बांगलादेशातील वातावरण पुन्हा तापले
शेख हसीना यांच्या समर्थकांना अटक : युनूस सरकारकडून रस्त्यावर सैन्य तैनात
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशात सत्तापालट झाल्यापासून सातत्याने तणावाची स्थिती आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशातून बाहेर पडत भारतात आश्रय घेतल्याच्या तीन महिन्यांनी त्यांचा पक्ष अवामी लीगने रविवारी ढाका येथे वर्तमान अंतरिम सरकारच्या विरोधात निदर्शने केली आहेत. या पार्श्वभूमीवर अंतरिम युनूस सरकारने सैन्याला रस्त्यांवर उतरविले आहे.
तर दुसरीकडे ढाक्यात अवामी लीगचे कार्यकर्ते आणि समर्थकांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. बांगलादेशच्या सैन्याने निदर्शनांच्या पूर्वीच शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पक्ष समर्थक आणि भूमिगत झालेले नेते ढाक्यातील गुलिस्तान, झीरो पॉइंट, नूर हुसैन चौक परिसरात जमा झाले. स्वत:च्या नेत्यांना चुकीच्या पद्धतीने गोवणे, विद्यार्थी शाखेवर बंदी घालण्याच्या आणि कार्यकर्त्यांची होत असलेल्या छळवणुकीच्या विरोधात अवामी लीगकडून ही निदर्शने करण्यात आली आहेत.
सैन्याच्या 191 तुकड्या तैनात
अवामी लीगच्या निदर्शनांना रोखण्यासाठी युनूस सरकारने सैन्य, पोलिसांना संबंधित भागांमध्ये तैनात केले होते. अवामी लीगला निदर्शनांची अनुमती देणार नसल्याची घोषणा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमातने केली होती. तर ढाका पोलिसांनीही निदर्शने करण्याची अनुमती नाकारली होती. देशभरात सैन्याच्या 191 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.
सरकारचा इशारा
अवामी लीगला निदर्शने आयोजित करण्याची अनुमती दिली जाणार नसल्याचा इशारा अंतरिम सरकारने दिला आहे. अवामी लीग एक फॅसिस्टवादी पक्ष आहे. या फॅसिस्टवादी पक्षाला बांगलादेशात कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याची अनुमती देण्याचा प्रश्नच उदभवत नसल्याचा दावा अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार शफीकुल आलम यांनी केला होता.
ट्रम्प समर्थकांना अटक
यापूर्वी बांगलादेशचे सैन्य आणि पोलिसांनी अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाप्रित्यर्थ जल्लोष केल्याप्रकरणी 10 जणांना अटक केली आहे. अटकेच्या कारवाईचा संबंध अवामी लीगशी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांनी पक्ष कार्यकर्त्यांना ट्रम्प यांच्या विजयाचा आनंद व्यक्त करत त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे छायाचित्र आणि ध्वज घेऊन रॅली काढण्याचा निर्देश दिला होता. तर बांगलादेशात अस्थिरता फैलावण्यासाठी ट्रम्प यांच्या नावाचा वापर केला जात असल्याचा आरोप करत पोलिसांनी संबंधितांना अटक केली आहे. ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला होता.