'श्रावणमासी, हर्ष मानसी'ची चाहूल
कोल्हापूर :
हिंदू पंचांगानुसार, यंदाचा श्रावण महिना शुक्रवार (दि.25) पासून सुरू होत आहे. जिह्यात धार्मिक उत्साहाचे वातावरण भारले असून रिमझिम पडणारा पाऊस आणि मध्येच पडणारे ऊन, अशा आल्हादायक वातावरणाची अनुभूती येवू लागली आहे. मंदिरे आणि बाजारपेठांमध्ये भक्तीमय आणि सांस्कृतिक उत्साह दिसत आहे. श्रावणातील विशेष पूजा, अभिषेक आणि व्रतवैकल्यांचे वेध लागले आहेत. त्यामुळे भक्तीरस आणि श्रावणसरीत न्हाऊन निघणारा भाविक सुखावला आहे.
श्रावण महिन्याचा प्रारंभ 25 जुलैपासून होईल, तर समाप्ती 23 ऑगस्टला आहे. यादरम्यान श्राव सोमवार, नागपंचमी, हरितालिका उपवास, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला असे अत्यंत पवित्र समजले जाण्राया सणांची मांदियाळी आहे. या काळात शिवलिंगावर बेलपत्र, दूध-दही अभिषेक, रुद्राभिषेक, उपवास आणि ‘ ’ओम नम: शिवाय‘ जपासारखे धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने केले जातील.
धार्मिक विचारवंत आणि व्रतधारी व्यक्तींच्या मते, श्रावण महिन्यातील व्रत-वैकल्ये, उपवास, शिवपूजन आणि सेवा-दानाचे कार्य मानसिक शांती, आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त मानले जाते. या काळात समाजात सकारात्मकता आणि एकोप्याचा संदेश दिला जातो. श्रावण महिन्याचा आरंभ जिह्यात भक्ती, परंपरा, निसर्ग आणि सामाजिक उत्साहाच्या वातावरणात होत आहे.
- बाजारातील लगबग
श्रावण महिन्यात भगवान शिव आणि पार्वतीची उपासना, तसेच महिलांसाठी हरितालिका व्रत, रक्षाबंधन आदीमळे बाजारपेठांमध्ये मोठी उलाढाल होते. फुलांचे हार, रुद्राक्ष माळा, पूजेचे साहित्य आणि पारंपरिक प्रसाद यांची बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. महिलांकडून मेहंदी, साजशृंगाराचे साहित्य, राख्या आणि सजावटीच्या वस्तूंची खरेदी सुरू झाली आहे. गोड पदार्थासह भाज्यांची मागणीतही याकाळात मोठी मागणी असते. श्रावणानंतर एकामागून एक सण येतात. यामुळे बाजारपेठेतील लगबग आणि उलाढाल येथून पुढे वाढत जाणारी असते.
- निसर्गाचा उत्साह
श्रावण महिना हा पावसाळ्याचा मुख्य टप्पा असल्याने कोल्हापूर जिह्यातील शेती आणि निसर्ग दोन्ही बहरले आहेत. गगनबावडा, पन्हाळा, चंदगड या भागांमध्ये भातशेतीची लागवड, पारंपरिक बैलजोडीने मशागत आणि महिलांचे पाणथळ शेतीत रोपे लावण्याची लगबग अंतीम टप्प्यात आहे. पंचगंगा नदीच्या काठावरील हिरवीगार शेती, दुथडी भरून वाहणारे ओढे आणि डोंगररांगा पर्यटनप्रेमींना आकर्षित करत आहेत.