For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महानगरपालिकेचा परिसर विविध समस्यांच्या विळख्यात

10:37 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
महानगरपालिकेचा परिसर विविध समस्यांच्या विळख्यात
Advertisement

प्रवेशद्वारासमोर नेहमीच पाणी साचून : संरक्षण भिंतीला लागूनच पाण्याची गळती; दररोज पाणी वाया

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेचा परिसरच विविध समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. प्रवेशद्वारावरच तलावाचे स्वरूप निर्माण होत आहे. महानगरपालिकेच्या संरक्षण भिंतीला लागूनच पाण्याच्या पाईपला गळती लागून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र याची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे हा एक चर्चेचा विषय बनला आहे.

शहराचा विकास करणे, तसेच समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिका कार्यरत असते. मात्र आपल्या कार्यालय परिसरात निर्माण झालेल्या समस्या सोडविण्याकडेच मनपाचे दुर्लक्ष होत आहे. तेथूनच महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवक ये-जा करीत असतात. तरीदेखील या दोन्ही समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. खरोखरच ही दुर्दैवी बाब असल्याचे बोलले जात आहे. पावसाला सुरुवात झाल्यापासून प्रवेशद्वाराच्या समोरच पाणी साचून राहत आहे. मात्र त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीच उपाययोजना केली नाही.

Advertisement

महानगरपालिकेच्या पूर्व बाजूला असलेल्या आणखी एका प्रवेशद्वाराजवळच पाईपलाईन फुटून दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. काही अंतरावर त्याच भागामध्ये पाईप फुटून पाणी वाया जात आहे. त्याकडे कोणाचेच लक्ष नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जर महानगरपालिकेच्या आजूबाजूला असलेल्या समस्या सुटत नसतील तर शहराच्या समस्या कधी सुटणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मनपा आयुक्त लक्ष देणार का?

मनपा आयुक्त या प्रकाराकडे लक्ष देणार का? अशी विचारणा जाणकारांतून होत आहे. महानगरपालिकेचा परिसर प्रथम स्वच्छ ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या साथीच्या आजारांनी डोकेवर काढले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरियासारखे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. डासांचा प्रादूर्भाव वाढत असल्यामुळे या समस्या निर्माण होत आहेत. महानगरपालिकेजवळच अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याकडे मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी लक्ष देऊन समस्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.