तामिळनाडूच्या राजकारणात नव्या सुपरस्टारचे आगमन
2026 च्या निवडणुकीत ठरणार राजकीय भवितव्य
तामिळनाडूच्या राजकारणात एक नवा तारा उदयास येत आहे. चित्रपटसृष्टीतून राजकारणाच्या मैदानात पाऊल ठेवणाऱ्या विजयने स्वत:चा पक्ष टीव्हीके स्थापन केला आहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकीत विजय द्रमुकला स्वत:चा मुख्य स्पर्धक मानतो, तर भाजपला वैचारिक विरोधक. विजय भ्रष्टाचार अन् घराणेशाहीच्या विरोधात लढत द्रविड गौरव आणि सामाजिक न्यायाबद्दल बोलतोय. स्वत:ला पुढील पर्याय ठरवत विजय 1967 आणि 1977 च्या निवडणुकांचे उदाहरण देतो. परंतु विजय स्वत:च्या फिल्मी फॅनबेसला मतांना रुपांतरित करू शकेल का? अण्णाद्रमुकसोबत तो आघाडी करणार का? मुख्यमंत्रिपदासाठी तो तयार आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आगामी काळात मिळणार आहेत.
थलपति विजय हा तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा अभिनेता असून त्याने राजकारणात पाऊल ठेवले आहे. त्याने स्थापन केलेल्या पक्षाचे नाव तमिलगा वेट्री कझागम (टीव्हीके) आहे. 2026 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीके स्वत:चे नशीब आजमावणार आहे. 2 फेब्रुवारी 2024 रोजी थलपति विजयने स्वत:च्या पक्षाची घोषणा केली होती. त्याच्या 4 वर्षांपूर्वी 2020 मध्ये प्राप्तिकर विभागाने विजयची चौकशी केली होती. ही चौकशी त्याच्या ‘बिगिल’ चित्रपटाच्या फायनान्सिंगवरून झाली होती. त्यावेळी विजय ‘मास्टर’ चित्रपटाचे चित्रिकरण करत होता, या घटनेनंतर विजयने स्वत:च्या चाहत्यासोबत एक सेल्फी घेतला होता, त्याच्या या कृतीला एक राजकीय संदेश मानले गेले होते.
2020 मध्ये कृतीतून राजकीय संदेश
विजयचा नवा पक्ष टीव्हीके 2026 च्या निवडणुकीत भाग घेणार आहे. विक्रंवडी येथे झालेल्या पहिल्या जाहीरसभेत विजयने द्रमुकला स्वत:चा मुख्य स्पर्धक संबोधिले आहे. तर भाजपला वैचारिक विरोधक ठरविले. 2020 मध्ये प्राप्तिकर विभागाकडून झालेल्या चौकशीने विजयच्या राजकीय जीवनाच्या प्रारंभाचा संकेत दिला होता. मास्टर चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान नेवेली कोळसा खाणीत ही घटना घडली होती. त्यावेळी विजय संतप्त होता, परंतु त्याने शांत राहणे योग्य मानले होते. सेटवर परतल्यावर विजय स्वत:च्या व्हॅनिटी व्हॅनवर चढला, यामुळे हजारो चाहते आनंदून गेले होते. मग त्याने या गर्दीसोबत एक सेल्फी काढला होता. ही सेल्फी एक राजकीय वक्तव्य ठरली होती. तसेच विजय राजकारणात येण्याची तयारी करत असल्याचेही स्पष्ट झाले. आता टीव्हीकेच्या स्थापनेसोबत विजय तामिळनाडूच्या राजकारणात एक नवी शक्ती म्हणून उदयास आला आहे. 2026 च्या निवडणुकीत त्याचा पक्ष कशी कामगिरी करतो हे पहावे लागणार आहे. द्रमुक आणि भाजपसोबत त्याचा सामना किती रंगणार हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पक्षाची राजकीय विचारसरणी
द्रमुक अन् भाजप यांच्यात गुप्त करार असल्याचे विजयचे मानणे आहे. विजय या दोन्ही पक्षांची तुलना ‘किंडरगार्टनमधील मुलांशी करतो’ दोन्ही पक्ष लहान मुलांप्रमाणे भाषा धोरणावर भांडत असल्याची प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली आहे. विजयने स्वत:च्या राजकीय विचारसरणीची द्रविड गौरव आणि सामाजिक न्यायासोबत भ्रष्टाचार अन् घराणेशाहीच्या विरोधातील लढाईच्या स्वरुपात व्याख्या केली आहे. विजय स्वत:ला पुढील पर्याय ठरवत इतिहासाचा दाखला देतो. विजय स्वत:च्या पक्षाला इतिहास रचण्यासाठी प्रतिबद्ध एक उभरती प्राथमिक राजकीय शक्ती संबोधित आहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकीची तुलना तो 1967 (जेव्हा द्रमुक सत्तेवर आला होता) आणि 1977 (जेव्हा अण्णाद्रमुकने द्रमुकला पराभूत केले)शी करतो. परंतु इतिहासाची पुनरावृत्ती होणार का हे पहावे लागणार आहे.
