खानापुरात आगमन सोहळा अमाप उत्साहात
खानापूर/प्रतिनिधी
खानापूर शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात घरगुती आणि सार्वजनिक गणपतीचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. सकाळपासूनच मूर्तिकारांच्या घरी घरगुती गणपती आणण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत होती. गणेश गणेश मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया अशा घोषणा देत तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत आणि वाद्यांच्या गजरात गणपतींचे आगमन सुरू झाले होते. चार चाकी, दुचाकी वाहनांतून तसेच डोक्यावरून मूर्ती नेण्यात येत होत्या. सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू असूनही उत्साहात गणपतीचे आगमन होत होते. शहरातील जिजाऊ गणेश मंडळाच्या मूर्ताचे दोन दिवसांपूर्वीच आगमन झाले होते. सायंकाळी 6 वाजता मूर्तीची प्रतिष्ठापना पूजन करून आरती करण्यात आली. शहरातील पोलीस स्थानक, बसस्थानक, जिल्हा पंचायत, हेस्कॉम, तहसीलदार, पोलीस ट्रेनिंग सेंटर, शिक्षक संघटना या कार्यालयांतील गणेशांचे आगमन सकाळी 11 वाजता झाले. त्यानंतर प्रतिष्ठापना करून पूजन करण्यात आले. सायंकाळी 4 नंतर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या गणपतींचे आगमनास सुऊवात झाली. सायंकाळी पावसाची रिमझिम सुरू असल्याने गणपती मूर्तीवर प्लास्टिक झाकून मंडपाकडे नेण्यात येत होते. फटाक्यांची आतषबाजी, बेंजो, बँड पथकांसह मोठ्या उत्साहात रात्री उशिरा प्रतिष्ठापना करण्यात आली. शहरात महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळ, बाल गणेशोत्सव मंडळ, चव्हाटा गणेशोत्सव मंडळ, चौराशी गणेशोत्सव मंडळ, महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळ, विद्यानगर गणेश मंडळ, दुर्गानगर गणेश उत्सव मंडळ, बुरूड गल्ली गणेशोत्सव मंडळ, शिवाजीनगर गणेश मंडळ, हलकर्णी गणेश मंडळ यासह ग्रामीण भागातील सार्वजनिक गणपतींच्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. रिमझिम पाऊस सुरू होता, अशातही गणेश भक्तांमध्ये जल्लोषी वातावरण आणि उत्साही वातावरणात गणेशांचे आगमन होत होते. रात्री उशिरा गणेशोत्सव मंडळांकडून मूर्तीची स्थापना करण्यात आली. पुढील 11 दिवस उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे. तालुक्यात गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी उंदरी साजरी केली जाते. यावेळी मांसाहाराचा बेत असतो. रविवारी उंदरी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यासाठी नंदगड येथील बुधवारच्या आणि खानापूर येथील रविवारच्या बाजारात बोकडांची कोट्यावधीची उलाढाल झाली.