For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तापू लागले वातावरण

06:30 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
तापू लागले वातावरण
Advertisement

लोकसभा निवणुकीसाठी वातावरण तापू लागले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरच्या चर्चेत याची चुणूक दिसून आली आहे. विशेषत: या चर्चेला केंद्र सरकारच्या वतीने उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर जो घणाघात केला, त्यातून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्या प्रचाराची दिशा स्पष्ट झाली आहे. अयोध्येतील राममंदिर, अनुच्छेद 370 निष्प्रभ करणे, उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा याच काळात लागू होणे, गेल्या 10 वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झालेली आर्थिक प्रगती, पायाभूत सुविधांचा व्यापक विकास, गरिबांसाठीच्या सामाजिक योजना आणि त्यांची व्याप्ती, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात उंचावलेली भारताची प्रतिमा, संरक्षण क्षेत्रात साधलेला विकास आणि कृषी क्षेत्रातील विविध प्रकल्प इत्यादी मुद्द्यांवर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी आत्मविश्वासपूर्वक पुन्हा एकदा कौल मागणार, हे निश्चित झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दोन्ही सभागृहांमध्ये केलेल्या भाषणांमध्ये विरोधी पक्षांनी सातत्याने केलेल्या प्रत्येक आरोपांचा जो बिनतोड आणि सप्रमाण प्रतिवाद केला, तसेच ज्या आक्रमकपणे हे आरोप खोडून काढले, त्यातून त्यांचा सलग तिसरा कार्यकाळ मिळविण्याचा आत्मविश्वास प्रगट होत होता. त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी लोकसभेच्या 370 जागांचे, तर या पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी 400 हून अधिक जागांचे लक्ष्य ठेवले आहे. याचाच अर्थ त्यांना या निवडणुकीचा परिणाम कशा प्रकारे लागणार, याची कल्पना आलेली आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे. मात्र, जोपर्यंत लोकसभा निवडणूक होऊन मतमोजणी होत नाही, तोपर्यंत प्रयत्न करावे लागतातच. कोठेही ढिलाई दाखवून चालत नाही, किंवा प्रतिस्पर्धीं पक्षांना कमी लेखून चालत नाही, हे भान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला निश्चितच आहे. लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये या पक्षाने आणि त्याच्या नेतृत्वाने या अखेरच्या क्षणापर्यंत सावधानतेचा प्रत्यय आणून दिला आहे. त्यावरुन आगामी निवडणुकीतही ही दक्षता घेतली जाईल हे निश्चित मानण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष, तसेच त्यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्या देहबोलीवरुन त्यांचा निर्धार आणि आत्मविश्वास उघडपणे दिसून येतो. त्यांची सज्जताही बळकट असल्याचे कोणालाही जाणवते. कोणत्याही क्षणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ देत, आम्ही सज्ज आहोत, असा संदेश त्यांच्या देहबोलीतून आणि प्रत्यक्ष वक्तव्यांमधूनही स्पष्ट होताना दिसतो. मात्र, याच्या नेमकी उलट स्थिती विरोधी पक्षांच्या गोटात दिसून येते. विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकत्र येण्याचे प्रयत्न चालविले असले आणि तशा प्रकारची एक आघाडीही त्यांनी आठ महिन्यांपूर्वीच मोठा गाजावाजा करुन स्थापन केली असली, तरी स्थापनेच्या स्थितीपासून ती थोडी पुढे गेली आहे, किंवा तिला योग्य ती दिशा सापडली आहे, असे जाणवत नाही. जागावाटपाचा तिढा या आघाडीच्या स्थापनेच्या वेळीही होता, तो त्याच पातळीवर असल्याचे दिसते. एकाही राज्यातील जागावाटप निर्धारित झाल्याचे वृत्त हाती लागत नाही. केवळ चर्चा होत राहिल्याची माहिती मिळते. आणखी एक ते सव्वा महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाईल. आदर्श आचारसंहिताही लागू होईल. पण याची कोणतीही तमा विरोधी पक्षांना असल्याचे पहावयास मिळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गालिप्रदान करण्याचा कार्यक्रम गेली 23 वर्षे ज्या जोमाने चालविला जात आहे, तो मात्र आजही त्याच उत्साहात होत आहे. केवळ त्यांना बोल लावून निवडणूक जिंकता येईल असे विरोधी पक्षांना वाटत असेल तर ती बाब वेगळी आहे. पण एवढे वगळता इतर संदर्भांमध्ये काही महत्त्वाच्या हालचाली होत आहेत, असे दिसत नाही. कदाचित त्या आतून होत असल्याचीही शक्यता आहे. पण आता वेळ वेगाने निघून चालला आहे. विरोधी पक्ष एकमेकांवरच शरसंधान करण्यात गुंतले आहेत, असे दृष्य दिसत आहे. काँग्रेसला 40 जागाही मिळणार नाहीत, अशी भविष्यवाणी भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या नेत्याने केली असती तर ते समजण्यासारखे होते. पण ती केली आहे, विरोधी आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी. आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. महाराष्ट्रात विरोधी गोटात नेमके काय चालले आहे, हे त्या पक्षांना तरी माहीत आहे की नाही, हीच शंका आहे. केरळमध्ये तेथील सत्ताधारी डाव्या आघाडीने राहुल गांधींना वायनाड हा त्यांचा सुरक्षित मतदारसंघ सोडण्याचा आदेशवजा सल्ला दिला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, विरोधी पक्षांना सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्र करण्यासाठी ज्या नेत्याने सर्वात आधी पुढाकार घेतला होता, विरोधी पक्षांची एक बैठकही सर्वप्रथम आयोजित केली होती, ते नितीश कुमार तर चक्क भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करुन बिहारमध्ये पुन्हा सत्ताधीश झाले आहेत. शिवाय इतर अनेक विरोधी नेते याच पक्षाच्या वाटेवर आहेत, अशी वृत्ते येत आहेत. विरोधी आघाडीच्या पक्षसंख्येला गळती लागलीच आहे. निवडणूक जसजशी जवळ येईल, तशी ही गळती मोठी होत जाईल, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विरोधी आघाडीत नेमके कोण सूत्रसंचालन करीत आहे, यासंदर्भात कोणतीही स्पष्टता नाही. उलट, राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मात्र पक्षांची संख्या वाढत आहे. नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल या आघाडीत आला आहे. आणखी तीन स्थानिक पक्ष येण्यास उत्सुक असून त्यासंबंधीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे, असेही बोलले जात आहे. ही सर्व परिस्थिती मोठीच स्वारस्यपूर्ण होत चालली आहे. अर्थात, हा ‘सस्पेन्स’ फार काळ टिकणार नाही. कारण, लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास प्रारंभ झालाच आहे. येत्या एक, दोन आठवड्यामध्ये चित्र स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे. एकंदर, वातावरण तापू लागले आहे, एवढे खरे.

Advertisement

Advertisement
Tags :

.