Solapur : तहसील- पंचायत समितीचा परिसर झाला गाजरगवताचा माळ !
स्वच्छतेकडे दुर्लक्ष; परंडा तहसील परिसरात समस्या वाढली
परंडा : परंडा तालुक्याचे प्रशासकीय केंद्र असलेल्या तहसील कार्यालयासह शेजारील पंचायत समिती कार्यालयाची स्वच्छतेची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली असून परिसर गाजरगवताचा माळ झाला झाला आहे.. खेडेगावातून विविध कामांसाठी आलेले शेतकरी, महिला आणि सामान्य नागरिकांना या दोन्ही ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव भासतो आहे.
स्वच्छतागृहे असली तरी त्यांचा वापर अडचणीचा झाला आहे. परिसरातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था निकामी झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही नागरिकांना तहसील परिसरात दीर्घकाळ थांबावे लागत असल्याने अस्वस्थता वाढली आहे.
तहसील आणि पंचायत समिती परिसरात गाजरगवत, रानगवत आणि कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला आहे. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, डास-मच्छरांचा प्रचंड उपद्रव वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. दोन्ही कार्यालय परिसरात पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्याने नागरिकांना आपली वाहने रस्त्याच्या कडेला किंवा अनियमित पद्धतीने उभी करावी लागतात. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अडथळे निर्माण होतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाद्वारे स्वच्छतेचा आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले असताना, तहसील व पंचायत समिती परिसरात मात्र ही संकल्पना केवळ कागदावरच दिसते. थोड्या नियोजनाने आणि जबाबदारीने या ठिकाणांचा चेहरामोहरा पूर्णतः बदलू शकतो, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
तहसील कार्यालय व पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या कामात तत्पर असले तरी परिसरातील काही भौतिक सुविधा कालांतराने जीर्ण झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांचा विश्वास आहे की प्रशासन याकडे गांभीर्यान लक्ष देईल आणि लवकरच परिसर स्वच्छ, सुंदर व आदर्श स्वरूपात दिसेल.
स्वच्छ व नीटनेटके वातावरण निर्माण झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल आणि "जनतेच्या सेवेसाठी असलेली कार्यालये" हे नाव खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल.