘श्री गणेशाय नम:’ची अक्षरे, वेगवेगळे चित्ताकर्षक तोरण, गणरायासाठी आकर्षक छत्र्या, थर्माकोलची कलात्मक मखर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मागील दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळू लागल्याने बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड होऊ लागला आहे. मंगळवारी काही दुकाने बंद ठेवली जातात. मात्र, गणेशोत्सव जवळ आल्याने मंगळवारीही बाजारपेठेत गर्दी झाली होती. पांगुळ गल्ली, मेणसी गल्ली, गणपत गल्ली, बुरुड गल्ली, बापट गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, काकतीवेस यासह शहापूर, टिळकवाडी, खासबाग, वडगाव यासह उपनगरांतही गणरायाच्या खरेदीची वर्दळ पाहावयास मिळाली.
बुरुड गल्लीत पारंपरिक सजावटीला मागणी
बुरुड गल्लीत बांबूपासून बनविल्या जाणाऱ्या पारंपरिक लाकडी मंडपांना मागणी वाढली आहे. विविध आकारांमध्ये मंडप, मंदिर आणि कमानी तयार करण्यात आल्या आहेत. नागरिकांना पसंत पडतील अशा आकर्षक कमानी बांबूपासून बनविल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना याचे आकर्षण वाढू लागले आहे.
गौरीचे मुखवटे
गणरायापाठोपाठ येणाऱ्या गौरीसाठी बाजारपेठेत गौरीचे मुखवटे आले आहेत. काही ठिकाणी सुगडाच्या गौरी असल्याने सुगडही दिसत आहेत. लक्ष्मीची पावले, स्वस्तिक व विविध रांगोळ्यांच्या प्लास्टिकच्या पट्ट्या, गणपतीच्या मूर्तीचे व अन्य रांगोळ्यांचे छाप, तसेच विविध रंग यांची खरेदी सुरू आहे.
पूजेच्या साहित्याची खरेदी
गणरायाच्या पूजेसाठी बाजारात पूजेच्या साहित्याची रेलचेल पाहावयास मिळत आहे. अगरबत्ती, कापूर, तेल बॉटल, धूप, महालक्ष्मी बॉक्स, वस्त्र, नाडापूडी, वाती, फूलवाती आदी साहित्याची खरेदी होऊ लागली आहे. गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी साऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीला वेग येऊ लागला आहे. गणरायाच्या स्वागतासाठी लागणाऱ्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होऊ लागली आहे. बाजारात ग्रामीण भागासह खानापूर, चंदगड, गोवा आणि इतर ठिकाणांहून नागरिक खरेदीसाठी दाखल होऊ लागले आहेत.
बाजारात कोंडी
गणेशोत्सव जवळ आल्याने बाजारात गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे विविध ठिकाणी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. कार, रिक्षा आणि इतर मोठी अवजड वाहने बाजारात येत असल्याने लहान वाहनधारकांची दमछाक होऊ लागली आहे. विशेषत: पांगुळ गल्ली, मेणसी गल्ली, गणपत गल्ली व रविवार पेठेत गर्दी उसळू लागली आहे.