कारवार जिल्ह्यातील वातावरण राममय
कारवार : अयोध्यानगरीतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कारवार जिल्ह्यातील वातावरण राममय बनले आहे. जिल्ह्यातील सर्व बारा तालुक्यातील जनतेची नजर अयोध्या येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेकडे लागून राहिली आहे. जिल्ह्यातील शेकडो मंदिरे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाली आहेत. यामध्ये जिल्ह्यातील काही राममंदिरांचाही समावेश आहे. दक्षिण भारतातील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुराण प्रसिद्ध गोकर्ण येथील रामतीर्थ आणि महाबळेश्वर देवस्थानात विशेष पूजा आणि गंगाआरतीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अतिसंवेदनशील नगर म्हणून ओळखले जाणारे भटकळ सोहळ्याच्या उत्साहात बुडून गेले आहे. भटकळमध्ये ठिकठिकाणी उभारलेल्या श्रीरामाच्या कटआऊटसमुळे भगव्या पत्ताका, भगवे ध्वज आदींमुळे भटकळ भगवेमय बनले आहे. भटकळनगराचा इतिहास लक्षात घेऊन सोहळ्याला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून कडक बंदोबस्त ठेवला आहे.
आज जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विविध संघटनांनी मिरवणूक काढण्याचे नियोजन केले आहे. तथापि, पोलीस खात्याकडून शोभायात्रांना अद्याप रितसर परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे शोभायात्रा होणार की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. कारवार तालुक्यातील अनेक ठिकाणी घरावर भगवा ध्वज लावण्यात आला आहे. मंदिरासह अनेक घरावर विद्युत रोषणाई केली आहे. कारवार तालुक्यातील सदाशिवगड येथील शिवाजी चौकात उत्साही युवकांनी बृहत आकाराच्या आकाश कंदीलाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे दीपावलीसदृष्य वातावरण निर्माण झाले आहे. कारवार तालुक्यातील काही मंदिरातील महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तर अन्य काही मंदिरातून भजन, कीर्तन, आरती, दीपोत्सव, गायन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.