राजकारण अन् चित्रपटांचे नाते
अण्णादुराई आणि एमजीआर यांचे यश राजकारण आणि चित्रपटांमधील सहजीवी संबंधातून मिळाले हेते. या संबंधात मूळ स्वरुपात काही सामाजिक संदेश होते. अण्णादुराई आणि करुणानिधी यांनी चित्रपटांसाठी अशा कहाण्या लिहिल्या, ज्यात सामाजिक संदेश होता. हे चित्रपट द्रविड आंदोलनाची ओळख ठरले होते. या चित्रपटांनी द्रविड कषगम (नंतर द्रमुक)ला लोकप्रिय केले होते. एमजीआर या सहजीवनाचे प्रतीक होते. त्यांनी या विचारसरणीला लोकांपर्यंत पोहोचविले आणि संदेशवाहकच उद्धारक ठरला होता. जयललिता या तामिळनाडूच्या राजकारणात यशस्वी ठरणाऱ्या पहिल्या नायिका होत्या. त्यांनी स्वत:चा राजकीय प्रवास एमजीआरसोबत सुरू केला होता. एमजीआर यांनी त्यांना 1983 मध्ये अद्रमुकचा प्रचार सचिव आणि पुढील वर्षी राज्यसभा खासदार केले होते. 1987 मध्ये एमजीआर यांच्या निधनानंतर पक्ष फुटल्यावरही जयललिता यशस्वी ठरल्या होत्या. सत्तेबाहेर राहत त्यांनी 12 हून अधिक खटल्यांना तोंड दिले, यामुळे त्यांनी एका खऱ्या कणखर राजकीय नेत्याची प्रतिमा दाखवून दिली.
विजयकांत यांना किंचित यश
अनेक अन्य अभिनेते ज्यात महान शिवाजी गणेशन देखील सामील आहेत, ते राजकारणात अपयशी ठरले. 2005 मध्ये देसीय मुरपोक्कु द्रविड कषगम (डीएमडीके) स्थापन करणारे विजयकांत 2006 च्या विधानसभा निवडणुकीत जवळपास 8.5 टक्के मते मिळवून आशादायक वाटले होते. परंतु पुढील निवडणुकीत त्यांनी अण्णाद्रमुकसोबत आघाडी केली आणि लवकरच या आघाडीतून बाहेर पडले. विजयकांत यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे डीएमडीके पक्ष हळूहळू कमकुवत होत गेला. 28 डिसेंबर 2023 रोजी विजयकांत यांचे निधन झाले.
कमल हासन यांना मिळाले नाही यश
मग फेब्रुवारी 2018 मध्ये कमल हासन यांनी मक्कल निधि मय्यम (एमएनएम) हा पक्ष स्थापन केला. 7 वर्षे आणि तीन मोठ्या निवडणुकांनंतर 5 टक्क्यांपेक्षा कमी मते मिळविणारा एमएनएम हा द्रमुकचा अनौपचारिक सहकारी ठरला. द्रमुकने कमल हासन यांना राज्यसभेवर पाठविण्याचे आश्वासन दिले आहे. एमएनएमच्या स्थापनेच्या सुमारे 3 वर्षांनी रजनीकांत यांनी जानेवारी 2021 मध्ये स्वत:चा पक्ष निर्माण करण्याची घोषणा केली होती. परंतु 73 वर्षीय सुपरस्टार ज्यांना 1996 मध्ये जयललिता यांच्या पराभवाचे आंशिक श्रेय दिले जाते, ते यापासून मागे हटले. जयललिता निवडणुकीत विजयी झाल्या तर देव देखील तामिळनाडूला वाचवू शकणार नाही असे वक्तव्य रजनीकांत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा परिणाम म्हणून अण्णाद्रमुकला सत्तेपासून वंचित रहावे लागले होते.
टीव्हीकेसमोरील आव्हान
राज्यातील सर्वाधिक रक्कम घेणाऱ्या अभिनेत्याचा दर्जा सोडून राजकारणात उतरलेला विजय पूर्वासुरींच्या इतिहासापासून अनभिज्ञ नाही. प्रत्यक्षात मी स्वत:च्या अयशस्वी ज्येष्ठांकडून धडा शिकलो असल्याचे त्याचे सांगणे आहे. विजयकडे देशाच्या या हिस्स्यात कुठल्याही अभिनेत्यासाठी सर्वात मोठा चाहतावर्ग आहे, परंतु या चाहत्यांना पक्ष कार्यकर्त्यांमध्ये बदलले जाऊ शकते असा विचार करणे मूर्खपणाचे ठरू शकते. टीव्हीकेची विचारसरणी द्रविड पक्षांपेक्षा वेगळी नाही, याचमुळे त्याला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आगळावेगळा मार्ग पत्करावा लागणार आहे. याचमुळे त्याच्या पक्षाला मतदान केंद्र पातळीवर एक कार्यकर्ता आधार निर्माण करण्याची गरज आहे. हा आधार द्रमुक अन् अण्णाद्रमुकमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. टीव्हीकेचा स्टार चेहराच एकमात्र ओळखला जाणारा चेहरा आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी काही प्रतिष्ठित लोक किंवा अन्य पक्षांच्या अनुभवी राजकारण्यांना स्वत:च्या गोटात आणण्याचे काम विजयला करावे लागणार आहे.
अण्णाद्रमुकशी आघाडी शक्य
थलपति विजय हा अण्णाद्रमुकसोबत आघाडी करण्यास तयार असल्याचे बोलले जातेय. ही आघाडी झाल्यास पर्याय असल्याच्या स्वत:च्या प्राथमिक आश्वासनाला निरोप देणे ठरणार आहे. दोन्ही पक्ष हातमिळवणी करण्यास तयार झाल्यास विजय मुख्यमंत्रिपद अण्णाद्रमुक महासचिव एडप्पाडी के. पलानिस्वामी यांना सोपविणार का असा प्रश्न उभा ठाकणार आहे. तसेच तामिळनाडूच्या सत्तेचा मतदारसंघ सेंट जॉर्जवर कब्जा करण्याच्या प्रयत्नापूर्वी तो आणखी पाच वर्षे मेहनत करणार का या प्रश्नाचे उत्तरही शोधावे लागणार आहे.
संकलन : उमाकांत कुलकर्णी