माझ्यावर नव्हे, पुरोगामी विचारांवर हल्ला
सातारा :
अक्कलकोट येथे झालेला हल्ला, माझ्यावर हल्ला नव्हे तर पुरोगामी विचारांवर हल्ला होता. शाहू, फुले, आंबेडकर या विचारधारेवर हल्ला होता. हा देश शांततेच्या, बुद्धाच्या, गांधीच्या विचाराने प्रगतीकडे जावा, एवढीच अपेक्षा आहे. आमचा संघर्ष सुरुच राहिल, तुम्ही आमच्या नादाला लागू नका, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिला.
ते निसराळे फाटा येथे कार्यकर्मात ते बोलत होते.साताऱ्यात बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली वंचित बहुजन आघाडीचे गणेश भिसे, महारुद्र तिकुंडे यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले. ते निसराळे फाटा येथील हॉलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्ताने आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, कोल्हापुरात छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी त्या दिवशी माझे स्वागत केले अन् माझा प्रवास सोलापूरच्या दिशेने सुरु झाला. जाता जाता, मोहोळसह इतर ठिकाणी स्वागत झाले. अक्कलकोट येथे झालेल्या प्रकारामुळे अख्खा महाराष्ट्र पेटला. तो माझ्यावर हल्ला नव्हता तर पुरोगामी विचारांवर हल्ला होता. शाहु, फुले, आंबेडकर या विचारधारेवर हल्ला होता. माझा आणि त्यांचा बांधाला बांध नव्हता. माझा आणि त्यांचा काही आर्थिक व्यवहार नव्हता. मला काही त्यांनी खंडणी मागितली नव्हती. मला काही त्यांनी खून करण्याची धमकी दिली नव्हती. मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा मला समजले की हा हल्ला एका वेगळ्या कारणाने झालेला आहे. मागच्या महिन्यात एक मिटींग झाली. त्यात ठरले की पुरोगामी विचारांचे, समतावादी विचारांचे लोक आहेत. तोपर्यंत भाजपाला देशात 400 पार करता येणार नाही. म्हणून हा हल्ला घडवून आणला आहे.
या देशातल्या लोकशाहीला विविधता आहे. देशात साम्यवाद, गांधीवाद, बुद्ध वाद असे अनेक विचारांचे लोक काम करतात. बहुपक्षीय लोकशाही देशाने स्वीकारली आहे. ती संपवून एकाधिकार शाही भाजपाला आणायची आहे. त्यांनी केलेला हल्ला हा शेवटाची सुरुवात आहे. त्याचा अंत होणार आहे. त्यांनी अक्कलकोटपासून सुरुवात केली आहे.
संभाजी ब्रिगेडेच्या अध्यक्षावर हल्ला म्हणून लढणारे कार्यकर्ते रडतील तेव्हा अधिक धोका असतो. लक्षात ठेवा हा धोका अधिक आहे. शत्रूला संपवायला छत्रपती शिवाजी महाराजांच्यासोबतही मुठभर मावळे होते, त्यामुळे तुम्ही आमच्या नादी लागू नका. आमची लढाई सत्य अन् अहिंसेची आहे. बुद्धाच्या आणि गांधीच्या विचारांची आहे, असेही प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.